कसा होता अभिनेत्री अश्विनीचा बदलापूर ते मुंबईपर्यंतचा प्रवास?
मुंबई : अश्विनी कासार (Ashwini Kasar) ही मराठीतील तरुण आणि नवोदित अभिनेत्री आहे. अनेक मालिकांमधून ती घराघरांत पोहोचली आहे. तिने आपल्या चाहत्यांना नुकतीच एक खुशखबर दिली. अश्विनीला मुंबईत म्हाडाचं घर (Mhada House) लागलं आहे. आपल्या नव्या घरातील गृहप्रवेशाचा आणि कुटुंबियांसोबत पूजा करतानाचा व्हिडीओ शेअर करुन तिेने ही माहिती दिली आहे. यापूर्वी अभिनेता अक्षय केळकर (Akshay Kelkar) आणि पृथ्वीक प्रताप (Pruthvik Pratap) यांनाही म्हाडाचं घर लागलं होतं. आता अश्विनीला देखील मुंबईत हक्काचं घर मिळाल्याने तिचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.
अश्विनीचं महाविद्यालयीन शिक्षण रुईया कॉलेजमध्ये झालं. तेव्हा ती बदलापूरला राहत होती. त्यामुळे रोज मुंबई ते बदलापूर प्रवास प्रचंड वेळखाऊ आणि धकाधकीचा असायचा. आपला हा अनुभव शेअर करत अश्विनी म्हणाली, “आपण काम करत असलेल्या क्षेत्रामुळे आणि काम करतोय त्या शहरात हक्काचं स्वतःचं घर होणं…हे एकतर स्वप्न आहे किंवा कधी काळी पाहिलेलं स्वप्न प्रत्यक्षात उतरलंय…खूप संमिश्र भावना आहेत. माझ्या वाढदिवशी आनंद द्विगुणीत करणारी गोष्ट तुम्हा सगळ्यांनाही सांगण्यासाठी हा शब्दप्रपंच.”
“काही वर्षांपूर्वी बदलापूरपासून सुरू झालेल्या माझ्या प्रवासामुळे दिवसाच्या शेवटी माझ्या राहत्या घरापर्यंत मी पोहोचू शकायचे नाही. पण माझ्या मित्र मैत्रिणींनी, त्यांच्या (आणि आता माझ्याही) कुटुंबियांनी, नातेवाईकांनी मला घराची उणीव कधी जाणवू दिली नाही. नुसतं घरच नाही तर ‘घरपण’ सुद्धा दिलं. त्यासाठी मी त्यांची कायम ऋणी आहे. तरीही माझ्या एकत्र कुटुंबाच्या प्रेमापोटी आणि ‘आपलं घर ते आपलं घर’ या भावनेपोटी मी बदलापूर गाठायचे. रात्री बेरात्री केलेला प्रवास, तब्येतीच्या तक्रारी, मनावर दगड ठेवून घेतलेले निर्णय आणि तरीही अभिनय क्षेत्रावरचं प्रेम, कामाप्रती श्रद्धा, जिद्द, आसू आणि हसू हे सगळं सगळं आठवतंय. सगळं ‘Worth’ वाटतंय. आता कंबर कसून जास्त छान काम करू ही ताकद या घराने दिली आहे. ‘मुंबई’ने आपलं म्हटलं बुवा एकदाचं असं काहीसं वाटतंय…माझं घर मिळण्याच्या प्रवासात खूप जणांनी मदत केली आहे. त्या सगळ्यांचे मनापासून आभार. म्हाडा आणि महाराष्ट्र शासनाचे आभार…तुम्हा सर्वांचे आशीर्वाद आणि प्रेम यांच्या प्रतीक्षेत मी आणि माझं घर कायम असू…भावना समजून घ्याल याची खात्री आहे…- अश्विनी कासार,” असं अश्विनीनं लिहिलं आहे.
View this post on Instagram
अश्विनीच्या या पोस्टवर कलाकार मंडळीसह चाहत्यांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत. ‘कमला’ या मालिकेतून तिला प्रसिद्धी मिळाली होती. यानंतर तिने ‘मोलकरीण बाई’, ‘सावित्रीजोती’, ‘कारण गुन्ह्याला माफी नाही’ या मालिकांमध्ये काम केलं. शिवाय तिने काही चित्रपटांतही भूमिका साकारल्या आहेत.