Sparrow : चिमणीचं घरटं!


  • कथा : रमेश तांबे


एक होती चिमणी. तिला आपलं घरटं बांधायचं होतं. त्यासाठी ती छानसं झाड शोधत होती. तेवढ्यात तिला दिसलं एक आंब्याचं झाड. झाड होतं खूप मोठं. त्यावर होती भरपूर पानं आणि फळं! मग चिमणी म्हणाली, “झाडा झाडा आंब्याच्या झाडा, घरटं बांधायला देतोस का जागा!” तसं आंब्याचं झाड म्हणालं, “हे बघ चिमणे, आधीच माझ्या अंगावर एवढी पानं आणि फळं. त्यांचाच केवढा मोठा भार झालाय मला अन् त्यात तू आता घरटं बांधणार. नको गं बाई नको बांधू तू घरटं!”


मग चिमणी तिथून निघाली. उडता उडता तिला दिसलं एक पिंपळाचं झाड. झाडाची पानं सळसळ आवाज करीत नाचत होती. चिमणी गेली पिंपळाकडे आणि म्हणाली, “झाडा झाडा पिंपळाच्या झाडा, घरटं बांधायला देतोस का जागा! तसं पिंपळाचं झाड म्हणालं, “हे बघ चिमणे आधीच माझ्या अंगावर केवढे पोपट राहातात. त्याचाच मला झालाय केवढा मोठा भार! अन् तू त्यात आता घरटं बांधणार. नको गं बाई नको बांधू तू घरटं!


बिचारी चिमणी, निघाली उडत उडत. उडता उडता तिला दिसलं एक वडाचं झाड! खूप मोठं होतं झाड. झाडाच्या पारंब्या जमिनीला टेकल्या होत्या. मग चिमणी म्हणाली, “झाडा झाडा वडाच्या झाडा, घरटं बांधायला देतोस का जागा!” तसं वडाचं झाड म्हणालं, “हे बघ चिमणे, आधीच माझ्या पारंब्यावर किती मुलं झोके खेळतात. त्याचाच केवढा मोठा भार झालाय मला अन् त्यात तू आता घरटं बांधणार. नको गं बाई नको बांधू तू घरटं!”


चिमणी उडून उडून दमून गेली. अन् बाभळीच्या झाडाखाली येऊन बसली. कोणच तिला घरटं बांधायला जागा देईना. त्यामुळे ती निराश झाली होती. तेवढ्यात तिथं कावळा आला. चिमणीला असं उदास बसलेलं बघून म्हणाला, “काय गं चिमणे, अशी का बसलीस उदास.” चिमणी म्हणाली, “काय सांगू कावळ्या, घरटं बांधायला कोणतंच झाड जागा देत नाही. मी तरी काय करू!” तसं कावळा हसत हसत म्हणाला, “अगं चिमणे काय करायचंय ते घरटं! आम्ही बघ घरटंच बांधत नाही. आमची अंडी आम्ही कोकिळाच्या घरट्यात गुपचूप ठेवूून येतो. तू पण तसंच कर!” चिमणी म्हणाली, “नाही बाई, मला नाही जमायची अशी बेईमानी. मी आपली साधी, सरळ प्रामाणिक. झाडाने हो म्हटल्याशिवाय त्याच्या अंगावर घरटंसुद्धा बांधत नाही आणि असं दुसऱ्याच्या घरट्यात चोरून अंडी टाकायची, नको रे बाबा!” चिमणीचं पुराण ऐकून कावळा गेला उडून, चिमणी राहिली तिथेच बसून!


थोड्या वेळाने चिमणी उडण्याच्या तयारीत असतानाच, बाभळीचे झाड तिच्याशी बोलू लागलं. “चिऊताई चिऊताई इकडे वर बघ मीच बोलतोय, बाभळीचे झाड! मी ऐकली तुझी कहाणी, ऐकून आले डोळ्यांत पाणी!” “मी सांगतो तुला, बांध माझ्या अंगावर घरटं. पडणार नाही तुला फार कष्ट! माझ्या अंगावर मोठी पानं नाहीत की फळं नाहीत. पोपट नाही, साळुंक्या नाहीत. काय सांगू चिमणे मी पडलोय अगदी एकटा. सारेच म्हणतात, बाभळीच्या अंगावर केवढे काटे. चिमणे, काटे आहेत पण टोचणार नाहीत बघ तुला.


मी काळजी घेईन तुझी आणि तुझ्या बाळांची! तुला बाळं झाली की मी त्यांना माझी पिवळी धमक फुलं देईन. माझ्या काळ्या, तपकिरी रंगाच्या छोट्या छोट्या बिया त्यांना खेळायला देईन.” बाभळीचं बोलणं ऐकून चिमणीच्या डोळ्यांत पाणी आलं. ती म्हणाली, “झाडा झाडा बाभळीच्या झाडा, तुझ्या अंगावर शोधली मी जागा. चारच दिवसांत घरटे बांधते, तुझ्याबद्दल साऱ्यांंना सांगते!”


थोड्या दिवसांत चिमणीनं तिथं घरटं बांधलं. मग अनेक चिमण्या तिथं राहायला आल्या. इतर पक्षीदेखील आले आणि एकटं पडलेलं बाभळीचं झाड आता पक्ष्यांच्या किलबिलाटाने भरून गेलं. एकमेकांच्या साथीने सारेच आनंदित झाले!

Comments
Add Comment

शारदाश्रम विद्यामंदिर

तांत्रिक विद्यालय व शास्त्र - व्यावसायिक आिण उच्च माध्यमिक - व्यावसायिक कनिष्ठ महाविद्यालय SHARADASHRAM VIDYAMANDIR Technical High School &

स्वतःला प्राधान्य द्या...

मनस्वीनी,पूर्णिमा शिंदे  स्वतःला ओळखा, स्वतःच्या शक्तीला ओळखा. स्वतःला जपा, स्वतःवर प्रेम करा. काळजी घ्या

स्मृती

जीवनगंध,पूनम राणे गुरुपौर्णिमेचं निमित्त होतं. विविध रंगांच्या फुलांनी हॉल सजवण्यात आला होता. विद्युत रोषणाई

ताणविरहित शिक्षण

नक्षत्रांचे देणे,डॉ. विजया वाड सगळे पालक तिच्या वर्गाचा आग्रह धरीत. ‘का? तिचाच वर्ग का?’ ‘अहो, आमच्या बाळूचाच तसा

विनाशकाले विपरीत बुद्धी

गोष्ट लहान, अर्थ महान,शिल्पा अष्टमकर मानवी जीवनात बुद्धी ही सर्वात मोठी शक्ती मानली जाते. योग्य वेळी योग्य

सतर्कता

प्रतिभारंग,प्रा. प्रतिभा सराफ हल्ली तसंही रात्री उशिरापर्यंत कोणाला झोप येत नाही. त्यातही वृद्ध असतील तर झोप