- अर्थभूमी : उमेश कुलकर्णी
आजचा विषय थोडा वेगळा आहे. वाहन क्षेत्रात ज्या मारुती ८०० ने क्रांती घडवून आणली, नुकताच तिचा वाढदिवस साजरा झाला. त्या गाडीची ही कथा आहे. पहिल्या-वहिल्या मारुती ८०० चे मालक होते इंडियन एअरलाइन्सचे कर्मचारी हरपाल सिंग. त्यांनी ही कार १९८३ मध्ये खरेदी केली. याच आठवड्यात म्हणजे १४ डिसेंबर १९८३ रोजी तिची चावी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हस्ते हरपाल सिंग यांना देण्यात आली. त्यानंतर हरपालसिंग हे सेलेब्रिटी बनले होते. त्यांनी इंदिरा गांधी यांच्याकडून चावी घेतानाचे छायाचित्र व्हायरल झाले होते आणि हरपाल सिंग संपूर्ण देशाच्या नजरेत आले. पण त्यांनी मारुती ८०० आयुष्यसभर चालवली आणि त्यानंतर इतक्या गाड्या आल्या तरीही त्यांनी ती कार विकली नाही. त्यानंतर मध्यमवर्गाची ही लाडकी कार बनली. ती स्वस्त होती आणि तिने अनेक मध्यमवर्गीयांचे कार खरेदीचे स्वप्न पूर्ण केले होते.
२०१० मध्ये जेव्हा हरपाल सिंग यांचे निधन झाले, तेव्हा अनेकांनी या कारचे पुनरूज्जीवन करण्यासाठी ती खरेदी करण्याचा प्रयत्न केला. पण हरपाल सिंग यांच्या कुटुंबीयांनी ती विकण्यास नकार दिला. पण मारुती ८०० चे वैशिष्ट्य हे आहे की, वाहन क्षेत्रात या कारने क्रांती घडवून आणली. मारुती कार नंतर अनेक घराघरात दिसू लागली. पण पी.व्ही. नरसिंह राव यांनी जेव्हा देशाची अर्थव्यवस्था खुली केली, तेव्हा मध्यमवर्गाला त्याचा सर्वात लाभ झाला. मध्यमवर्गीयांची स्थिती सुधारली. पण मारुती ८०० चे स्थान अबाधित राहिले. १९८० मध्ये मारुती कारचा प्रवास सुरू झाला. संजय गांधी यांच्या काळात भारत सरकार आणि मारुती सुझुकी यांच्यातील मारुती ८०० हा संयुक्त प्रकल्प करण्यात आला होता. ९ एप्रिल १९८३ रोजी कारचे बुकिंग सुरू झाले आणि दोन महिन्यांत कारची संख्या १.३५ लाखपर्यंत पोहचली. स्वस्त किमत आणि चालवण्यास अत्यंत सोपी अशी ही कार होती. त्यामुळे ती भारतीयांची लाडकी बनली. भारतीय बाजारपेठेत तब्बल ३१ वर्षे ही कार आपला ठसा उमटवून होती. २०१४ मध्ये कंपनीने मारुती ८०० चे उत्पादन बंद केले. पण या कारमुळे मध्यमवर्गीयांचे स्वतःचे कार असण्याचे स्वप्न पूर्ण झाले. त्यानंतर कितीतरी स्वस्त कार आल्या. टाटांनी नॅनो आणली. तिची जाहिरात प्रचंड झाली. पण ती चालली नाही. कारण ती भारतीय रस्त्यांसाठी चांगली असली तरीही फारच लहान होती. मारुती ८०० नंतर वाहन क्षेत्रही सेलेब्रिटी बनले आणि आजही त्याची जादू कायम आहे. आजही स्वतःच्या मालकीची कार असणे हे प्रतिष्ठेचे समजले जाते. याच कारने बजाज स्कूटरची जागा घेतली. भारतातील स्थानिक औद्योगिक चित्र आणि भारताला वाहन क्षेत्रातील अग्रगण्य बनवण्यात मारुती ८०० ने अत्यंत मोलाची भूमिका बजावली. मारुती ८०० च्या नंतरच्या प्रवासात अनेक मनोरंजक कथा आहेत. या कारसाठी १ लाख २० हजार ग्राहकांनी दहा हजार रुपयांचे डाऊन पेमेंट केले होते. जेव्हा ही कार सुरू झाली, तेव्हा तिची किमत दिल्लीत ५२ हजार रुपये होती. त्यावेळचे भारताचे दरडोई उत्पन्न पहाता तेव्हाही ती महागच होती. पण मध्यमवर्गीयांसाठी ती परवडण्यासारखी होती. या कारची स्पर्धा ज्या परदेशी मोटारींशी होती, त्यात इम्पाला आणि शेवरोलेट, ब्रिटिश सेडान या कार होत्या. पण त्यांना मागे टाकून या कारने बाजारपेठेवर कब्जा केला होता. आपल्या कारकिर्दीत मारुती ८०० च्या २७ लाख कार विकल्या गेल्या. पण बीएसफोर हे कार्बन उत्सर्जनाचे निकष आल्यानंतर मात्र कंपनीने या कारला अलविदा करण्याचा निर्णय घेतला.
