दी लेडी बॉस: अर्चना सोंडे
एक काळ असा होता की, मुले आपल्या वडिलांचा व्यवसाय पुढे नेत. आपलं नाव आपला मुलगाच उज्ज्वल करेल, असा विश्वास असायचा. आज मात्र प्रत्येक क्षेत्रांत मुली आपल्या पित्याचं नाव उज्ज्वल करत आहेत. तिने तर आपल्या पित्याचा व्यवसाय शून्यातून वाढवून त्याचं साम्राज्य केलं आहे. मोठमोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांना लाजवेल अशा पद्धतीने तिने व्यवसाय वाढवलेला आहे. एका म्हशीपासून सुरू झालेला व्यवसाय १३५ म्हशींच्या संख्येपर्यंत पोहोचला आहे. इतकंच नव्हे, तर सेंद्रिय खताचा तिचा व्यवसाय थक्क करणारा आहे. काही कोटी रुपयांची उलाढाल करणारी ही मुलगी आहे श्रद्धा ढवण.
अहमदनगर जिल्हा हा सहकार क्षेत्रामध्ये आघाडीवर असणारा जिल्हा. ऊस साखर कारखाने, दुग्ध सहकारी संघ, शिक्षण संस्था यांचं जाळं असलेला हा जिल्हा. या जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील निघोज या खेड्यात सत्यवान आणि जानकी हे ढवण दाम्पत्य राहत होतं. सत्यवान यांचा दुग्धव्यवसाय होता. एकत्र कुटुंब पद्धत २००९ साली विभक्त झालं आणि सत्यवान यांच्या वाटेला एक म्हैस आली. सत्यवान हे पोलिओग्रस्त असल्याने त्यांच्या शारीरिक हालचालीवर मर्यादा यायच्या. सत्यवान यांची कन्या श्रद्धा हे लहानपणापासून पाहत होती. घरची आर्थिक परिस्थिती यथातथाच होती. दहा वर्षांची झाल्यापासून तिने आपल्या बाबांना त्यांच्या कामात मदत करण्यास सुरुवात केली. आपल्या कुटुंबाची जणू जबाबदारी तिने घेतली. बाबांसोबत ती जनावरांच्या बाजारात जायची. म्हशींची खरेदी विक्री त्या लहान वयात तिने पाहिली. आपल्या वडिलांकडून अगदी लहान वयात तिने दुग्ध व्यवसायाची बाराखडी गिरवली. ही बाराखडी गिरवताना तिला काय ठाऊक की एक दिवस ती दुग्ध व्यवसायातील साम्राज्य उभारेल.
सत्यवान घरोघरी दूध विक्री करायचे. पण त्यासाठी जाताना आपल्या पोलिओग्रस्त पित्याची होणारी धडपड श्रद्धाच्या मनात घर करून गेली. ११वीमध्ये गेल्यानंतर श्रद्धाने घरोघरी दूध पोहोचविण्यास सुरुवात केली. सुरुवातीला दूध घरोघरी पोहोचवायला श्रद्धाला जरा त्रासदायक वाटले. पण ती लवकरच ती कामाचा आनंद घेऊ लागली. तिचे प्रयत्न पाहून तिचे आई-वडील, सत्यवान आणि जानकी तसेच लहान भावाने तिला साथ दिली आणि तिला मदत करायला सुरुवात केली. तिच्या सोबतचे विद्यार्थी जेव्हा कॉलेजला जात, तेव्हा श्रद्धा बाईकवर दूध पोहोचवायला जायची. व्यवसायाचा जसा जम बसला, तसा व्यवसाय वाढवण्याचे ठरवले. नव्याने म्हशी खरेदी केल्या. एका म्हैसपासून झालेली सुरुवात ८० म्हशींपर्यंत पोहोचली. या म्हशींची देखभाल करण्यासाठी, रोज दूध काढणे ते घरोघरी पोहोचविणे याकरिता माणसे नेमली गेली. निव्वळ सात वर्षांत २५ हजार रुपयांवरून ६ लाख रुपये इतकी उलाढाल वाढली.
श्रद्धाने म्हशींच्या व्यापाराच्या व्यवसायातील गुंतागुंत, म्हशींचे दूध काढण्याच्या कलेपासून ते व्यापाऱ्यांशी चतुर वाटाघाटी करण्यापर्यंतच्या गोष्टी लहानपणीच आत्मसात केल्या होत्या. श्रद्धाने भौतिकशास्त्रात एमएससी केले आहे. वयाच्या २४व्या वर्षी ती ‘श्रद्धा फार्म’ची मालक आहे. दुमजली गोठा हे या फार्मचे वैशिष्ट्य आहे. म्हशीच्या व्यापारातून दुग्धव्यवसायात झालेले परिवर्तन ही श्रद्धाने हळूहळू आणि विचारपूर्वक केलेली प्रक्रिया होती. कर्जाची गरज टाळून तिने हुशारीने व्यवसायातील नफा हा जनावरे घेण्यासाठी पुन्हा गुंतवला. २०१७ पर्यंत, तिच्या फार्ममध्ये ४५ म्हशी होत्या. तिने दुधाची गुणवत्ता वाढवण्यावर लक्ष केंद्रित केले. योग्य आहार देण्याच्या धोरणांचा वापर केला. ज्यामुळे दुधाला उच्च बाजारभाव मिळाला. एवढ्यावरच न थांबता श्रद्धाने तिच्या व्यवसायात विविधता आणली. सी एस ॲग्रो ऑर्गनिक्स या ब्रँडअंतर्गत मार्केटिंग करून दरमहा ३०,००० किलो गांडूळखत तयार करून तिने गांडूळखत निर्मितीमध्ये पाऊल टाकले. शिवाय, तिने एक बायोगॅस प्लांट स्थापन केला आहे, जो वीज निर्मितीसाठी म्हशीच्या शेणाचा वापर करतो. यामुळे तिचे डेअरी फार्म ‘शून्य कचरा उद्योग’ बनले आहे.
श्रद्धाच्या उद्योजकीय प्रवासातील सर्वात उल्लेखनीय बाबींपैकी एक म्हणजे तिची चिकाटी आणि कामाप्रति बांधिलकी. श्रद्धा सर्वात कमी किमतीत दर्जेदार चारा खरेदी करून आणि कमी खर्चात म्हशी विकणाऱ्या व्यापाऱ्यांचा काळजीपूर्वक मागोवा घेऊन खर्च करते. परिणामी लक्षणीय बचत होते. आज तिच्याकडे १३५हून अधिक म्हशी आहेत. यासोबतच आपण मिळवलेले ज्ञान इतरांना देण्यासाठी ती ऑनलाइन आणि ऑफलाइन असे दोन्ही प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करते. गेल्या आर्थिक वर्षात, दुग्धव्यवसाय, गांडूळखत आणि प्रशिक्षण व्यवसायांनी एकत्रितपणे १ कोटी रुपयांची उलाढाल केली.
श्रद्धामुळे प्रेरित होऊन तिच्या गावातील इतर मुलींनी बाईक चालवायला सुरुवात केली. त्या सुद्धा व्यवसाय करू पाहत आहेत. “महिलांच्या चाकोरीबाहेरील वेगळे असे काही केल्याबद्दल लोक माझ्याकडे तुच्छतेने पाहण्याऐवजी कौतुक करायचे. गावकरी मला माझ्या वडिलांचा मुलगा म्हणून संबोधायचे हे माझ्यासाठी अभिमानास्पद होते. माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल आणि पारंपरिक नसलेल्या गोष्टी मला करण्याची परवानगी दिल्याबद्दल मी माझ्या वडिलांची आभारी आहे आणि माझ्या आईने सतत पाठिंबा दिल्याबद्दल मी कृतज्ञ आहे,” असे श्रद्धा आपल्या आई-बाबांविषयी कृतज्ञता व्यक्त करते. ‘लेडी बॉस’ ही प्रतिकूलतेतून आत्मविश्वासाने स्वत:चं साम्राज्य निर्माण करते, ती इतरांना प्रेरणा देते. दुग्ध व्यवसायातील ही ‘लेडी बॉस’ मात्र अवघ्या समाजासाठी आदर्शवत आहे.