Friday, October 4, 2024
Homeसाप्ताहिककोलाजज्येष्ठांनो सावधान...

ज्येष्ठांनो सावधान…

  • मनस्विनी : पूर्णिमा शिंदे

ज्येष्ठ म्हणजे श्रेष्ठ वडीलधारी. आपली कुळातील मुळं. झाड भक्कम जसे उभे राहते ते मुळांना धरून असते. खोड, पाने, फुले, फांदी, फळे नंतर! सर्वात पहिलं असतं ते झाड! झाडांना धरून असतात ती मुळंच… झाडाला जपायचे म्हणजे मुळांना जपायचे. त्यांच्यामुळेच आपली उत्पत्ती, निर्मिती आणि उत्क्रांती. पण समाजामध्ये आज चित्र फार उलटे झाले आहे. आपण आपल्या अवतीभवती ही पाहतोच की, अत्यंत भयंकर परिस्थिती आज वृद्धांवर आली आहे. छळ, उपासमार, अन्याय, मानापमान, तणाव, आजारपण, वार्धक्य. सतत ते कोणत्या ना कोणत्या दबावाखाली असतात. त्यांचा आर्थिक, मानसिक, शारीरिक छळ केला जातो. घराघरांतून ही स्थिती नजरेत येते.

स्वतःची संपत्ती घामाने व श्रमाने मिळवलेली मुलाबाळांना देऊन मोकळे होतात हे. तोवर सगळे नाते गोडाचे नंतर वास्तव कळते नि पश्चातापाची वेळ येते. मग ना घर का ना घाट का ही परिस्थिती उद्भवते. त्यांना अनेक आजार दुर्धर असे असतात. त्यांच्यावर इलाजाइतकेही पैसे मिळत नाहीत, दोन रुपयांची तंबाखूची तलबही भागवताना हात पसरावे लागतात. कारण ही सर्वत्र पश्चातापाची पाळी येते. म्हणून सावधगिरी बाळगावी.

कधीकधी असतील शिते तर जमतील भुते अशी स्थिती. मुला-बाळांमध्ये लेकी-सुनांमध्ये रमावसं वाटतं. त्यांना आजारपणात आग्रहाने गरमागरम गोडधोड निगुतीने सेवासुश्रुषा करणारं, आपलं जिव्हाळ्याचं माणूस हवं असतं. तेव्हा मात्र प्रत्येकाच्या मनभावना जाणणारं, मायेनं न्हाऊमाखू घालणारं आणि वेळप्रसंगी म्हातारपणाची काठी, आधार होणारं, आपलेपण जपणारं, जीव लावून सेवा करणारं आपलं कोणीतरी हवं असतं. पण काही ठिकाणी तर आजारी वृद्धांना जास्तीत जास्त नर्स, आयाबाई किंवा निराधार केंद्रात हवाली केलं जातं. तिथे त्यांना सारं मिळतं… मिळत नाही ती आपली माणसं!! जे कायम त्यांच्या डोळ्यांसमोर असावेसे वाटते. मात्र टक लावून वाट पाहण्यात त्यांचा शेवटचा काळ जातो. माझा बाळा, माझा दत्ता, माझा पक्या, माझी कमा मला कधी भेटायला येणार? वाट पाहत हे डोळे काळजाचं पाणी करतात. त्यांच्या वेदना, आठवणी, विरह पाहून घरापासून लांब परक्या माणसांत ती ग्रुप बनवतात. हसून खिदळवून योगा, हरिपाठ, सत्संग, भजन, कीर्तन यात रमतात. त्यांच्या आठवणीत आपली माणसं शोधतात.

एखाद्या वृद्धाश्रमात फेरी मारून बघा. तुम्हीही होणार आहात वृद्ध ज्येष्ठ, तेव्हा त्या नाजूक सांजवेळी सोसाल काही असे जिणं. आयुष्यभर कष्ट घेणारे होळपळणारे हात, करपणारं काळीज, कष्टाने वाकलेले शरीर, थकलेलं मन. शेवटी काय घेऊन जाणार आहोत आपण असं म्हणत फक्त सगळंच पुढच्या पिढीला बहाल करता करता रिते होता आणि या रिकामपणामध्ये हे रितेपण खाऊ लागतं. सोबतीला आजार आणि फक्त आजार बीपी, शुगर, लिव्हर, किडनी, लकवा असा द्या. तसं तर सारे जीवन जगायला विसर पडलेली मंडळी अचानक सारं लुटल्यावर या मोहमयी संसारात स्वतःच्या जीवतोड मेहनतीने उद्या करू, उद्या करू म्हणता म्हणता जगायचं विसरून जातात. मग अशा वेळी तेच केलं असेल ना होम लोन, गाडी लोन, एज्युकेशन लोन, हप्ते, कर्जबाजारीपण, अतोनात कष्ट, न झेपणाऱ्या जबाबदाऱ्यांचे ओझं. यात जीवन इतकं पुढे पळतं कॅलेंडरची पाने पलटावी तशी भराभर. आयुष्याच्या सांजवेळी हातात असतं ते फक्त अधुरे, रितेपण. आतुरता, असहाय्यता, अगतिकता, अनिश्चितता, अधीरता यांनी हळवी होतात ही माणसं. प्रश्न, भय, नैराश्य, गुंता, नकारात्मकता यात गुरफटतात.

बघा विचार पटतोय का! घ्या काळजी आपल्या आजूबाजूच्या ज्येष्ठांची, आपल्या स्वतःची, आपल्या माणसांची. थोडंसं जगून पाहा, करून पाहा आणि थोडं श्रेष्ठ व्हा. कशाला हो गरज आहे वृद्धाश्रमांची? आणि त्यांच्या मरणानंतर गुलाबजाम, जिलबी, लाडू, हलवा, बुंदी वाटण्याची? आधीच त्यांना खायला घालाल, तर कावळ्याला विनवणी करण्याची, गाईला, मुंगीला घास देण्याची आणि पितृदोष शांतीची वेळच येणार नाही. जिवंत मंडळींना उपाशी ठेवून पितृदोष जाईल का? कर्म चांगले ठेवा. सुईमागून दोरा असतोच की. ती श्रेष्ठ उपासना आहे आणि तीच आहे पितृशांती. द्या ज्येष्ठांना आधार! तुम्हीच तुमच्या कर्माचे शिल्पकार!!

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -