- गुंतवणुकीचे साम्राज्य : डॉ. सर्वेश सुहास सोमण
मागील आठवड्यात निर्देशांकात पुन्हा मोठी तेजी झाली. मागील काही आठवड्यात निर्देशांकात मोठ्या प्रमाणात तेजी झालेली आहे. पुढील आठवड्यासाठी निर्देशांक निफ्टीची २०,८०० ही अत्यंत महत्त्वाची खरेदीची पातळी आहे. निर्देशांक जोपर्यंत या पातळीच्यावर आहेत, तोपर्यंत निर्देशांकातील तेजी टिकून राहील.
आपण यापूर्वीच सांगितल्याप्रमाणे मध्यम मुदतीच्या चार्टनुसार मात्र निर्देशांक हे अजूनही तेजीत असून निर्देशांकानी मध्यम मुदतीच्या चार्टनुसार तेजी सांगणारी विशेष रचना यापूर्वीच तयार केलेली होती. या रचनेनुसार आता निर्देशांकात मोठी वाढ होणे अपेक्षित होते. त्यानुसार केवळ १ महिन्यातच मोठी वाढ झालेली आहे. अल्पमुदतीसाठी मास्टेक, एचसीएल टेक, टीसीएस, एसबीआय यासह अनेक शेअर्सची दिशा तेजीची आहे. मध्यम मुदतीच्या चार्टनुसार “नायका” या शेअरमध्ये तेजी सांगणारी रचना तयार झालेली असून जोपर्यंत हा शेअर १४२ रुपये किमतीच्यावर आहे तोपर्यंत या शेअरमधील तेजी कायम राहील.
आपण यापूर्वीच सांगितल्याप्रमाणे कमोडीटी मार्केटमध्ये टेक्निकल अॅनालिसिसनुसार मध्यम मुदतीसाठी ‘सोने’ या मौल्यवान धातूची दिशा तेजीची आहे. जोपर्यंत सोने ६१,००० या पातळीच्यावर आहे तोपर्यंत सोन्यामधील तेजी कायम राहील. या आठवड्यात चांदी या धातूमध्येदेखील मोठी वाढ झाली. या मोठ्या वाढीनंतर अल्पमुदतीच्या चार्टनुसार चांदीची दिशा आणि गतीची तेजीची आहे. टेक्निकल अॅनालिसिसनुसार मध्यम मुदतीसाठीदेखील चांदी या मौल्यवान धातूची दिशा आणि गती ही तेजीची असून जोपर्यंत चांदी ७१,००० या पातळीच्या वर आहेत तोपर्यंत चांदीमधील तेजी कायम राहील. या काही आठवड्यात देखील कच्च्या तेलात घसरण झाली. मध्यम मुदतीच्या चार्टनुसार कच्चे तेल अजूनही मंदीत असून पुढील काळात कच्च्या तेलात होणारी तेजी ही मंदीची उत्तम संधी असेल. आता जोपर्यंत कच्चे तेल ६,२५०च्या खाली आहे, तोपर्यंत कच्च्या तेलात पुन्हा घसरण होऊ शकते. सध्या कच्च्या तेलात होत असलेली हालचाल पाहता कमीत कमी जोखीम घेवूनच त्यामध्ये ट्रेड करावा. ट्रेड करत असताना स्टॉपलॉस चा वापर करणे अत्यंत आवश्यक आहे. करन्सी मार्केटमध्ये डॉलर तेजीत असून पुढील काळात जोपर्यंत डॉलर ८२ रुपयाच्या खाली जाणार नाही, तोपर्यंत डॉलर पुन्हा मंदीत येणार नाही. सध्या निर्देशांक फंडामेंटल बाबतीत महाग झालेले असून गुंतवणूक करीत असताना सावधानतापूर्वक योग्य शेअर्सची निवड करूनच गुंतवणूक करावी. कोणतीही गुंतवणूक करीत असताना स्टॉपलॉसचा वापर करणे अत्यंत आवश्यक आहे. पुढील काळात निर्देशांकात मोठे करेक्शन येणे अपेक्षित आहे. सध्या निर्देशांकात फार मोठी वाढ अल्पावधीत पहावयास मिळालेली असल्याने निर्देशांक उच्चांकाला आहेत. त्यामुळे सध्या जास्तीत जास्त “होल्ड कॅश इन हॅंड” हेच धोरण अवलंबणे योग्य ठरेल. पूर्वी खरेदी केलेल्या शेअर्समध्ये स्टॉपलॉस पद्धतीचा वापर करावा.
(सूचना: लेखकाची तसेच त्यांच्या जवळच्या नातेवाइकांची लेखात सुचवित असलेल्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये कोणतीही गुंतवणूक नाही किंवा सुचविलेल्या कंपन्यांशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून कंपनीकडून कोणतेही मानधन किंवा भेटवस्तू घेतलेली नाही)