Thursday, July 4, 2024
Homeताज्या घडामोडीDhananjay Munde : राज्यात आतापर्यंत ऐतिहासिक २२०६ कोटी अग्रीम पीकविमा मंजूर, १७००...

Dhananjay Munde : राज्यात आतापर्यंत ऐतिहासिक २२०६ कोटी अग्रीम पीकविमा मंजूर, १७०० कोटींचे वाटप तर उर्वरित ५०० कोटींचे वाटप सुरू – धनंजय मुंडे

नागपुर : प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत एक रुपयात पिक विमा योजनेची राज्य शासनाने यशस्वी अंमलबजावणी केली असून इतिहासात पहिल्यांदा महाराष्ट्र राज्यात अग्रीम २५ टक्के अंतर्गत आतापर्यंत २२०६ कोटी रुपये अग्रीम पीक विमा मंजूर करण्यात आला असून आतापर्यंत सतराशे कोटींपेक्षा अधिक रकमेचे वाटप करण्यात आले आहे व उर्वरित सुमारे ५०० कोटी रुपयांचे वाटप प्रगतीपथावर असल्याची माहिती लक्षवेधी सूचनेच्या निमित्ताने कृषीमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी विधानसभेत दिली.

धुळे जिल्ह्यातील पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना अग्रीम पीक विमा मिळाला नसल्याबाबत आमदार कुणाल पाटील यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती, यावरून धनंजय मुंडे यांनी धुळे जिल्ह्यातील वस्तुस्थितीदर्शक आकडेवारी विधानसभा सभागृहात सादर केली. धुळे जिल्ह्यातील पिक विमा संदर्भात निविदा प्रक्रियेत भाग घेतलेल्या एचडीएफसी या विमा कंपनीने अग्रीम अधिसूचनेच्या विरोधात जिल्हा प्रशासन, विभागीय आयुक्त कार्यालय तसेच राज्य शासनाकडे अपील केले असता हे अपील राज्यसरकारने फेटाळून लावले असून धुळे जिल्ह्यातील सुमारे अडीच लाख शेतकऱ्यांना ६९ कोटी रुपये इतका विमा आजपर्यंत अग्रीम अंतर्गत मंजूर करण्यात आला असल्याची माहिती देखील धनंजय मुंडे यांनी सभागृहात दिली.

हिंगोली जिल्ह्यामध्ये देखील एचडीएफसी इरगो ही विमा कंपनी नियुक्त असून या विमा कंपनीचे अपील केंद्रसरकारकडे प्रलंबित असून याबाबतची सुनावणी केंद्रसरकारकडून लवकरच केली जाईल व हिंगोली जिल्ह्यातील पिक विम्याचे देखील अग्रीम प्रमाणे वितरण लवकरच केले जाईल, अशी माहिती धनंजय मुंडे यांनी आमदार राजू नवघरे यांनी उपस्थित केलेल्या उपप्रश्नाच्या अनुषंगाने दिली.

दरम्यान राज्य शासनाने नव्याने सुरू केलेल्या एक रुपयात पिक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगाम २०२३ मध्ये इतिहासात पहिल्यांदाच महाराष्ट्रातील एक कोटी ७१ लाख शेतकऱ्यांनी सहभाग घेतला, तसेच आतापर्यंत अग्रीम अंतर्गत ७० लाखापेक्षा अधिक शेतकऱ्यांना अग्रीम पीक विम्याचा लाभ मिळाला आहे. या अंतर्गत मिळालेली २२०० कोटी रुपये रक्कम ऐतिहासिक आहे.

अनेक महसूल मंडळे पावसाचा दीर्घखंड, अतिवृष्टी यासारख्या प्रधानमंत्री पिक विमा योजनेच्या निकषांमध्ये बसत नव्हते मात्र आम्ही कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञ, हवामान तज्ज्ञ यासारख्या अनेकांची मदत घेऊन निकषांच्या पलीकडे जाऊन अग्रीम पिक विमा देण्यास विमा कंपन्यांना भाग पाडले, त्यामुळेच अग्रीम पीक विम्याची ऐतिहासिक रक्कम शेतकऱ्यांना मिळू शकली, याचा मला अभिमान वाटतो, असेही यावेळी धनंजय मुंडे यांनी आवर्जून नमूद केले.

चालू रब्बी हंगामात देखील मागील पाच वर्षांच्या आकडेवारी पाहता राज्यातून ७१ लाखापेक्षा अधिक शेतकऱ्यांनी रब्बी पिकांचा विमा भरला आहे. सध्या चर्चेत असलेल्या हरभरासारख्या विविध पिकांचे नुकसान झाल्याच्या अनेक तक्रारी विभागाकडे प्राप्त झाल्या आहेत. या सर्वच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना रब्बी हंगामात भरलेल्या पीक विम्याचा लाभ मिळणार असून यामध्ये कुठेही अडचण आल्यास शेतकऱ्यांच्या पाठीशी कृषी विभाग ठामपणे उभा असेल, असेही धनंजय मुंडे यांनी यावेळी स्पष्ट केले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -