Friday, July 19, 2024
Homeसाप्ताहिककोलाजस्वतःच स्वतःशी...

स्वतःच स्वतःशी…

  • प्रतिभारंग : प्रा. प्रतिभा सराफ

खूपदा आपण तोंडघशी पडतो ते आपल्याच चुकीमुळे किंवा चांगुलपणामुळे. त्याचा त्रास आपल्याला होतो. आजच्या एकाकी जगात कोणाची सोबत घ्यावी, तर बरेचदा त्याचाच जास्त त्रास होतो त्यापेक्षा एकटेपण बरे, असे वाटते. अशा वेळेस करायचे काय? तर स्वतःच स्वतःशी संवाद साधायचा. चला, थोडेसे सेल्फिश होऊन स्वतःशी मैत्री करून बघूया…

आपल्यापैकी अनेकांनी स्वतःला कोसले असेलच ना कधीतरी… म्हणजे असे न करता असे केले असते मी, तर किती बरे झाले असते… मागचा अनुभव पाठीशी होता तरी मला का हे सुचले नाही? मी कोणतीही कृती विचार न करता कशी काय करू शकतो? इत्यादी.

छोटेसे उदाहरण द्यायचे म्हणजे मी कॉलेजमध्ये जाताना बसस्टॉपवर सोसायटीत राहणारी एक मैत्रीण दिसली, तर तिला गाडीची काच खाली करून माझ्या स्वतःहूनच बोलवले आणि रेल्वे स्टेशनपर्यंत सोडते, असे सांगितले. ती हसतच गाडीत चढली आणि गप्पा मारू लागली. सकाळची प्रसन्न वेळ आणि तिच्या गप्पात मात्र आमच्या सोसायटीमधल्या कोणत्या तरी कुटुंबाविषयीचा तक्रारीचा सूर. शेवटी शेजारी म्हटल्यावर काहीतरी समस्या असणारच! कधी कोणी कचरा फेकताना आपल्या घरात पडत असेल, दुरुस्तीच्या कामादरम्यान वा काही अन्य कारणांमुळे वरच्या घरातले पाणी खालच्या घरात गुरुत्वाकर्षणाच्या नियमानुसार येत असेल, कोणाला काही वस्तू मागण्याची सवय असू शकेल, कोणाच्या तरी घरात रात्री उशिरापर्यंत पार्टी चालत असेल… कारणे काय हो, न संपणारी आहेत.

या मैत्रिणीचा गाडीत चढल्यापासूनच रोजच सोसायटीतल्या माणसांविषयी अशा गप्पा की दिवसभराचा मूड खराब होऊन जायचा. बरं आपण विषय बदलायचा म्हटले तरी ती त्याच मूळ विषयावर यायची. आता या मैत्रिणीला काही प्रत्यक्ष समस्या नसायचीही. पण याची भांडणे, त्याच्या तक्रारी असे काहीतरी ती सांगत राहायची.मी तिला पहिल्यांदा कशासाठी ‘लिफ्ट’ दिली? याबद्दल स्वतःलाच कोसत राहिले. खरे तर कॉलेजचा रस्ता सरळ होता आणि थोडी वाट वाकडी करून एक दूरचा फेरा घेऊन मला तिला रेल्वे स्टेशनला सोडावे लागायचे; याबद्दल माझी तक्रार नव्हती किंवा तिलाही या गोष्टीची जाणीव नव्हती की जाणीवपूर्वक दुर्लक्ष करायची तिची सवय होती?, माहीत नाही. कोणत्याही रेल्वेस्टेशनजवळ गर्दी असतेच ना, त्यामुळे तिला सोडताना माझी दहा मिनिटे तरी वाया जायची. त्यानंतर असे झाले की सकाळी तयार होतानापासूनच ती भेटणार आणि ती काहीतरी मला नको असलेल्या विषयावर बोलणार आणि ती नकारात्मकता घेऊनच मी दिवसभर वावरणार, हे सकाळीच मनात यायचे आणि दिवसभर तेच विचार राहायचे. या गोष्टीचा मला खूप त्रास व्हायला लागला. बरं तिची बस स्टॉपवर उभे असायची आणि माझी कॉलेजमध्ये जायची एकच वेळ. सहा-आठ महिन्यानंतर अगदी विचारपूर्वक मी रोजच्यापेक्षा १५ मिनिटे लवकर निघायला सुरुवात केली. नेहमीप्रमाणे गाडीत चढल्यावर पूर्वीच जशी कोणत्या तरी कविता, गाणी ऐकत जायचे तसेच ऐकायला सुरुवात केली. होय, पूर्वी तिच्या बोलण्यात व्यत्यय नको म्हणून मला हे ऑडिओ बंद करावे लागायचे! एकदा तिने सहजच विचारले, ‘तू हल्ली दिसत नाहीस?’ मी उत्तरले, ‘कॉलेजची वेळ बदलली आहे.’ अशा तऱ्हेने माझ्या परीने मी एक समस्या सोडवली होती. तर या लेखाच्या निमित्ताने मला सांगायचे आहे, खूपदा आपण तोंडघशी पडतो ते आपल्याच चुकीमुळे किंवा चांगुलपणामुळे. त्याचा त्रास आपल्याला होतो. कधी या त्रासातून आपण मोकळे होऊ शकतो, तर कधी कधी मोकळे होऊ शकत नाही. आजच्या काळात जगातील माणसे एकाकी बनत चालले आहे. कोणाची सोबत घ्यावी, तर कधी कधी त्याचाच जास्त त्रास होतो त्यापेक्षा एकटेपण बरे, असे वाटू लागते. माणसांचे माणसांना स्पर्श होत नाहीत, त्यांचे एकमेकांशी संवाद होत नाहीत, जवळच्या माणसांकडून आपले भरभरून कौतुक होत नाही किंवा त्यांना कोणी हक्काने रागावणाराही नसतो, अशा वेळेस करायचे काय? माझ्याकडे उत्तर आहे, जे मी माझ्यापुरते ठरवलेले आहे. कदाचित तुमच्याकडे इतर उत्तरे असतील, तर जरूर कळवा.

अलीकडे मी स्वतःच स्वतःला प्रोत्साहन देते. आपली पाठ आपणच थोपटते, त्यासाठी हात पाठीवर पोहोचलाच पाहिजे, असे नाही. काही चुकीचे घडले, तर स्वतःच स्वतःला खडसावते, ओरडते तर कधी एखादी थोबाडीतही मारून घेते. एखाद्या विषयावर स्वतःशीच चर्चा करते. दोन्ही बाजूचे मुद्दे मांडते आणि त्यातील योग्य मुद्दे घेऊन लिहिते किंवा भाषण करते. स्वतःच स्वतःशी स्पर्धा करते. मागच्या वेळेस केलेल्या कामापेक्षा हे काम कसे चांगले झाले आहे की कमी चांगले झाले आहे, याचा विचार करते. स्वतःशी हसते, कधी आनंदाने गुणगुणते. याला कदाचित कुणी वेडेपणाचे लक्षण म्हणूही शकेल. पण स्वतःच स्वतःची काळजी घेणे, स्वतःची सोबत करणे, कधीकधी इतरांच्या सोबतीपेक्षा जास्त आनंददायी असते. चोवीस तास आपल्या हातात असलेला मोबाइल कितीतरी गोष्टी आपल्याला शिकवतो. छान कपडे घातल्यावर, मस्तपैकी तयार झाल्यावर किंवा एखाद्या निसर्गरम्य व तत्सम आपल्या आवडीच्या ठिकाणी छानशी पोझ देऊन आपण स्वतःच नाही का, स्वतःचा फोटो काढतो. त्या सेल्फीप्रमाणेच थोडेसे सेल्फिश होऊन स्वतःशी मैत्री करून बघू, एकाकीपणा दूर सारण्यासाठी स्वतःचीच सोबत करू आणि स्वतःच स्वतःला कसा आनंद देता येईल, ते पाहू!

pratibha.saraph@gmail.com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -