Tuesday, November 5, 2024
Homeसंपादकीयतात्पर्यसावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळ संभाजीनगर, ‘मदत व पुनर्वसन कार्य’

सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळ संभाजीनगर, ‘मदत व पुनर्वसन कार्य’

संभाजीनगर इथल्या सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळाच्या वतीने होणाऱ्या विविध सामाजिक कार्याची माहिती आपण घेत आहोत. आत्तापर्यंत आपण आरोग्य, कौशल्य विकास, शाश्वत विकास, शिक्षण या क्षेत्रातील मंडळाच्या कार्याची माहिती घेतली. आज आपण मदत आणि पुनर्वसन क्षेत्रांमध्ये मंडळ काय काम करते आहे त्याची माहिती घेऊ या. या विभागा अंतर्गत दुष्काळी परिस्थिती, पूरसदृश्य परिस्थिती, भूकंप, कोरोना काळ अशा आपत्कालीन स्थितीत मदत दिली जातेच. त्याशिवाय समाजातल्या दुर्लक्षित गटासाठीही मदतीचा हात दिला जातो. वृद्धांसाठी विशेषतः जे वृद्ध आजारी आहेत किंवा ज्या वृद्धांची सेवा करायला कोणी नाही, अशांसाठी खूप मोठं काम मंडळाच्या मार्फत केलं जात आहे. डॉक्टर हेडगेवार रुग्णालय १९८९ साली सुरू झालं. त्यानंतर लगेचच खरं तर अशा प्रकारच्या मदत आणि पुनर्वसन कामांना छोटी-मोठी सुरुवात झाली होती. २०१० साली संभाजीनगरमध्ये एका हॉटेलमध्ये स्फोट झाला. या स्फोटामध्ये मागील वस्तीत भटके, विमुक्त, गोसावी समाजाचे लोक राहत होते. त्यातील ४० जण मृत्युमुखी पडले होते. त्यांच्या कुटुंबीयांना मदत देण्याचे काम मंडळांनी केलं होतं.

कोरोना काळात लसीकरण, अन्नधान्याचे वाटप तसेच आरोग्य सुविधा मोठ्या प्रमाणावर सेवा वस्त्यांमध्ये पुरवण्याचे काम मंडळानी केलं. किल्लारीमध्ये आलेला भूकंप, भूजच्या भूकंपावेळीही मंडळाने मदत दिली. मध्यंतरी पश्चिम बंगालमध्ये मोठा पूर आला होता. तेव्हासुद्धा मंडळानं बरीच मोठी आर्थिक मदत तिथे पुरवली होती. ईशान्यकडील राज्यांमध्येही संघाचं खूप मोठं काम चालतं. मेघालयसारख्या छोट्या राज्यात चांगल्या वैद्यकीय सुविधा पुरवाव्यात यासाठी मंडळांने साखळी पद्धतीने काही डॉक्टरांनी सलग ४० दिवस जाऊन राहायचं आणि तिथल्या लोकांना वैद्यकीय सेवा पुरवायची, अशी योजना राबवली होती. संभाजीनगरमधले अनेक डॉक्टर्स सलग ४० दिवस मेघालयमध्ये राहून वैद्यकीय सुविधा तसेच तपासणी, उपचार करून आले होते.

मराठवाड्यात पाणीटंचाई आणि दुष्काळ काही नवीन नाही. दुष्काळी परिस्थितीत जनावरांना चारा छावणी पुरवण्याचे कामही संस्था करीत आली आहे. ही सर्व कामे कालानुरूप असतात; परंतु सध्याचं मुख्य काम सुरू आहे ते म्हणजे विनाधार वृद्धांना सन्मानपूर्वक घरपोच दर्जेदार भोजन पोहोचवणं. डॉ. बाबासाहेब आंबेडकर वैद्यकीय प्रतिष्ठान, गुरुवर्य लहुजी साळवे आरोग्य केंद्र, सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळाच्या वतीने देवकीनंदन गोपाला क्षुधा सन्मान योजना सेवावस्तीतील (झोपडपट्टी वस्तीतील) ज्यांना कुणी सांभाळत नाही अशा, असहाय्य, ज्यांचे हात-पाय हलत नाहीत, अशा (दिव्यांग) व्यक्तींसाठी चालवले जाते. ६५ वर्षांवरील वयोगटातील वयोवृद्ध आजी-आजोबांना घरपोच, सन्मानाने, स्वादिष्ट, रुचकर ताजे गरम जेवण दिले जाते.