ही कार गरीब आणि श्रीमंत यांच्यात सारखीच लोकप्रिय होती. भारताच्या आर्थिक विकासात वाहन क्षेत्र हे सर्वात महत्वाचे घटक मानले जाते. मारुती ८०० ने त्या क्रांतीला सुरुवात झाली. वाहन क्षेत्राचे महत्व यावरूनही लक्षात येईल की, देशाच्या जीडीपीमध्ये वाहन क्षेत्राचा वाटा ७.१ टक्के इतका आहे. तर उत्पादन जीडीपीमध्ये त्याचा वाटा आहे तब्बल ४९ टक्के.
वाहन क्षेत्र रोजगार देणारे तिसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे क्षेत्र आहे. या वाहन क्षेत्राने आतापर्यंत आणि अजूनही १९ दशलक्ष लोकांना रोजगार पुरवले आहेत. शेती, बांधकाम यानंतर वाहन क्षेत्रच जास्तीत जास्त लोकांना रोजगार देणारे आहे. २०२४ पर्यंत भारतीय वाहन क्षेत्रातील उत्पादन क्षमता १५ लाखपर्यंत वाढवण्याची सरकारची योजना आहे. भारतीय वाहन क्षेत्राचा आकार १५ लाख कोटी असून तो दुप्पट करण्याचा सरकारचा इरादा आहे. तर वाहन क्षेत्रात दुचाकी आणि प्रवासी कारचा वाटा ७६ टक्के आहे. वित्तीय वर्ष २०२३ मध्ये वाहन क्षेत्राचे मूल्य ७.८० लाख कोटी रुपये इतके होते. मारुती ८०० बरोबरच भारतीय वाहन क्षेत्राचाही वाटा वाढत गेला होता. भारत ही आज जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनला आहे. यासाठी वाहन क्षेत्राचे योगदान प्रचंड आहे. भारताच्या आर्थिक प्रगतीत वाहन क्षेत्राचा वाटा मोठा असेल, असे खुद्द पंतप्रधान मोदी यांनी मत व्यक्त केले आहे.
देशाच्या आर्थिक प्रगतीतील वाहन क्षेत्राचा वाटा कसा असेल, असे सांगताना मोदी यांनी वाहन क्षेत्र प्रमुख चालक असेल, असेही म्हटले आहे. अर्थात वाहन क्षेत्र याहून अधिक वाढणार आहे आणि त्याची सुरुवात मारुती ८०० ने केली होती. मारुती ८०० ने केवळ भारतीय वाहन क्षेत्राचे चित्र बदलेल, असे नाही तर मारुती उद्योग लिमिटेड हा उद्योग वाहन क्षेत्रातील सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग प्रमुख भूमिका बजावणारा ठरला. १९९६-९७ मध्ये मारुती ८०० च्या १५ लाख कार विकल्या गेल्या. दिवसेंदिवस ही कंपनी मजबूत होत गेली. २००५-०६ मध्ये तर कंपनीने २५ लाख कार विकल्या. भारतीय लोकांसाठी हीच कार सुप्रीमो उनो होती. नॅनो आली तरीही तिची क्रेझ कमी झाली नाही. कंपनीचे अध्यक्ष आर सी भार्गव यांच्या मते हिंदुस्थान मोटर्स आणि प्रीमियर पद्मिनीला परदेशातून सुटे भाग आणण्यास मनाई करण्यात आली होती पण मारुती उद्योगाला तशी परवानगी देण्यात आली.
देशांतर्गत कार उत्पादक केवळ सेकंड हँड उत्पादने देऊ करत होते. मारुती कार ८०० नंतर अल्टो आली आणि तिनेही प्रचंड क्रेझ कमावली होती. पण भारतीयांची लाडकी कार म्हणून मारुती ८०० हीच राहिली. संजय गांधी यांचे नाव या कारशी जोडले गेल्याने सर्वांना हा राजकीय प्रकल्प आहे, असेच वाटत होते. तो होताही तसाच. पण इतरांच्या तुलनेत त्याला जास्त सवलती देण्यात आल्या. जगभरातील कार कंपन्याची हीच भावना होती. मारुती कारने जेव्हा इतर कार कंपन्यांशी भाग भांडवलासाठी संपर्क केला तेव्हा कुणीही ४० टक्के रोख देण्यास तयार झाले नव्हते. १९८० च्या दशकात केवळ दोन प्रकारच्या कार उपलब्ध होत्या. त्यात एक होती ती फियाट आणि अँबेसेडर. अँबेसेडरचे दिवाळे का वाजले आणि ती का बंद पडली, याची वेगळीच कथा आहे. पण ती असो. मारुती ८०० ने तत्कालीन मध्यमवर्गीयांना नवीन दार उघडून दिले आणि ते होते स्वस्त कारचे. त्याला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. मारुती कार ८०० चे आगमन झाले आणि ती गेमचेंजर ठरली.