अश्व मिरवणूक, मल्हाररथ, नवसाला पावणार्या श्री खंडेराव महाराजांची दोनशे वर्षांपेक्षा मोठी परंपरा
ओझर : ओझरचे ग्रामदैवत तथा परिसरातील पंचक्रोशीतील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री खंडेराव महाराजांचा उद्या सोमवार दिनांक १८ डिसेंबर पासून यात्रोत्सव आहे. येथील श्री खंडेराव महाराज मंदिर ओझरसह परिसरात एक जागृत देवस्थान व नवसाला पावणारे म्हणून प्रसिद्ध आहे येथे सलग चार ते पाच दिवस यात्रा उत्सवाचा मोठा सोहळा साजरा होत असतो. ओझरचा यात्रा उत्सव जिल्ह्याभरातील भाविकांसाठी पर्वणी ठरतो. सर्व समाजातील भाविक लाखोंच्या संख्येने महाराजांचे दर्शन करण्यासाठी येथे आवर्जून हजेरी लावतात.
मार्गशीर्ष शुद्ध पष्ठीला चंपाषष्टी असे संबोधले जाते याच दिवशी श्री खंडेराव महाराजांनी मनी मल्याचा वध केला यामुळे पारंपरिक रित्या ओझर परिसरात या यात्रोत्सवास सुरुवात झाली आणि या यात्रोत्सवास विशेष महत्त्व प्राप्त झाले. खंडोबा मल्हारी सर्वधर्मसमभावाचे प्रतीक आहे ग्रामीण भागातील ग्रामस्थ या यात्रेला वांगेसटीची यात्रा म्हणून संबोधतात. नाशिक पासून उत्तरेकडे २० किलोमीटर अंतरावर बानगंगा नदी तीरावर वसलेले ओझर पूर्वीचे येथे श्री खंडेराव मंदिर छोटे होते. त्यावेळी यात्रा उत्सव लहान स्वरूपात होत असे मात्र काळानुरूप बदल होऊन यात्रेचे स्वरूप वाढत गेले ओझर शहराच्या वाढत्या विकासाबरोबर यात्रा उत्सवाने देखील विराट रूप धारण केले नंतरच्या काळात मुंबई आग्रा महामार्ग लगत भव्य दिव्य नवीन मंदिर उभारण्यात आले यात्रेचा विस्तार व भाविकांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन ग्रामस्थांच्या सहकार्याने भव्य व आकर्षक मंदिराची उभारणी करण्यात आली. या मंदिरात घोड्यावर स्वार झालेली हाती तलवार असलेली सोबत म्हाळसाबाई सह खंडोबाच्या अतिशय देखनी व आकर्षक मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे.
मंदिरांसमोर भाविकांसाठी प्रशस्त सभा मंडप उभारण्यात आलेला आहे. सभा मंडपात मूर्ती समोर शांततेचे प्रतिक असलेले कासवाची मूर्ती व शंकराचे वाहन नंदी यांच्या मूर्ती आहेत. मंदिरासमोर मल्हार रथ ओढणाऱ्या घोड्यांच्या समाधी व भव्य दीपस्तंभ आहे. ओझरच्या खंडेराव महाराज यात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे भविकांनी खचून भरलेले मल्हार रथ बारागाडे एक घोडा (अश्व) ओढतो मल्हार रथ ओढण्याची परंपरा दोनशे वर्षापेक्षा अधिक वर्षाची आहे. यात्रेतील रथ ओढण्याचा मान घोड्यास दिला जातो. महाराजांचे अश्व सांभाळण्याचे काम परंपरागत चालीरीतीने आदिवासी समाजाकडे आहे.
मार्गशीर्ष मासारंभ होताच ओझरच्या चंपाषष्ठी यात्रेच्या धार्मिक विधीस प्रारंभ होतो मार्गशीष शुद्ध प्रथमेश घटस्थापना करतात चंपाष्टी पर्यंत सहा दिवसाचा हा विधी असल्याने यांस षढरात्रोत्सव असेही म्हटले जाते सकाळ संध्याकाळ आरती केली जाते. मल्हार महात्म्य ग्रंथाचे पारायण केले जाते. सहा दिवस पूजा विधी पार पाडतो चंपाषष्ठीच्या दिवशी पहाटे मान्यवरांच्या हस्ते उपस्थितीत महाभिषेक करण्यात येतो. यात्रेच्या दिवशी घोड्यास सकाळी हळद आंघोळ घालून दोन्हीही मंदिरात देव भेटी केली जाते. दुपारी मारुती मंदिरात भेट देऊन वाजत गाजत या घोड्याची व पालखीचे गावातून मिरवणूक काढतात ही मिरवणूक ०५ वाजे दरम्यान मुख्य मंदिराकडे येते व घोड्यास बारा गाड्या कडे आणले जाते व घोड्याच्या गळ्यात दोराचे कडे टाकले जाऊन बारागाडे ओढण्याचा कार्यक्रम पार पडतो यावेळी लाखो भावी क उपस्थित असता भंडाऱ्याची उधळण करीत खंडेराव महाराज की जय येळकोट येळकोट जय मल्हार या घोषणांनी परिसर दुमदुमून जातो. भाविकांची अशी श्रद्धा आहे की महाराज स्वतः या मानाच्या घोड्यास बारा गाडे ओढण्याची प्रेरणा देतात.
यात्रेच्या वेळी सेवा करण्याचा मान वेगवेगळ्या लोकांना आहे. त्यात भगत, चोपदार घोडेवाले, पालखी वाले, चौरीवाले, ढालवाले, काठीवाले, भोई, हरदास, शिंग वाले, वाघोजी यांचा समावेश आहे. या यात्रेत बारागाडे म्हणून ज्या रथांना ओढले जाते ते रथ वाजत गाजत मिरवणुकीने यात्रा मैदानावर आणले जातात. हे रथ सजविलेले असतात व सजावट पाहिल्यावर डोळ्याचे पारणे फिटते. मध्यभागी एक नक्षीदार भरीव लाकडी खांब उभा केलेला असतो. खांबाच्या वरच्या टोकावर लोखंडी रिंग बसवून उभा आख बसवतात व त्यावर एक चाक बसून लाकडी चोपा बांधून प्रत्येकाच्या एका टोकाला एक सोटगा अडकवतात व एक सोटगा म्हणजे झुलता फिरता मल्लखांब यावर मिरवणुकीच्या वेळी मल्ल कसरत करतात. तेव्हाचे दृश्य मनमोहक व डोळ्याचे पारणे फिटणारे असतात प्रत्येक वाडी वस्ती तालीम संघ आपापल्या परीने सहवाद्य मिरवणूक काढून सर्व समाजाचे गाडे (रथ ) यांचा सहभाग असतो. रथापुढे तरुण पिढी नाचून गाऊन आपल्या परीने आनंद लुटण्याचा प्रयत्न करतात.