सध्या मिलिंदनगर, महूनगर, राजूनगर, मुरलीधर नगर, कबीर नगर, नागसेन नगर, फुले नगर, मुकुंदवाडी, संजयनगर, रमाई नगर, ब्रिजवाडी, नारेगाव अशा १३ वस्त्यांमधील ३०० जणांना जेवण दिले जाते. भविष्यात एक हजार व्यक्तींपर्यंत पोहोचायचा संस्थेचा उद्देश आहे. छत्रपती संभाजी नगर शहर “भूकमुक्त ज्येष्ठ” करण्याचे लक्ष आहे.सेवावस्तीतील लोक आपला उदरनिर्वाह करण्यासाठी माती काम, धुणी-भांडी, घरकाम, मोलमजुरी करतात. कोव्हिड काळात यांचे काम गेले. त्यांना खान्यापिण्याच्या समस्या निर्माण झाल्या. त्यावेळी ३ हजारांवर कुटुंबांना धान्य किट, भोजन देण्यात आले होते. त्या दरम्यानच्या काळात तरुण प्रौढ व्यक्ती समोर येऊन हे किट मिळवत असत, पण कोरोना काळात सुरक्षेच्या कारणास्तव वयोवृद्ध व्यक्तीला बाहेर फिरायला मज्जाव होता. म्हणून हा वयोगट दुर्लक्षित झाला. म्हणून मंडळातर्फे ज्यांना कुणीही सांभाळत नाही अशा व्यक्तींचे सर्वेक्षण करण्यात आले. सुरुवातीला ७० वयोवृद्ध व्यक्ती सर्वेक्षणात आढळले. मग यावर काम करण्याची योजना तयार केली.

१ एप्रिल २०२१ पासून या कार्याला सुरुवात झाली. ज्या आजी-आजोबांना कुणीही नाही, त्यांचा कुणी सांभाळ करत नाही. त्यामुळे आपला उदरनिर्वाह करण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी हात पसरून, मागून खावं लागते. घरीही खूप तिरस्काराने वागणूक दिली जाते. हात-पाय हलत नाहीत, त्यामुळे कुठलेही काम करून पोट भरता येत नाही आणि तब्बेतही साथ देत नाही. औषधासाठी दुसरीकडे हात पसरावे लागतात. त्यांच्यासाठी ‘देवकीनंदन गोपाला क्षुधा सन्मान योजना’ सुरू करण्यात आली. संत गाडगेबाबांनी “देवकीनंदन गोपाला” हा मंत्र दिला होता आणि त्यांनी भुकेल्याला अन्न, तहानलेल्यांना पाणी, मुलांना शिक्षण, स्वच्छता या कामासाठी संपूर्ण आयुष्य वेचल होतं. त्यांच्या शिकवणुकीला अनुसरून ही योजना असल्यामुळे त्याला “देवकीनंदन गोपाला क्षुधा सन्मान योजना” असं नाव देण्यात आलं. सुरुवातीला इस्कॉनच्या मदतीने ७० जणांना डबे सुरू केले गेले. जून २०२१ नंतर काही कारणास्तव इस्कॉनकडून मदत शक्य झाली नाही. मग शहरातील उद्योजक राजकुमारजी खिवंसरा यांच्या पुढाकाराने या प्रकल्पाला पुनर्जीवन मिळाले. राजकुमारजी हे १९९१-९२ पासूनच संस्थेच्या कामाशी निगडित आहेत. संस्थेला वारंवार सहाय्य करत असतात.

ते स्वतः एकदा आजारी पडले असताना हेडगेवार रुग्णालयात दाखल झाले होते. आयसीयूमधून त्यांना चुकून जनरल वाॅर्डमध्ये शिफ्ट केलं गेलं तरीही ते काहीच बोलले नाहीत. त्यांना जनरल वॉर्डमध्ये असं आढळून आलं की, इथले पेशंट दोन दोन दिवसांची आणलेली भाकरी खात आहेत. त्यांना जेवण मिळत नाही. ते पाहिल्यावर त्यांनी स्वतःला घरून येणाऱ्या डब्याबरोबर घरातल्यांना अन्य पाच डबे द्यायला सांगितले आणि इथेच गरिबांना अशा प्रकारचे डबे द्यायला हवेत, अशी ठिणगी त्यांच्या मनात पेटली. सुरुवातीला आठ डबे ते देऊ लागले. आता त्याची संख्या ३०० वर पोहोचली आहे. ते ३०० जणांना सकाळचा उत्तम नाष्टा, दुपारच्या जेवणाचा, रात्रीच्या जेवणाचा डबा पुरवतात. त्याच दरम्यान इस्कॉनची मदत बंद झाल्यानंतर काका खिंवसरा म्हणाले की, त्यांची मदत बंद झाली तर मी मदत देतो आणि अशा रितीने त्यांनी वृद्धांना हे डबे द्यायला सुरुवात केली. त्यांच्या एका जुन्या बंगल्याचं त्यांनी मोठ्या किचनमध्ये रूपांतर केलं असून त्या ठिकाणी हे जेवण बनतं. आजमितीला जवळजवळ ७०० ते ८०० जणांना त्यांच्याकडून दररोज जेवण जाते.

दरम्यानच्या काळात हा विषय प्रोजेक्टच्या स्वरूपात संस्थेनं लिहिला आणि सीसीआयएल (Clearing Corporation of India Ltd) यांच्याकडे अर्थसहाय्यासाठी पाठवण्यात आला. अर्थसाहाय्याला मंजुरी मिळाल्यामुळे १ जुलै २०२२ पासून या कामाला आणखी गती अली. नवीन दोन वस्त्या जोडल्या गेल्या. २०० डबे वाढवून एकूण ३०० डबे सुरू करण्यात आले. हे जेवण वृद्धांना घरपोच पोहोचवलं पाहिजे म्हणून वाहतुकीसाठी तीन इलेक्ट्रॉनिक्स रिक्षा घेण्यात आल्या आहेत. त्यावर तीन रिक्षाचालक नियुक्त करण्यात आलेत. १० च्या सुमारास काल्डा कॉर्नर येथून मोठ्या डब्यांमध्ये १०० जणांची टीम वेगवेगळ्या सेटमध्ये जेवण घेऊन जातात. डबे वाटपासाठी वस्तीत स्वेच्छा कार्यकर्ते नियुक्त करण्यात आले आहेत. त्यांनाही एक डबा दिला जातो. ज्यांना सामाजिक काम करण्याची आवड आहे, असे कार्यकर्ते आहेत. ते प्रत्येक घरी जाऊन सन्मानपूर्वक जेवण देतात. आपल्या वस्तीतील आजी-आजोबांना घरपोच जेवण देण्याचे काम स्थानिक कार्यकर्ते करत आहेत.

सध्या ५५ स्वेच्छा कार्यकर्त्यांच्या मदतीने ३०० आजी-आजोबांना घरपोच दररोज न चुकता जेवण दिले जाते. सण, उत्सव, जयंती कार्यक्रमात भजी, पुरी-भाजी, लापशी, शिरा, आमरस यांसारखे गोड पदार्थही दिले जातात. त्यामुळे आपुलकीच्या या दोन घासाने निराधार वृद्धांच्या जीवनात आनंद फुलत आहे. या योजनेमुळे काही फायदे सुद्धा झाले. आपल्या वृद्ध आई-वडिलांना बाहेरून अशा प्रकारचे जेवण येतं हे पाहून काही कुटुंबातील मुलं खजिल झाली आणि त्यांनी आई-वडिलांना जेवण द्यायला, पाठवायला सुरुवात केली, असे देखील अनुभव आले आहेत किंवा एखाद्या दांपत्याची गरज भागली तर ते आपण होऊन सुद्धा आता डबा बंद करा, आमची गरज भागली आहे, असेही आपणहून सांगतात. या योजनेमुळे संस्थेच्या बाबतीत सेवा वस्त्यांमध्ये अतिशय विश्वासाचं नात निर्माण झालं आहे, असं या प्रकल्पाचे प्रमुख डॉ. दिवाकर कुलकर्णी यांनी सांगितलं. यासाठी प्रकल्प संचालक पिराजी कमले तसेच प्रकल्प समन्वयक प्रभाकर माळवेही खूप मेहनत घेत असतात. अशा रीतीने आपत्कालीन स्थितीमध्ये अडकलेल्या नागरिकांना मदत करण्यास तसेच अचानक आलेल्या नैसर्गिक आपत्तीमध्ये ही मदत करण्यासाठीसुद्धा सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळ कार्यरत आहे.

joshishibani@yahoo. com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -