Friday, October 4, 2024
Homeताज्या घडामोडीSharmila Thackeray : दिड वर्षापूर्वी अदानी मातोश्रीवर का आले होते?

Sharmila Thackeray : दिड वर्षापूर्वी अदानी मातोश्रीवर का आले होते?

मी माझ्या पुतण्यावर विश्वास ठेवला पण तुम्ही तुमच्या भावावर विश्वास ठेवलात का?

शर्मिला ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर प्रश्नांचा भडीमार

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) आणि दिशा सालियान (Disha Salian) मृत्यू प्रकरणात भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी सातत्याने ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणी आता एसआयटी (SIT) समिती स्थापन करण्यात आली असून आदित्य ठाकरेंची कसून चौकशी केली जाणार आहे. दरम्यान, आदित्य असं करेल असं वाटत नाही अशी प्रतिक्रिया मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे (Sharmila Thackeray) यांनी दिली होती. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) शर्मिला यांचे आभार मानले होते. मात्र, यावर शर्मिला ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना चांगलेच सुनावले आहे. ‘मी माझ्या पुतण्यावर विश्वास ठेवला पण तुम्ही तुमच्या भावावर कधी विश्वास ठेवलात का?’ असा जोरदार टोला त्यांनी लगावला आहे.

‘अदानींना प्रश्न केला, चमचे का वाजू लागलेत?’ असं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंबद्दल केलं होतं. या टीकेला शर्मिला ठाकरेंनी चोख प्रत्युत्तर दिलं आहे. शर्मिला ठाकरे म्हणाल्या, दीड वर्षांपूर्वी अदानी मातोश्रीवर भेटायला कशाला गेले होते हे तुम्ही शोधा. उद्धव ठाकरे अडीच वर्ष मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांचे हात धरले होते का? चांगले निर्णय घ्यायला त्यांना कोणी थांबवलं होतं? सर्व विरोधी पक्ष नेते म्हणतात की, आरक्षण द्या पण मराठा आरक्षण त्यांनी का दिलं नाही? तुम्हाला कोणी थांबवलं होतं? शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत बसला होतात. धारावीचा पुनर्विकास करायचा होता मग तुम्ही का केला नाही? असं स्पष्ट मत शर्मिला ठाकरे यांनी व्यक्त केलं आहे.

पुढे शर्मिला ठाकरेंनी एक जोरदार टोला हाणला आहे. त्या म्हणाल्या, मी माझ्या पुतण्यावर विश्वास दाखवला. पण उद्धव ठाकरेंनी आम्हाला आभार मानायची संधी कधीच दिली नाही. लहान भावाला कायम बोलतात, टोमणे मारायची संधी सोडत नाहीत. आमच्यावर अजून त्यांचे आभार मानायची वेळ कधी आली नाही, अशा शब्दांत शर्मिला यांनी उद्धव ठाकरेंना फटकारले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -