पावसाळ्यापूर्वीची दुरूस्ती केवळ फार्स
कंधाणे : दुष्काळाची दाहकता, पाठीशी गारपीठीची स्मृती अश्या कटू आठवणींना बासनात गुंडाळून बागलाणच्या पश्चिम पट्टयातील बळीराजा सध्या रब्बी हंगामातील कांदा पिकाच्या लागवडीत व्यस्त झाला आहे. आधीच मजूर व कांदा रोपांची टंचाईचा ससेमिरा पाठीशी असताना सध्या या भागात सटाणा सबस्टेशनच्या ३३ केव्ही उच्च विद्युत वाहिनीच्या दुरूस्तीच्या नावाखाली तासनतास वीज पुरवठा खंडित केला जात असल्याने बळीराजांना कांदा पिकाला पाणी देण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे.
ठराविक दिवसांच्या अवधीतच इमर्जन्सी लोडशेडिंग व विद्युत तारा दुरूस्तीच्या नावाखाली विद्युत पुरवठा अचानक खंडित केला जात आहे. विद्यूत वितरण कंपनीकडून पावसाळयापुर्वी मे महिन्याच्या मध्यान्हाला विज दुरूस्तीच्या नावाखाली कामे केली जातात. दुरूस्तीच्या नावाखाली लाखोंची बिले ठेकेदारांना वितरीत केली जात असताना अचानक विद्युत दुरूस्ती निघतेच कशी? असा संतप्त सवाल बळीराजांकडून उपस्थित केला जाऊ लागला आहे.
पावसाळ्यात दुरूस्तीच्या नावाखाली जाहिरात बाजी करून वीज कंपनीकडून दुरूस्ती केली जाते. तरीही ब-याचदा विद्युत पुरवठा सुरळीत असतांना अचानक दुरूस्तीच्या नावाखाली व इर्मजन्सी लोडशेडिंगच्या नावाने विद्यूत पुरवठा खंडित करून या भागातील बळीराजांना विद्युत वितरण कंपनीकडून वेठीस धरले जात असल्याचे चित्र या भागात पाहावयास मिळत आहे. पावसाळ्यात केले गेलेली दुरूस्तीची कामे निव्वळ औपचारिकता व फार्स तर नाही ना? सध्या परिसरात कांदा लागवड कामाने वेग घेतला असून भविष्यातील दुष्काळाची चाहूल आधीच जाणवू लागल्याने मिळेल त्या परिस्थितीशी दोन हात करत बळीराजांकडून कांदा लागवड केली जात आहे.
मागे या भागात अवेळी झालेल्या पावसामुळे कांदा रोप खराब झाले असल्याने एकरीवर होणारी लागवड गुंठ्ठयावर येवून ठेपल्याने कांदा रोप मिळविण्यासाठी बळीराजांवर दाहीदिशा होण्याची वेळ येवून ठेपली आहे. परिस्थतीचे गांभीर्य ओळखून ज्यांच्याकडे कांदा रोप उपलब्ध आहेत ते सोन्याच्या दराने कांदा रोप विक्री करतांना दिसत आहेत.
सध्या परिसरात गुलाबी थंडीची चाहूल वाढली असून विद्यूत वितरण कंपनीकडून शेतीसाठी राबविण्यात येणारे भारनियमन अतिशय चुकीच्या पध्दतीनुसार राबविले जात असल्याने शेतातील पिकांना पाणी देण्यासाठी शेतक-यांना रात्रीच्या थंडीत उभे रहावे लागत आहे. त्यातच दिवसा थ्री फेज सप्लाय सुरू असतांना दुरूस्तीच्या नावाखाली विद्युत पुरवठा खंडित केला जात आहे. पावसाळ्यापूर्वी दुरुस्तीच्या नावाखाली लाखो रूपयांची बिले काढली जात असतांना अचानक बिघाड होतोच कसा? की मग दुरूस्ती केवळ कागदावरच केली जाते. असा सवाल आता विद्युत वितरण कंपनीच्या भोंगळ कारभारावर उपस्थित केला जाऊ लागला आहे.