Tuesday, October 8, 2024
Homeदेशसावधान! देशात कोविडच्या रुग्णसंख्येत वाढ; कोरोनाच्या नव्या व्हेरिअंटने ५ जणांचा मृत्यू

सावधान! देशात कोविडच्या रुग्णसंख्येत वाढ; कोरोनाच्या नव्या व्हेरिअंटने ५ जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : कोरोनाचा नवा व्हेरिअंट जेएन.१ भारतासह जगभरातील अनेक देशांमध्ये धडकला आहे. हा व्हेरिअंट धोकादायक असल्याचे बोलले जात आहे. या व्हेरिअंटमुळे देशात आतापर्यंत ५ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. या व्हेरिअंटचा धोका लक्षात घेत, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सोमवारी हेल्थ अ‍ॅडव्हायजरीही जारी केली आहे. यात सर्व राज्यांना सतर्क राहण्यास सांगण्यात आले आहे.

आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, भारतात सोमवारी कोरोनाच्या अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या वाढून १८२८ आहे. दरम्यान देशात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ५ झाली आहे. मृतांमध्ये ४ जण केरळ, तर १ उत्तर प्रदेशातील आहे. तसेच, देशातील मृत्यू दर 1.19 टक्के आहे. यापूर्वी रविवारी देशात कोरोनाचे 335 नवे रुग्ण डिटेक्ट झाले आहेत.

जेएन.1 च्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून राज्यांना मार्गदर्शक सूचना जारी

देशातली काही राज्ये/केंद्रशासित प्रदेशात कोविडच्या रुग्ण संख्येत नुकतीच झालेली वाढ आणि कोविड-19 च्या जेएन.1 या नव्या स्वरूपाच्या विषाणूने ग्रस्त पहिला रुग्ण आढळल्याच्या पार्श्वभूमीवर, केंद्रीय आरोग्य सचिव, सुधांश पंत यांनी सर्व राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांना पत्र लिहिले असून, देशभरात कोविडच्या परिस्थितीबाबत दक्ष राहून सतत देखरेख ठेवण्यावर या पत्रात भर दिला आहे.

“केंद्र आणि राज्य सरकारांमधील सातत्यपूर्ण आणि सहकार्य ठेवून केलेल्या कृतींमुळे, आपल्याला कोविडचा प्रादुर्भाव सातत्याने कमी ठेवण्यात यश मिळाले आहे.” असं असलं तरी, कोविड-19 विषाणूचा प्रसार अद्याप सुरूच असून, या विषाणूचे वर्तन भारतीय हवामानाची परिस्थिती आणि इतर नेहमीच्या रोग-जनुकांच्या प्रसाराशी जुळवून घेणारे ठरले आहे, हे लक्षात घेऊन, सार्वजनिक आरोग्यातील आव्हानांचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी आपल्याला कोविड प्रतिबंधक गती कायम ठेवणे महत्वाचे आहे.” असे त्यांनी या पत्रात अधोरेखित केले आहे.

केंद्रीय आरोग्य सचिवांनी कोविड नियंत्रण आणि व्यवस्थापनविषयक महत्त्वाची धोरणे अधोरेखित केली आहेत. यामध्ये आगामी सण उत्सवांचा काळ लक्षात घेता, राज्यांनी पुरेशा सार्वजनिक आरोग्य सुविधा आणि इतर आवश्यक व्यवस्था सज्ज ठेवाव्यात, तसेच श्वसनसंस्थेशी निगडीत स्वच्छता सूचनांचे पालन करावे जेणेकरून, या आजाराचे संक्रमण टाळता येऊ शकेल.

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने सामायिक केल्याप्रमाणे कोविड-19 साठी देखरेख ठेवण्याच्या सुधारित धोरणाची तपशीलवार आणि प्रभावी अंमलबजावणी तसेच मार्गदर्शक तत्त्वांचे प्रभावी पालन सुनिश्चित करण्याचे आवाहन राज्यांना करण्यात आले आहे.

रुग्णसंख्येचा वाढता कल लवकर ओळखण्यासाठी, राज्यांना एकात्मिक आरोग्य माहिती प्लॅटफॉर्म पोर्टलसह, फ्लू सारखे आजार किंवा गंभीर स्वरूपाच्या श्वसन रोगावर (एसएआरआय-सारी) लक्ष ठेवण्यास आणि त्याचा वेळोवेळी अहवाल देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

कोविड-19 चाचणीच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार सर्व जिल्ह्यांमध्ये पुरेशा प्रमाणात चाचण्या सुनिश्चित करण्याचा आणि आरटी-पीसीआर आणि त्यातील शिफारस करण्यात आलेला अॅंटी जेन चाचण्यांचा वाटा कायम ठेवण्याचा सल्ला राज्यांना देण्यात आला आहे.

आरटी-पीसीआर चाचण्यांची संख्या वाढवण्यासाठी तसेच जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पॉझिटिव्ह रुग्णांच्या रक्ताचे नमुने, भारतीय सार्स सीओव्ही-2 जीनोमिक्स कन्सोर्टियम (आयएनएसएसीओजी) प्रयोगशाळांमध्ये पाठवण्यासाठी राज्यांना प्रोत्साहन देण्यात आले आहे. जेणेकरून देशात नवीन स्वरूपाचा विषाणू आल्यास, त्याचा वेळेवर शोध घेता येईल.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने, सर्व सार्वजनिक आणि खाजगी आरोग्य सुविधांची तयारी आणि प्रतिसाद क्षमता यांचा आढावा घेण्यासाठी आयोजित केलेल्या रंगीत तालमीत त्यांचा सक्रिय सहभाग सुनिश्चित करणे. श्वसनविषयक सार्वजनिक नियमांचे पालन करण्यासह कोविड-19 च्या व्यवस्थापनासाठी सामुदायिक जागृतीला प्रोत्साहन देण्यासाठी राज्यांनी सातत्याने पाठिंबा द्यावा, असेही या पत्रात म्हटले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -