- गजानन महाराज : प्रवीण पांडे, अकोला
श्री गजानन महाराजांचा तुकाराम कोकाटे नावाचा एक भक्त होता. त्याला होणारी संतती लगेच यमसदनास जात असे. त्याने महाराजांना पुढीलप्रमाणे नवस केला.
“गुरुराया मला दीर्घायुषी संतती देशील, तर त्यातून एक मुलगा तुला अर्पण करीन.” श्री महाराजांनी त्याचे मनोरथ पूर्ण केले. त्या तुकारामास दोन-तीन मुले झाली. पण तुकारामास संततीच्या मोहाने नवसाची आठवण राहिली नाही. त्याचा थोरला मुलगा नारायण यास काही रोग झाला. अनेक उपचार केले. पण त्यामुळे काही गुण आला नाही. मुलाची नाडी बंद होऊ लागली. नेत्रांची दृष्टी थिजू लागली. छातीत थोडी धुगधुगी उरली होती. ही सर्व स्थिती पाहून तुकारामास महाराजांना केलेल्या नवसाची आठवण झाली. तुकाराम महाराजांना बोलला, “गुरुराया हा माझा पुत्र वाचला, तर हा पुत्र तुम्हाला अर्पण करीन.” असे तुकाराम वचनबद्ध होताच त्या मुलाची नाडी ठिकाणी आली व तो बालक डोळे उघडून पाहू लागला. व्याधी बरी झाल्यावर तुकारामांनी हा नारायण नामे कुमार मठावर आणून महाराजांना अर्पण केला व आपला नवस फेडला. हा नारायण पुढे अनेक दिवस मठात होता.
पुढे आषाढ महिन्यामध्ये हरी पाटलांना सोबत घेऊन महाराज विठ्ठलास भेटण्याकरिता (दर्शनाकरिता) पंढरपूर येथे आले. दासगणू महाराजांनी अतिशय मोजक्या शब्दांत विठू माऊलींचे साद्यंत वर्णन केले आहे :
जो सर्व संतांचा। ध्येय विषय साचा।
जो कल्पतरू भक्तांचा। कमलनाभसर्वेश्वर॥
जो जगदाधर जगतपती। वेद ज्याचे गुण गाती।
जो संतांच्या वसे चित्ती। रुक्मिणी पती दयाघन॥ ८८॥
महाराज पंढरपुरात आले. चंद्रभागेत स्नान केले व पांडुरंगाचे दर्शन घेण्याकरिता विठू माऊलींच्या राऊळी आले. इथे महाराजांनी विठ्ठलाला काही विनंती वजा मागणी केलेली आहे :
हे देवा पंढरी नाथा।
हे अचिंत्या अद्वया समर्था।
हे भक्त परेशा रुक्मिणीकांता।
ऐक माझी विनवणी॥२९०॥
तुझ्या आज्ञेने आजवर।
भ्रमण केले भूमीवर।
जे जे भाविक होते नर। त्यांचे मनोरथ पूर्ण केले॥९१॥
आता अवतार कार्य संपले। हे तू जाणसी वहिले।
पुंडलिक वरदा विठ्ठले।
जाया आज्ञा असावी॥९२॥
देवा मी भाद्रपद मासी।
जावया इच्छितो वैकुंठासी।
तुझ्या चरणा सन्निध।
ऐसी करूनी विनवणी।
समर्थांनी जोडीले पाणी।
अश्रू आले लोचनी।
विरह हरीचा साहवेना॥ ९४॥
इथे विठ्ठलाच्या भेटीच्या तळमळीने महाराजांच्या लोचनांमध्ये अश्रू पाहून निस्सीम भक्त हरी पाटीलसुद्धा भावुक झाले आणि त्यांनी महाराजांना हात जोडून लीनतेने विचारले, “महाराज, आपल्या नेत्री अश्रू का आलेत? किंवा माझ्याकडून सेवेत काही चुकी झाली?”
यावर महाराजांनी हरी पाटलांचा हात हातात घेतला व त्यांना म्हणाले, “मी कितीही सांगितले तरी त्याचे वर्म तुला कळणार नाही. तो विषय अतिषय खोल आहे. तू काही त्यामध्ये पडू नकोस. इतकेच सांगतो ते ऐकून घे. आता माझी संगत थोड्या वेळापुरती आहे. आता शेगावास चला.” हे सांगत असतानाच महाराजांनी हरी पाटील यांना तसेच पाटील वंशाला “तुमच्या पाटील वंशाला काही कमी पडणार नाही” असा आशीर्वाद दिला.
पंढरपूर येथून महाराज परत शेगाव येथे आले. हरी पाटलांना चिंता वाटू लागली. त्यांनी सर्व मंडळींना पंढरपूर येथे घडलेला वृत्तान्त सांगितला.
असा श्रावण मास गेला. भाद्रपद मास सुरू झाला. मधल्या काळात महाराजांची तब्येत एकदम क्षीण झाली. गणेश चतुर्थी दिवशी महाराजांनी सर्व भक्तांना जवळ बोलावले आणि सांगितले,
“गणेश चतुर्थीचे दिवशी।
महाराज म्हणाले अवघ्यांसी॥
आता गणपती बोळवण्यासी।
यावे तुम्ही मठात॥३॥
कथा गणेशपुराणांत।
ऐशापरी आहे ग्रथित॥
चतुर्थीच्या निमित्त।
पार्थिव गणपती करावा॥४॥
त्याची पूजा-अर्चा करून।
नैवेद्य करावा समर्पण॥
दुसरे दिवशी विसर्जून। बोळवावा जलामध्ये॥५॥
तो दिवस आज आला।
तो साजरा पाहिजे केला॥
या पार्थिव देहाला।
तुम्ही बोळवा आनंदे॥६॥
अशा अवस्थेत देखील महाराजांनी भक्त मंडळींना शब्द दिला,
दुःख न करावे यत्किंचित।
आम्ही आहो येथे स्थित॥
तुम्हा सांभाळण्याप्रती सत्य।
तुमचा विसर पडणे नसे॥७॥”
आणि याप्रमाणे आजतागायत श्री महाराजांच्या या आश्वासक शब्दांची प्रचिती भक्त मंडळींना नियमित येते. यापुढील लेखात श्री महाराजांच्या समाधी सोहळ्याचे वर्णन येईल.
क्रमशः