Monday, May 12, 2025

नाशिक

Lalit Patil drugs case : ड्रग्समाफिया ललित पाटीलसह चौघांना न्यायालयीन कोठडी, आता मुक्काम आर्थर रोड कारागृहात

Lalit Patil drugs case : ड्रग्समाफिया ललित पाटीलसह चौघांना न्यायालयीन कोठडी, आता मुक्काम आर्थर रोड कारागृहात

नाशिक : महाराष्ट्रासह देशाला हादरवून टाकणाऱ्या ड्रग्स प्रकरणी मुख्य संशयित ललित पाटील सह चौघांना अखेर दहा दिवसांची पोलीस कोठडी संपल्यानंतर नाशिकच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.


ड्रग्स प्रकरणी ललित पाटील सोबत अनेक राजकीय नेत्यांची नावे जोडण्यात आली होती. यामुळे त्यांची देखील चौकशी करण्यात आली होती. यामध्ये नाशिकचे माजी महापौर विनायक पांडे यांची देखील अमली पदार्थ विरोधी पथकाकडून चौकशी करण्यात आली होती. चौकशीअंती काही निष्पन्न न झाल्याने पुढे त्यांच्यावरील कारवाईचा फास मोकळा झाला. शहरात व शहराबाहेर तरुण वर्गाला मृत्यूच्या खाईत लोटणारे एमडी ड्रग्स बनवणारे कारखाने व ते चालवणारे माफिया यांचा बंदोबस्त करण्यात नाशिक पोलिसांना यश आले आहे.


याबाबत साकीनाका पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर नाशिक पोलिसांनी अगदी सुतावरुन स्वर्ग गाठावं याप्रमाणे साडेबारा ग्राम एमडी ड्रग्स प्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्याचा तपास आपल्याकडे घेत अर्जुन पिवल, मनोज उर्फ मन्ना गांगुर्डे, सनी पगारे, सुमित पगारे, मनोहर काळे यासह त्यांच्या इतर सहकाऱ्यांना ड्रग्स कारखाना थाटल्याप्रकरणी तसेच ड्रग्स सप्लाय केल्याप्रकरणी अटक केली व पुढे त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.


ड्रग्स प्रकरणातला मोठा मासा म्हणजेच मुख्य संशयित ललित पाटील याची देखील नाशिक अमली पदार्थ विरोधी पथकाने ताबा घेत चौकशी केली होती. दहा दिवसांची पोलीस कोठडी संपल्यानंतर ललित पाटील व त्याच्या सहकाऱ्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. यामुळे आता या सर्व संशयितांचा पुढील मुक्काम आर्थर रोड मध्यवर्ती कारागृहात राहणार आहे.

Comments
Add Comment