स्टेटलाइन: डॉ. सुकृत खांडेकर
नवीन संसद भवनात संसदेचे हिवाळी अधिवेशन चालू आहे. १३ डिसेंबरला लोकसभा व राज्यसभेचे दैनंदिन कामकाज चालू होते. लोकसभेत दुपारी शून्य प्रहरात विविध पक्षांचे खासदार आपले मुद्दे मांडत होते. अचानक दुपारी एकच्या सुमारास प्रेक्षा गॅलरीतून दोन तरुण सभागृहात उड्या मारतात व पीठासीन अधिकाऱ्यांकडे धाव घेतात. एवढेच नव्हे तर पायातील बुटाच्या आत ठेवलेला कलर स्प्रे बाहेर करून त्याचे फवारे उडवतात, त्यातून पिवळा धूर पसरून सर्वत्र घबराट होते. ही घटना दिसते तशी सहज सोपी नाही. या घटनेची देशातच नव्हे तर संपूर्ण जगात चर्चा झाली. देश-विदेशांतील सर्व माध्यमांनी त्याला ठळक प्रसिद्धी दिली. तीन राज्यांतील विधानसभा निवडणुकीत भाजपाला मिळालेल्या देेदीप्यमान यशानंतर आणि जुन्या संसद भवनावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या बाविसाव्या स्मतिदिनाला नवीन संसद भवनावर दुसरा हल्ला होतो, हा योगायोग म्हणता येणार नाही. नरेंद्र मोदी सरकारची आणि भारतीय जनता पक्षाची प्रतिमा डागळण्यासाठी सहा तरुणांचा या कट कारस्थानात सहभाग असेल, तर त्यांच्या कटाचे सूत्रधार कोण आहेत व संसदेत घुसखोरी करण्यामागे नेमका काय हेतू आहे हे देशापुढे येणे गरजेचे आहे.
संसदेत घुसखोरी करणाऱ्यांच्या पाठीशी कोण आहे, ते कोणत्या विचारसरणीचे आहेत, कोणत्या संघटनांशी त्यांचा संबंध आहे, याचा दिल्ली पोलीस शोध घेत आहेतच. केंद्रीय राखीव पोलीस दलाचे महासंचालक अनिश दयाल सिंह यांच्या नेतृत्वाखाली या कटाचा शोध घेण्यासाठी सरकारने विशेष समितीही नेमली आहे. लोकसभेत उड्या मारणाऱ्या दोघांपैकी सागर शर्मा हा उत्तर प्रदेशमधील लखनऊचा आहे. बारावी उत्तीर्ण आहे. तो तेथे ई-रिक्षा चालवतो. २७ वर्षांच्या सागरने घरातून निघताना, ‘मी दिल्लीला काहीतरी मोठे करण्यासाठी चाललो आहे’, असे आईला सांगितले होते. मनोरंजन डी. हा कर्नाटकमधील म्हैसूरचा आहे. तो कॉम्प्युटर इंजिनीअर आहे. त्याचे वडील देवराज गौडा यांना त्याचे वर्तन मुळीच पसंत नाही. ‘त्याने काही चुकीचं केलं असेल, तर त्याला फाशी द्या’, असे त्यांनी म्हटले आहे.
एम. फिल. असलेली नीलम सिंह नीट परीक्षाही उत्तीर्ण झाली आहे. ३७ वर्षांची नीलम हरयाणामधील हिस्सारची आहे. संसदेबाहेर तिने घोषणा दिल्या. शेतकरी आंदोलनातही ती सहभागी झाली होती. २५ वर्षांचा अमोल शिंदे हा महाराष्ट्रातील लातूरचा आहे. वडील शेतमजूर आहेत. पोलीस भरतीसाठी त्याने दोन वेळा प्रयत्न केला. पण त्याला अपयश आले. संसदेबाहेर त्याने तानाशाही नहीं चलेगी, अशा घोषणा दिल्या. संसदेतील घुसखोरीप्रकरणी पोलिसांनी पकडलेले सर्वजण बेरोजगार किंवा भरकटलेले तरुण आहेत म्हणून त्यांची आता सुटका होणार नाही. भगतसिंह फॅन क्लबशी जोडलेले आहेत. सोशल मीडियावर ते परस्परांच्या संपर्कात होते. दीड वर्षांपूर्वी ते म्हैसूरला एकत्र आले होते. या सर्व कटात ललिता झा सूत्रधार असावा, अमोल व नीलम यांनी संसद मार्गावर परिवहन भवनासमोर घोषणा दिल्या, तेव्हा त्याचा व्हीडिओ काढून तो सोशल मीडियावर पोस्ट करण्याचे काम ललितने केले. त्यानेच पकडलेल्या चौघांचे मोबाइल आपल्याकडे ठेवले होते व पुरावे नष्ट करण्यासाठी ते त्याने जाळून टाकले. तो कोलकत्याचा आहे व तृणमूल काँग्रेसच्या आमदाराबरोबर त्याचे काही फोटोही भाजपाच्या आयटी सेलने पोस्ट केले आहेत. नीलम सिंहने आजवर अनेक आंदोलनात सहभाग घेतला आहे. भाजपाच्या आयटी सेलने तिला आंदोलनजीवी असे संबोधले आहे. मनोरंजन हा काँग्रेस व एसएफआयमध्ये सक्रिय होता, अशीही पोस्ट भाजपाच्या आयटी सेलवर आहे.
सागर व मनोरंजनने लोकसभा सभागृहात उडी मारली व नंतर बाकांवरून ते धावताना दिसले. जेव्हा गुरुजीत औजला, हनुमान बेणीवाल, मनोज कोटक आदी खासदारांनी त्यांना पकडले, तेव्हा काहींनी त्यांना बदडलेही. तेव्हा सागर हा आम्हाला मारू नका, आम्ही केवळ निषेध करण्यासाठी आलो आहोत, असे सांगू लागला. कशाचा निषेध असे विचारले तर त्याला सांगता येईना…
संसदेच्या सभागृहात उड्या मारून व रंगीत फवारे उडवून व धूर पसरवून या सर्वांना काय साध्य करायचे होते? त्यांनी १३ डिसेंबर हाच दिवस का निवडला? म्हैसूरच्या भाजपा खासदाराने संसद भवन प्रवेशाचा व प्रेक्षा गॅलरीचा पास देताना काय विचार केला? २२ वर्षांपूर्वी १३ डिसेंबर २००१ रोजी जुन्या संसद भवनावर झालेला दहशतवादी हल्ला आणि १३ डिसेंबर २०२३ ला झालेली घुसखोरी यात मोठा फरक आहे. तेव्हा हल्ला करणारे पाचही दहशतवादी सशस्त्र व आत्मघाती पथकातील होते व ते लष्करी गणवेषात घुसले होते. ते सर्व पाकिस्तानमधील प्रशिक्षित होते. एके ४७ व हँडग्रेनेडचा वापर करून त्यांनी संसद भवनाच्या आवारात चौफेर गोळीबार केला. दिल्ली पोलीस व संसदेच्या सुरक्षा दलाचे नऊजण त्यात शहीद झाले. पाचही दहशतवाद्यांना संसद भवनाच्या आवारातच आपल्या सुरक्षा दलाने कंठस्नान घातले. २२ वर्षांपूर्वी दहशतवादी हल्ला झाला, तेव्हा मी स्वत: पत्रकार म्हणून संसद भवनात होतो. दहशतवादी घुसताच तेव्हा संसद भवनाचे सर्व दरवाजे बंद करण्यात आले होते. दहशतवादी मुख्य इमारतीत इमारतीत घुसू शकले नाहीत.
दहशतवादी घुसले तेव्हा संसदेच्या सभागृहात महिला आरक्षणावरून गदारोळ चालू होता. सभागृहाचे कामकाज तहकूब झाले होते. संसद भवनात तेव्हा अडीचशे ते तीनशे खासदार तरी होते. तेव्हा अटलबिहारी वाजपेयी हे पंतप्रधान होते. लालकृष्ण अडवाणी गृहमंत्री होते, जॉर्ज फर्नांडिस संरक्षणमंत्री होते. दहशतवादी घुसल्याचे समजताच सर्व खासदारांना सेंट्रल हॉलमध्ये एकत्र बसण्यास सांगितले होते. शिवसेनेचे खासदार मोहन रावले (आज ते हयात नाहीत) व मी, आम्ही मनोहर जोशींच्या संसद भवनातील कार्यालयात गेलो. तेव्हा ते केंद्रीय अवजड उद्योगमंत्री होते. त्यांच्या कार्यालयाचे दरवाजेही सुरक्षा व्यवस्थेने तत्परतेने बंद केले. दहशतवादी हल्ला झाला, तेव्हा सर्व टीव्ही चॅनेलचे कॅमेरे संसद भवनाच्या गेटवर चालूच होते, या हल्ल्याचे थेट प्रक्षेपण चालू होते. मनोहर जोशींच्या ऑफिसमधील टीव्हीवर दहशतवादी हल्ल्यांचे थेट प्रक्षेपण आम्ही बघत होतो. त्यामुळे बाहेर काय घडत आहे हे आतमध्ये दिसत होते.
मुंबईत लालबाग येथे लोकसत्ता कार्यालयात बसलेल्या संपादक डॉ. अरुण टिकेकर व सहाय्यक संपादक दिनकर रायकर (आता दोघेही हयात नाहीत) यांच्याशी मी सतत फोनवरून संपर्कात होतो. त्यांनाही आमची काळजी वाटत होती. बाहेर गोळीबार आणि आत घबराट आणि सन्नाटा अशी परिस्थिती तेव्हा संसद भवनात होती. संसद भवनाच्या आवारात बंदुकीच्या गोळ्या व रक्ताचा सडा पडला होता. दुपारी चारनंतर मोहन रावलेंबरोबर संसद भवनात फेरफटका मारूनच मी बाहेर पडलो. ठार झालेल्या दहशतवाद्यांची चाळण झालेली प्रेते जवळून बघितली आणि त्यांच्याशी लढताना शहीद झालेल्या जवानांच्या मृतदेहांचेही जवळून दर्शन घेतले. २२ वर्षांपूर्वीच्या दहशतवादी हल्ल्याचा थरारक आँखो देखा हाल मी दुसऱ्या दिवशी शब्दांतून मांडला होता.
१३ डिसेंबर २००१ च्या दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार अफजल गुरू, एसएआर गिलानी, अफसान गुरू, शौकत हुसेन यांना दोन दिवसांनी पोलिसांनी अटक केली. अफजल गुरूला तर एसटीएफने श्रीनगरला अटक केली. सर्वोच्च न्यायालयाने गिलानी व अफसानला निर्दोष सोडले. मात्र अफजल गुरूला फाशीची शिक्षा ठोठावली. शौकत हुसेनला झालेली फाशी रद्द करून १० वर्षे सक्त मजुरी सुनावली. अफजल गुरूला दिल्लीच्या तिहार जेलमध्ये दि. ९ फेब्रुवारी २०१३ रोजी सकाळी आठ वाजता फाशी दिली गेली. दहशतवादी हल्ल्यांत शहीद झालेल्यांमध्ये जवानांना अशोक चक्र नि कीर्ती चक्र देऊन सरकारने नंतर सन्मानित केले. त्यावेळच्या हल्ल्यात १६ जवान जखमी झाले होते. १३ डिसेंबर २०२३ रोजी रोजी संसदेत जी घुसखोरी झाली, त्याची सरकारने गंभीर दखल घेतली आहे. सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटी दूर करण्यात येत आहेत. संसद भवनाची सुरक्षा सर्वोच्च आहे. संसदेत घुसण्याचे कारस्थान विचारपूर्वक रचले गेले. कटात सामील झालेल्यांना आता जेलमध्ये सडावे लागणार आहे.
सागर शर्माने जी शेवटची पोस्ट टाकली, त्यात म्हटले आहे –
जीते या हारे,
पर कोशीश तो जरूरी हैं,
अब देखना हैं,
ये सफर कितना हसीन होगा,
उम्मीद हैं, फिर मिलेंगे…
(अशांना माफी अशक्य आहे…)
sukritforyou@gmail.com
sukrit@prahaar.co.in
गीतांजली वाणी ज्ञानदायी स्रोत असते पुस्तक आवड जयास उजळ मस्तक नवी जीवनाची प्रगती आणि विकास…
फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळे आजकाल आपण दररोज बघतोय की, अगदी लहान अथवा तरुण मुलं…
महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे-गोरे यांच्या हत्येप्रकरणी खाकी वर्दीतला एकेकाळचा सहकारी पोलीस अधिकारी अभय कुरुंदकरला…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सवर ८ विकेट्सनी विजय…
मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…
मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…