Monday, June 30, 2025

Parbhani Accident : दर्शन घेऊन परतताना भाविकांचा रस्त्यातच अपघात; तीन ठार तर सहा जखमी

Parbhani Accident : दर्शन घेऊन परतताना भाविकांचा रस्त्यातच अपघात; तीन ठार तर सहा जखमी

परभणीत क्रूझर गाडी आणि ट्रॅक्टरची जोरदार धडक


परभणी : परभणीच्या (Parbhani) पाथरी तालुक्यातील वडीपाटीजवळ ट्रॅक्टर आणि क्रुझरमध्ये मध्यरात्री भीषण अपघात झाला. यशवाडी येथील मारुतीच्या दर्शनासाठी आलेल्या परतुर येथील भाविकांच्या गाडीची आणि ऊस घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरची जोरदार धडक झाली. यामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला, तर सहा जण जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत व जखमींना स्थानिकांच्या मदतीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


जालना जिल्ह्यातील परतुर येथील ब्राह्मण वाडीचे एकूण ९ जण परभणीच्या यशवाडी येथील मारुतीच्या दर्शनासाठी आले होते. दर्शन झाल्यावर हे भाविक पुन्हा जालना जिल्ह्याकडे निघाले होते. मात्र तेव्हाच हा अपघात झाला. ट्रॅक्टर आणि गाडीची धडक इतकी भीषण होती की, क्रुझर गाडीचा समोरील भाग थेट ट्रॅक्टरच्या ट्रॉलीत जाऊन घुसला. अडकलेली क्रुझर गाडी जेसीबीने बाहेर काढावी लागली.


या अपघातात गाडीतील अमोल मारुती सोळंके, अण्णासाहेब हरिभाऊ सोळंके, दिगंबर भिकाजी कदम या ३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, कृष्णा सखाराम सोळंके, उमेश भारत सोळंके, संतोष कुंडलिक पांचाळ, अविनाश चंदू पाटील सोळंके, दशरथ सुदामराव, किशोर सोळंके हे ६ जण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Comments
Add Comment