नागपूर : नवी मुंबई परिसरात सिडकोमार्फत प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत विविध गृहनिर्माण योजना राबविण्यात येत आहेत. या कामांमुळे निर्माण होणारी धूळ, प्रदूषण कमी करण्यासाठी सिडको तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत उपाययोजना करण्यात येत आहेत. या उपाययोजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी निर्देश देण्यात येतील, असे मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत सांगितले.
सदस्य अमीन पटेल यांनी नवी मुंबईत सुरू असलेल्या बांधकामामुळे होणारे प्रदूषण रोखण्यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. या अनुषंगाने झालेल्या चर्चेत सदस्य बच्चू कडू, प्रतिभा धानोरकर यांनी सहभाग घेतला.
लक्षवेधीला उत्तर देताना मंत्री सामंत म्हणाले, सिडको तसेच स्थानिक स्वराज्य संस्था करीत असलेल्या उपाययोजनांमुळे नवी मुंबईतील धुळीचे प्रमाण कमी होत आहे. यासंदर्भात कंत्राटदारांना देखील कायदेशीररित्या दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सर्वसामान्यांना धुळीचा त्रास होणार नाही, याची दक्षता घेण्यात येत आहे. अती प्रदूषण करणाऱ्या कंपन्यांविरुद्ध कारवाई करण्याची सूचना पर्यावरण विभागास केली जाईल तसेच अशा कंपन्यांबाबतचा अहवाल पुढील अधिवेशनात सादर केला जाईल, असे मंत्री सामंत यांनी अन्य एका उपप्रश्नाच्या उत्तरात सांगितले.