- जीवन संगीत : सद्गुरू वामनराव पै
एखाद्या विषयाची अथवा गोष्टीची जाणीव करून घेण्याची इच्छा असेल, तर त्याची जाणीव घेता येते. आपल्याला ती इच्छा नसेल, तर आपण हवे व नको यांत अडकून पडतो. ही जी ईश्वराची जाणीव होते किंबहुना तोच आपल्याला जाणीव करून देत असतो, ही तो कशी करून देतो? हृदयात टकटक चाललेली असते इथे आपले लक्ष कधी जात नाही. कारण आपण हवे व नको यांत अडकलेले असतो, त्यामुळे ही टकटक चाललेली आहे, हे आपल्या कधी लक्षातच येत नाही. तिथे लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न केला, तर ती टकटक ऐकू येते. परमेश्वर आपल्याला सांगत असतो, माझ्याकडे टक लाव, म्हणजे जीवनातील सगळ्या कटकटी नाहीशा होतील. इथे आपले लक्ष नसते व एक दिवस राम बोलो भाई राम होतो व टकटक बंद होते. आता तुझी संधी गेली व पुढचा जन्म येईल तो तुझ्या कर्माप्रमाणे येईल.
हे मी का सांगतो आहे. आपल्या हृदयात सतत टकटक चाललेली असते. टक लावून पहिले पाहिजे, टक लावून ऐकले पाहिजे. ही टकटक का चालते? हे कुणीतरी करत असले पाहिजे. आपण खोलीत आहोत व दरवाजा बंद असतो. बाहेरून कोणीतरी टकटक करतो. ती टकटक ऐकली, तर दरवाजा उघडणार. ती टकटक ऐकली नाही, तर दरवाजा उघडणार नाही. टकटक चाललेली आहे तिथे लक्ष द्या म्हणजे मग मी माझा दरवाजा उघडेन असे तो सांगत असतो. तुमच्या जीवनातील सगळ्या कटकटी नाहीशा होतील, सगळ्या समस्या नाहीशा होतील, पण परमेश्वराकडे टक लावा. त्यालाच देवाचे भजन म्हणतात. भजन चाललेलेच आहे. दुसरे भजन नको. आता तुम्हीही टकटक ऐका. आम्ही काय सांगतो, विठ्ठल विठ्ठल असे ऐकायचे. हृदयात चाललेली टकटक म्हणजेच विठ्ठल विठ्ठल असे तू म्हण. तो आपल्याला सांगत असतो, ‘अरे विठ्ठल विठ्ठल म्हण.’ आपले तिथे लक्षच नाही.
आपला श्वासोच्छ्वास चाललेला आहे इथे तरी आपले लक्ष असते का? आता जो श्वासोच्छ्वास चाललेला आहे तो एक दिवास बंद झाला की संपलेच. ‘राम बोलो भाई राम.’ टकटक बंद झाली की संपले. हा श्वास सतत चाललेला असतो. झोपेतसुद्धा हा श्वासोच्छ्वास चाललेला असतो. म्हणजे कोणीतरी असले पाहिजे ना? कोणीतरी टकटक करत असतो. तो कोण आहे हे शोधून काढा, तो कोण याचा शोध घ्या. आपण त्याचा शोध कधी घेत नाही. खरे सांगायचे म्हणजे आपण त्याला विठ्ठलाला शोधायचे असते. जो शोधणारा आहे तो तोच आहे. परमार्थ ही गम्मत आहे. परमार्थ हा खेळ आहे व या खेळात आपण रंगून गेले पाहिजे. कारण आपण जोपर्यंत या खेळात रंगून जात नाही, तोपर्यंत पांडुरंग म्हणतो “तुझे जे चाललेले आहे ते तसेच चालू राहू दे” आणि आपले जीवन असेच चालू राहाते.