
भारताचा तालिबानला मदतीचा हात
नवी दिल्ली : लाखो अफगाणिस्तानी लोकांना पाकिस्तानने त्यांच्या देशातून हद्दपार केल्याने पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देण्याची तयारी तालिबानने केली आहे. पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी तालिबान सरकार भारताच्या मदतीने कुनार नदीवर एक मोठे धरण बांधणार आहे. तालिबानच्या या घोषणेनंतर पाकिस्तानच्या पायाखालची जमीन सरकली असून त्यांनी तालिबानला थेट युद्धाची धमकी दिली आहे.
कुनार नदी धरण प्रकल्पावर तालिबान आणि भारत यांच्यात अनेक वर्षांपासून वाटाघाटी सुरू होत्या. मात्र त्याला आता अंतिम मंजुरी मिळाली आहे. या दरम्यान, पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांताचे काळजीवाहू माहिती मंत्री जान अचकझाई यांनी या प्रकारानंतर थेट युद्धाची धमकी दिल्याची माहिती आहे. एवढेच नाही तर पाकिस्तानी नेत्याने भारताला या मुद्द्यापासून दूर राहण्याचा सल्लाही दिल्याचे बोलले जात आहे. जान अचकझाई म्हणाले की, तालिबानने भारतीय कंपनीच्या सहकार्याने कुनार धरण बांधले तर ते दोन्ही देशांमधील युद्धाच्या सुरुवातीचे पहिले पाऊल मानले जाईल. पाकिस्तानच्या या धमकीवर तालिबानने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
खम्मा प्रेसच्या वृत्तानुसार, पाकिस्तानातून लाखो लोकांना बाहेर काढल्यानंतर अफगाणिस्तानमधील अनेक लोकांनी पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी तालिबान प्रशासनाला कुनार नदीवर धरण बांधण्याची विनंती केली होती. तसेच अनेक अफगाणी लोकांनी थेट तालिबानला आर्थिक मदत देऊ केली होती, जेणेकरून ते कुनार नदीवर धरण बांधू शकतील, असे सांगितले जात होते.
अफगाणिस्तानची कुनार नदी गेली अनेक दशके पाकिस्तानात कोणत्याही व्यत्ययाशिवाय वाहत आहे. यापूर्वी अश्रफ घनी सरकारला भारताच्या सहकार्याने यावर धरण बांधायचे होते पण ते शक्य झाले नाही. अफगाणिस्तान कुनार नदीवर धरण बांधण्यात यशस्वी ठरला तर आपले पाणी येणे बंद होईल, अशी भीती पाकिस्तानला आहे. एवढेच नाही तर अफगाणिस्तानला जेव्हा जेव्हा पाकिस्तानला धमकी द्यायचे असेल तेव्हा ते आपली पाण्याची वाट अडवेल, असेही त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळेच धरणाच्या बांधकामाच्या केवळ बातमीनेच पाकिस्तानच्या तळपायाची आग मस्तकात गेली असून पाकिस्तान प्रचंड आक्रमक झाल्याचे दिसत आहे.