लासलगाव : केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी केल्याने लासलगाव बाजार समितीच्या मुख्य कार्यालयाजवळ गोरख संत या तरुण शेतकऱ्याने गेल्या आठवड्यापासून निर्यातबंदी उठत नाही तो पर्यंत आमरण उपोषण सुरू केले आहे. त्यास पाठिंबा देण्यासाठी शेतकऱ्यांनी लासलगाव बाजार समितीचे कांदा लिलाव घोषणाबाजी करत बंद पाडले तसेच बाजार समिती बाहेरील गेट जवळ ठिय्या मांडला. यावेळी छावा संघटनेचे करण गायकर देखील आपला पाठिंबा देत ठिय्या आंदोलनात सहभागी झाले.
सरकारने निर्यात बंदी उठवली नाही तर अन्न त्याग आंदोलन सुरू करण्याचा इशारा उपोषणकर्ते गोरख संत यांनी दिला आहे. येणाऱ्या काळात निर्णय झाला नाही तर मोठ्या प्रमाणावर आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.