स्थानिक नागरिकांमध्ये नाराजी
सिडको : अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांची अवघ्या तीन महिन्यांत प्रशासकीय कारण दाखवत दुस-यांदा नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली असून वर्षभरात या पोलीस ठाण्याने पाच पोलिस निरीक्षक पाहिल्याने पोलीस आयुक्तालयाच्या कारभारावर आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
या बदलीला गेल्या आठवड्यात पवन नगर परिसरात मध्यरात्रीच्या दरम्यान भाजपाच्या एका माजी नगरसेवकावर किरकोळ कारणावरुन झालेल्या वादातुन जीवे मारण्याच्या उद्देशाने एका संशयीताने हवेत गोळीबार केला याप्रकरणी तपास कामात हलगर्जीपणा केल्याचे कारण चर्चेत असले तरी त्या पेक्षाही गंभीर आरोप असलेल्या पोलिस निरीक्षकांना अभय देणारे गृह खाते अंबड पोलीस ठाण्याच्या संदर्भात एव्हढे संवेदनशील का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. दरम्यान पोलीस आयुक्त संदिप कर्णिक यांनी स्वतः लक्ष घातले असून वाघ यांच्या बदलीचे तोंडी आदेश दिल्याचे समजते.
अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ यांची १जुलै २०२३ रोजी या पदी नियुक्ती झाली. यानंतर त्यांनी अंबड पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या सर्व अधिका-यांसह कर्मचाऱ्यांकडून हद्दीची माहिती जाणून घेत प्रत्यक्षात कामकाजाला सुरुवात केली. कामकाज करत असतानाच त्रिमूर्ती चौकात सकल मराठा समाजाच्या वतीने साखळी उपोषण सुरू होते. याच काळात सकल मराठा समाजाच्या काही पदाधिकाऱ्यांनी आमदार सीमा हिरे यांच्या कार्यालयाला पोलिसांच्या डोळ्यादेखत टाळे लावले. एका सत्ताधारी विद्यमान आमदाराच्या कार्यालयाला पोलिसांसमोर टाळे लावून सुद्धा पोलिसांनी त्या कार्यकर्त्याच्या विरोधात कोणतीही कायदेशीर कारवाई न केल्याने प्रमोद वाघ यांची नियंत्रण कक्षात तडका फडकी बदली करण्यात आली. यावेळी आमदार हिरे यांनी मध्यस्थी करत प्रमोद वाघ यांना पुन्हा अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पदी नियुक्त केले.
या प्रकारला काही दिवस उलटत नाही तोच पवन नगर परिसरात मध्यरात्रीच्या दरम्यान भाजपाच्या एका माजी नगरसेवकावर किरकोळ कारणावरुन झालेल्या वादातुन जीवे मारण्याच्या उद्देशाने एका संशयिताने हवेत गोळीबार केला. याप्रकरणी तपास कामात हलगर्जीपणा केल्याच्या कारणावरुन अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ यांची तडकाफडकी बदली करण्यात आल्याचे समजते. या गोळीबार प्रकरणात मुख्य आरोपी अद्याप अटक नसल्याचे कारण या बदली मागे असावे अशी चर्चा आहे हे कारण खरे असेल तर आयुक्तालय हद्दीतील सर्वच पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात सर्वच आरोपी अटक झालेत का? त्या पोलिस ठाण्यांना वेगळा न्याय का? असाही सवाल स्थानिक नागरिक उपस्थित करीत आहेत.