प्रिया बैरागी
निफाड : नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयातील सरकारी बाबूच्या दप्तर दिरंगाईमुळे निफाड नगरपंचायतीच्या १३ कर्मचाऱ्यांवर मोठा अन्याय झालेला असून या प्रश्नाची सोडवणूक होत नसल्यामुळे या कर्मचाऱ्यांना अतिशय कडाक्याच्या थंडीत आमरण उपोषणाचा मार्ग पत्करावा लागलेला आहे.
निफाड नगरपंचायतीच्या प्रवेशद्वारावर सोमवारपासून या उपोषणास प्रारंभ करण्यात आला आहे. आंदोलनाचे नेते आणि उपोषणार्थी बाबूलाल थोरात यांनी याविषयी आपली भूमिका स्पष्ट करताना आणि अधिक माहिती देताना सांगितले की, शासन निर्णयानुसार ग्रामपंचायत स्तरावरून नगरपंचायत मध्ये रूपांतर झालेल्या निफाड नगरपंचायतीच्या पात्र कर्मचाऱ्यांचे समायोजन होणे आवश्यक होते. २०१५ पासून प्रलंबित असलेल्या या प्रश्नाची सोडवणुक होणे गरजेचे होते. राज्यातील अन्य जिल्ह्यांमध्ये दीड वर्षांपूर्वीच हा प्रश्न सुटलेला आहे मात्र नाशिक येथील जिल्हाधिकारी कार्यालयाला वारंवार शासनाने सुचित करून देखील आणि काल मर्यादा घालून दिलेली असताना सुद्धा जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे आणि दप्तर दिरंगाईमुळे निफाड नगरपंचायतीचे तब्बल तेरा कर्मचारी आपल्या न्याय हक्कांपासून सातत्याने वंचित राहिलेले आहेत. त्यांना इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे सातव्या वेतन आयोगाचे लाभ मिळू शकलेले नाहीत. त्यांच्या वेतनात देखील इतर कर्मचाऱ्यांपेक्षा मोठी तफावत पडत असल्याने त्यांना मोठा आर्थिक भर दंड सोसावा लागत आहे.या उलट निफाड तालुक्यातील ओझर नगरपंचायतीची निर्मिती नंतरच्या काळात होऊन देखील तेथील कर्मचाऱ्यांना समायोजन प्रक्रियेचा लाभ मिळालेला आहे.पर्यायाने निफाड नगरपंचायतीच्या या तेरा कर्मचाऱ्यांना सेवा जेष्ठते पासून देखील वंचित राहावे लागलेले आहे. या सर्व गोष्टींमुळे या कर्मचाऱ्यांना असह्य असा त्रास होत असून शासनाने तातडीने या गोष्टींची दखल घेऊन आपल्यावरील अन्याय दूर करावा असे आवाहन बाबुलाल थोरात आणि त्यांचे सहकारी कर्मचारी सर्वश्री एकनाथ सताळे, सूर्यभान झाल्टे, मनोज ढकोलिया, सुनील मोरे, सिद्धार्थ जगताप, किरण माळी, अनिल बागुल, मच्छिंद्र बर्डे, प्रवीण राऊत, शोभा कुऱ्हाडे, मच्छिंद्र पवार, आणि अरुण गायकवाड यांनी केले आहे.
निफाड नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष शारदा कापसे, उपनगराध्यक्ष अनिल पाटील कुंदे, सर्व नगरसेवक, मुख्य अधिकारी अमोल चौधरी तसेच महाराष्ट्र राज्य नगर परिषद नगरपंचायत कर्मचारी संघटनेचे शहराध्यक्ष शरद काकुळते, राज्य सदस्य जालिंदर पवार, आणि सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आंदोलकांना आपला पाठिंबा व्यक्त केला आहे.