Tuesday, October 8, 2024
Homeताज्या घडामोडीइगतपुरी-कसारा घाट क्षेत्रातील प्रस्तावित रेल्वे लाईनच्या सर्व्हेक्षणासाठी संसदेत आवाज!

इगतपुरी-कसारा घाट क्षेत्रातील प्रस्तावित रेल्वे लाईनच्या सर्व्हेक्षणासाठी संसदेत आवाज!

चौथ्या आणि पाचव्या लाईनच्या सर्व्हेक्षणाचे काम तातडीने करण्याची खासदार गोडसे यांची मागणी

नाशिक : मुंबई-नाशिक या दरम्यानचा प्रवास जलद गतीने व्हावा यासाठी खासदार हेमंत गोडसे यांच्याकडून सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. आज खासदार गोडसे यांनी संसदेत प्रश्न उपस्थित करून अवघ्या सभागृहाचे लक्ष वेधले.

मुंबई ते नाशिक या दरम्यानच्या प्रवासासाठी प्रवाशांना अडचणीचा ठरणाऱ्या इगतपुरी-कसारा या दरम्यानच्या घाट परिसरातील प्रस्तावित चौथ्या आणि पाचव्या रेल्वे लाईनच्या सर्व्हेक्षणाच्या कामाची प्रगती कोणत्या स्तरावर आहे असा सवाल करत प्रवाशांच्या वेळची बचत होणेकामी तातडीने चौथ्या आणि पाचव्या रेल्वे लाईनच्या सर्व्हेक्षणाचे काम पूर्ण करण्यात यावे अशी आग्रही मागणी खासदार गोडसे यांनी केली आहे.

मुंबईकडून नाशिकला जाणाऱ्या सर्व रेल्वेगाडयांना इगतपुरी ते कसारा या दरम्यानच्या लोहमार्गावरूनच धावावे लागते. इगतपुरी ते कसारा हे १६ कि.मी. चे अंतर असून या दरम्यानच्या घाट परिसरांत पूर्वीपासून असलेले टनल हे कमी व्यासाचे आहेत. यामुळे रेल्वे गाड्यांना वाढीव इंजिन ,बॅकर्स लावण्याची गरज असते. परिणामी इगतपूरी – कसारा या दरम्यानच्या घाट परिसरात सतत रेल्वेगाडया थांबवाव्या लागत असल्याने प्रवासास विलंब होतो. याबरोबरच बँकरवर मोठा खर्चही होतो. यावर उपाय म्हणून कसारा ते इगतपुरी या दरम्यानच्या रेल्वेलाईनची चढाई कमी व्हावी आणि चौथ्या व पाचव्या रेल्वे लाईनच्या कामाला प्रारंभ व्हावा यासाठी खा. गोडसे यांचा केंद्राकडे पाठपुरावा सुरू आहे.

इगतपुरी -कसारा या दरम्यानच्या घाट परिसरातून सुमारे दिडशे मालगाडया आणि प्रवासी रेल्वे गाडया धावतात. उंच घाट असल्याने सर्वच रेल्वे गाडया कमी वेगाने चालतात. यातून प्रवाशांना दिलासा मिळावा तसेच प्रवास जलद गतीने व्हावा यासाठी खा. गोडसे यांनी आज थेट संसदेतच आवाज उठवला. मुंबई -नाशिक या दरम्यानच्या प्रवासासाठी कसारा घाट हा मुख्य अढथळा आहे. स्वतंत्र मिळून पंच्याहत्तर वर्ष झाली असली तरी घाट परिसरातील परिस्थितीत बदल झालेला नसल्याचे खा. गोडसे यांनी केंद्र सरकारच्या निदर्शनास आणून दिले. इगतपुरी – कसारा या दरम्यानच्या घाट परिसरातील प्रस्तावित चौथ्या आणि पाचव्या रेल्वे लाईनच्या सर्वक्षणाचे कामाची प्रगती कोणत्या स्तरावर आहे असा सवाल करत प्रवाशांच्या वेळची बचत होणेकामी तातडीने चौथ्या आणि पाचव्या रेल्वे लाईनचे सर्वेक्षण लवकर पूर्ण करून कामाला प्रारंभ करावा अशी आग्रही मागणी खा.गोडसे यांनी केली आहे.दरम्यान कसारा घाट हा देशातील सर्वात मोठया चढाईच्या घाटांपैकी एक घाट असून घाट १:३७ ग्रेडीयंटचा आहे. घाटाची चढाई कमीत कमी होण्यासाठी प्रयत्न सुरू असून त्या अनुषंगाने चौथ्या आणि पाचव्या रेल्वे लाईनचे सर्व्हेक्षण आणि डिझाईनचे काम वेगाने सुरू असल्याची माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी खा. गोडसे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना दिली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -