उद्धव ठाकरेंच्या मोर्चाला शिंदे-भाजपा देणार उत्तर
मुंबई : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मोर्चाला उत्तर म्हणून भाजप, शिवसेना आणि महायुतीतले इतर पक्ष मिळून आता ‘मातोश्री’वर मोर्चा काढणार आहेत. उद्योगपती गौतम अदानी यांच्या कंपनीला धारावी पुनर्वसन प्रकल्प दिल्यामुळे, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी १६ डिसेंबरला मोर्चा काढला होता. त्याला उत्तर म्हणून एकनाथ शिंदेंची शिवसेना, भाजप आणि महायुतीतील पक्ष आता मातोश्रीवर मोर्चा काढणार आहेत, अशी माहिती शिंदेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते किरण पावसकर यांनी दिली. धारावी पुनर्विकास प्रकल्प सध्या जोरदार गाजत आहे. त्यामध्ये आता शिवसेना शिंदे गट आणि मित्रपक्ष मोर्चा काढणार असल्यामुळे हे प्रकरण आता आणखी तापण्याची शक्यता आहे.
धारावी टी जंक्शन ते मातोश्री असा हा मोर्चा लवकरच काढला जाणार आहे. धारावी प्रमाणेच सांतक्रुझ , वांद्रे आणि मुंबई परिसरातील पुनर्विकास संदर्भात शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांनी का मोर्चा काढले नाहीत? असा सवाल देखील या मोर्चा निमित्ताने उपस्थित केला जाणार आहे, अशी माहिती किरण पावसकर यांनी दिली.
उद्धव ठाकरे धारावीचे कैवारी बनवून रस्त्यावर उतरले. शिंदे साहेबांनी ज्यांना घरी बसवले ते रस्त्यावर उतरले. ‘मातोश्री’च्या एवढं जवळ आहेत, तरी त्यांनी धारावीचा विकास केला नाही. उद्धव ठाकरे सर्व विकासाचा विरोध करतात. आधी विरोध करायचा मग त्यांना नंतर बोलून चर्चा करायची, सेटलमेंट करायची, ही त्यांची पद्धत आहे. मुकेश अंबानींच्या घराबाहेर जिलेटीनच्या कांड्या ठेवणारे उद्धव ठाकरेंचे प्रवक्ते सचिन वाझे होते. आधी अंबानी,आता अडाणीला विरोध. धारावीचा विकास होत असेल तर आता विरोध का?
राहुल गांधीने तुम्हाला विरोध करायला सांगितला आहे का? धारावीचा विकास होणार असेल तर तुमच्या डोक्यात टीडीआरचा विषय आणला कोणी? मुंबई मध्ये अनेक बिल्डरांचा समावेश आहे,त्यात उद्धव ठाकरेंचा टीडीआर आहे. धारावीसाठी ३ लोकांनी टेंडर भरले होते. टीडीआरमुळे अडाणीला किती फायदा होणार ते उद्धव ठाकरेंच्या डोक्यात आहे. सेना भवनच्या भिंतीला लागून घर आहे त्यांच्यासाठी तुम्ही कधी का केला नाही?
धारावीकरांसाठी सरकार काम करणार, त्यांची मदत करणार आहे. ज्या बाळासाहेबांनी कम्युनिस्ट पक्षाचे झेंडे कडून टाकले, ते झेंडे तुमच्या आंदोलनात मोठ्या संख्येने होते. उद्धव ठाकरे जनतेला मूर्ख बनवत आहेत. पण जनतेला मूर्ख समजू नका. मुंबईत बिल्डरांचा कोणी फायदा केला तर ते उद्धव ठाकरे आहेत. सुधाकर बडगुजरसारखे लोक तुमच्या सोबत आहे, त्यामुळे तुम्ही उद्यानला टिपू सुलतानचे नाव देता, असा हल्लाबोल किरण पावसकर यांनी केला. तसेच ललित पाटीलला शिवबंधन बांधले. दिशा प्रकरण पण समोर येईल, व्हिडीओही समोर येईल, असा दावा किरण पावसकर यांनी केला.