Saturday, April 19, 2025

‘आर्जव’

  • ज्ञानेश्वरी : प्रा. मनीषा रत्नाकर रावराणे

‘काही’तरी प्राप्त करण्याच्या हेतूने आपण माणूस म्हणून जन्माला आलो. हे ‘काही’ प्राप्त करण्यासाठी कास धरावी लागते सद्गुणांची! यातील एक गुण म्हणजे ‘आर्जव’. आता आर्जव म्हणजे माऊलींच्या भाषेत सर्व प्राणिमात्रांविषयी सौजन्याने वागणे. या गुणामुळे माणूस म्हणून आपली वाढ होते, आपण घडतो, असे माऊली आपल्या दाखल्यांतून मांडतात.

माऊलींची समजावण्याची अवीट रीत! काय बोलावं त्याविषयी! ती तर अनुभवण्याची गोष्ट आहे ना! म्हणून म्हणतात, ‘एक तरी ओवी अनुभवावी!’ आज आपण पाहूया सोळाव्या अध्यायातील अशी ओवी…

आपण माणूस म्हणून जन्माला आलो, ते काही प्राप्त करण्याच्या हेतूने! हे काही म्हणजे ‘आत्मज्ञान’ किंवा ‘आत्मभान’ होय. त्यासाठी कास धरावी लागते सद्गुणांची! तिला म्हणतात, ‘दैवी संपत्ती’! या संपत्तीपैकी एक गुण आहे ‘आर्जव’! याचं वर्णन ऐकूया.

‘ज्याप्रमाणे दूध हे मुलांना हितकारक आहे आणि प्राण हा जसा सर्व भुतांचे ठायी सारखाच आहे, त्याप्रमाणे ज्याचे प्राणिमात्रांशी सौजन्य आहे, त्यालाच ‘आर्जव’ असे म्हणतात.’ ही ओवी अशी –
‘आतां बाळाच्या हितीं स्तन्य। जैसें नानाभूतीं चैतन्य।
तैसें प्राणिमात्रीं सौजन्य। आर्जव ते॥’ ओवी क्र. ११३

आता पाहा किती अर्थ भरलेला आहे या ओवीत! सांगायचा गुण आहे ‘आर्जव’ म्हणजे माऊलींच्या भाषेत सर्व प्राणिमात्रांविषयी सौजन्य! त्यासाठी दाखला दिला तो कोणता? बालक आणि दुधाचा! बाळासाठी दूध किती महत्त्वाचं! आपण जाणतो तेच तर त्याचं अन्न आहे. त्याला जीवनदान देणारं ते दूध. त्याचं पोषण करणारं हे पेय. त्याला हितकारक असलेलं! या दुधाप्रमाणे महत्त्वाचा आहे हा गुण. या गुणामुळे जणू माणूस म्हणून आपली वाढ होते, आपण घडतो.

या गुणाविषयी बोलताना दुसरा दाखला दिला आहे ‘चैतन्या’चा! ज्याप्रमाणे कोणीही भूतमात्र असो, त्याच्या ठिकाणी चैतन्य हे असतेच. इथे माऊलींनी जाणीवपूर्वक शब्द योजला आहे ‘भूतमात्र’! म्हणजे यात सगळी सजीव सृष्टी आली. अगदी कणभर मुंगी ते महाकाय हत्ती, इवलासा अंकुर ते प्रचंड वृक्ष बघा. या सर्वांच्या ठिकाणी चैतन्य असतंच. या एका दाखल्यातून ज्ञानदेव आपल्यापुढे अफाट आवाका उभा करतात, तो सचेतन सृष्टीचा!

त्याप्रमाणे प्रत्येकाशी सौजन्याने वागणं म्हणजे ‘आर्जव’ हा गुण होय. यात अर्थात अध्याहृत आहे की, तो कोणताही भेदभाव करीत नाही. स्त्री-पुरुष, लहान-थोर, गरीब-श्रीमंत या साऱ्यांविषयी सौजन्याने वागणं! किती महत्त्वाचा गुण आहे हा! अगदी आपल्या घरात, कुटुंबात याचं महत्त्व आहे. ते अगदी आंतरराष्ट्रीय राजकारणातदेखील! आपल्या देशाचं नाव आज जगभरात गाजतं आहे, ते आपल्या पंतप्रधानांच्या या गुणामुळेच. नाही का!

हल्ली अनेक ठिकाणी मोठमोठ्या कार्यशाळा घेतल्या जातात. जाडजूड पुस्तकं वाचली जातात. कशाची? तर soft skills ची. आज परवलीचा शब्द आहे हा! माणूस म्हणून यशस्वी व्हायचं, तर केवळ बुद्धिमत्ता पुरेशी नाही. महत्त्वाचे आहेत ते इतर काही गुण, कौशल्यं! यांचा विकास कसा करायचा याचं प्रशिक्षण या कर्यशाळांमध्ये दिलं जातं. त्यासाठी प्रचंड ‘फी’ आकारली जाते.

आपली संतमंडळी हेच प्रशिक्षण देतात तेही अगदी निरपेक्षपणे! श्रीभगवद्गीता, ज्ञानेश्वरी, दासबोध, शंकरगीता, साईचरित्र, स्वामीचरित्र, गोंदवलेकर महाराज प्रवचन, गजानन विजय. किती ग्रंथांची नावं घ्यावीत! हे सारे ग्रंथ आपल्याला शिकवतात. त्यात असते संतांची तळमळ! याचा अनुभव ही ग्रंथसंपदा वाचताना वारंवार येतो. ‘ज्ञानेश्वरी’देखील आपल्याला हाच अनुभव देते. गोड बोलून, छान सोपी उदाहरणं देऊन मायेच्या ममतेने ‘माऊली’ आपल्याला शहाणं करतात. या जगात वागण्यासाठी, वावरण्यासाठी समर्थ करतात. जगण्याचा खरा अर्थ समजावून देतात.

अंधारातून प्रकाशाकडे
सोबत घेऊन जातात…
आपल्याला आयुष्यभर
सोबत करत राहतात…

[email protected]

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -