Tuesday, July 2, 2024
Homeताज्या घडामोडीPune Divorce case : माझा पोपट दिला तरच घटस्फोट देईन!

Pune Divorce case : माझा पोपट दिला तरच घटस्फोट देईन!

पतीचा अडकला पोपटात जीव; घटस्फोटासाठी पत्नीकडे केली अजबगजब मागणी

पुणे : हल्ली लग्न टिकणं फार कठीण गोष्ट झाली आहे. अगदी क्षुल्लक गोष्टींवरुन घटस्फोटाच्या घटना (Divorce cases) घडतात. घटस्फोटावेळी पती पत्नी एकमेकांना दिलेल्या भेटवस्तू, पैसे यांची परत मागणी देखील करतात. काहीवेळा पतीला पत्नीला पोटगीही द्यावी लागते. मात्र, पुण्यातील (Pune) एका पतीने घटस्फोटासाठी आपल्या पत्नीकडे एक अजबगजब मागणी केली आहे. त्याने भेट म्हणून दिलेला एक आफ्रिकन पोपट (African Parrot) परत दिला तरच घटस्फोट देईन अशी त्याची मागणी होती. यामुळे वाद होऊन त्यांचा घटस्फोट रखडला होता.

अनेकदा मालमत्ता, मुलं, पोटगी या कारणांमुळे घटस्फोट रखडल्याची अनेक उदाहरणे आहेत. पण एका आफ्रिकन पोपटामुळे वाद होऊन रखडलेल्या घटस्फोटाने सर्वांनाच अचंबित केलं. यामुळे पुण्याच्या कौटुंबिक न्यायालयात या केसची चांगलीच चर्चा रंगली होती. अखेर पत्नीनेही जास्त आढेवेढे न घेता तो पोपट परत करण्याचे कबूल केल्याने त्यांच्या घटस्फोटाचा मार्ग मोकळा झाला.

काय आहे या जोडप्याची कहाणी?

११ डिसेंबर २०१९ रोजी पुण्यामध्ये या जोडप्याने लग्नगाठ बांधली. मात्र दीड वर्षांतच त्यांच्यात मतभेद सुरु झाले. सततच्या भांडणांमुळे वैतागलेल्या पती पत्नीने एकमेकांपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला आणि १४ सप्टेंबर २०२१ पासून ते वेगळे राहू लागले. यासंदर्भात दोघांनीही पुण्यातील कौटुंबिक न्यायालयामध्ये घटस्फोटासाठी अर्ज केला. मात्र पोटगी, स्त्रीधन, स्थावर, जंगम मालमत्तेवरील हक्क या सगळ्या गोष्टी सोडून एका आफ्रिकन पोपटामध्ये दोघांचाही जीव अडकला.

पोपट दिल्याशिवाय घटस्फोट देणार नसल्याचं स्पष्ट केल्यानंतर अखेर नाईलाजाने पत्नीनेही पोपट देण्यास संमती दिली. त्यानंतर विवाह समुपदेशक असलेल्या शशांक मराठे यांनी १६ नोव्हेंबर २०२३ पूर्वी पोपट पतीकडे सुपूर्त करण्यात यावा, असं नमूद करत संबंधित अहवाल कौटुंबिक न्यायालयाचे न्यायाधीश बी. डी. कदम यांच्याकडे पाठवला. घटस्फोटाच्या अर्जास सहा महिने पूर्ण झाले होते. दोघेही एका वर्षापेक्षा जास्त काळ विभक्त राहत असल्याने न्यायालयानेही त्यांच्या घटस्फोटावर शिक्कामोर्तब केला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -