
बिहार: बिहारची (bihar) राजधानी पटनामध्ये बिहार डेअरी अँड कॅटल एक्सपो २०२३च्या तीन दिवसीय प्रदर्शन सुरू झाले आहे. या एक्सपोमध्ये डेअरी आणि पशुपालन संबंधित अनेक कंपन्यांनी स्टॉल लावले आहेत. यातच या एक्सपोमधील एक रेडा चर्चेचा विषय बनला आहे. सोशल मीडियावर याचा फोटो चांगलाच व्हायरल होत आहे. या रेड्याची किंमत थोडीथोडकी नसून तब्बल १० कोटी रूपये आहे.
हरियाणा येथून पटनामध्ये आलेला हा रेडा गोलू २ आपल्या डेअरी फार्ममध्ये एसी रूममध्ये राहतो. गोलू २ दररोज ३० किलो सुका हिरवा चारा, ७ किलो गहू-चणे आणि ५० ग्रॅम मिनरल मिक्सचर खातो.
१० कोटींची किंमत असलेल्या या रेड्याचे मालक नरेंद्र सिंह यांनी सांगितले की ते या रेड्याला दररोज साधारण चारा देतात. या रेड्यासाठी दर महिन्याला साधारण ५० ते ६० हजार रूपये खर्च होतात. हा महागडा रेडा आतापर्यंत अनेक किसान मेळ्यांमध्ये गेला आहे.
गोलू २ त्यांच्या घरातील तिसरी पिढी
शेतकऱ्यांनी सांगितले ६ वर्षांचा गोलू २ हा त्यांच्या घरातील तिसरी पिढी आहे. यांच्या आजोबांच्या वेळेस पहिली पिढी होते ज्याचे नाव गोलू होते. त्यानंतर या रेड्याचा मुलगा गोलू १ होता. हा गोलूचा नातू आहे. याचे नाव गोलू २ आहे.