Old Hindi songs : कह दे ये उनसे कोई…

Share
  • नॉस्टॅल्जिया : श्रीनिवास बेलसरे

‘मेला’ हा दिलीपकुमार, नर्गिसचा १९४८ सालचा चित्रपट. त्यात या दोघांशिवाय रहमान, नूरजहां आणि जीवन हे प्रमुख कलाकार होते. आजम बाजीदपुरी यांच्या कथेवर निर्माण झालेल्या चित्रपटाचे निर्माते होते ‘वाडिया मुव्हीटोन’ आणि दिग्दर्शक एस. यू. सनी!

‘मेला’ या शोकांतिकेची कथा तशी ढोबळच होती. शिक्षकाची मुलगी असलेल्या मंजूला (नर्गिस) सावत्र आई आहे. गावातल्या मोहनची (दिलीपकुमार) बालपणापासून तिच्याशी निरागस मैत्री आहे. तारुण्यात या मैत्रीचे रूपांतर तारुण्यसुलभ प्रेमात होते आणि त्यांचे लग्न ठरते. मोहन लग्नात मंजूला देण्यासाठी दागिने आणायला शहराकडे निघतो आणि इथेच त्याच्या जीवनाची शोकांतिका सुरू होते. रस्त्यात डाकू मोहनला अडवतात. त्याच्याकडचे सगळे पैसे काढून घेताना त्याला इतके मारतात की, त्याला दीर्घकाळासाठी दवाखान्यात ठेवावे लागते.

इकडे मंजूवर गावातील मेहकू नावाच्या (जीवन) खलनायकाची वाईट नजर असते. मोहन गावात न परतल्याने तो ‘दुसऱ्याच मुलीबरोबर पळून गेला आहे’ अशी अफवा मेहकू सगळीकडे पसरवून देतो. साध्याभोळ्या गावकऱ्यांचा या अफवेवर विश्वास बसतो. मंजूच्या सावत्र आईच्या मदतीने मेहकू ठरलेल्या मुहूर्तावर मंजूचे लग्न एका ७० वर्षांच्या वृद्धाशी लावून देतो. पुढे पतीच्या निधनामुळे विधवा मंजूवर मुलांची जबाबदारी पडते. शेवटी जीवनात पूर्णत: निराश झालेली मंजू एका वादळी रात्री कड्यावरून कोसळून मरण पावते, अशी मेलाची कथा होती.

मोहन पळून गेला, अशी अफवा जरी गावात उठलेली असली तरी मंजूचे मोहनवर मनापासून प्रेम असते, तिचा मोहनवर विश्वास असतो तरीही ‘मन चिंती ते वैरी न चिंती’ असे म्हणतात तशी तिची अवस्था होते! ती मोहनच्या परतण्याची आतुरतेने त्याची वाट पाहात असते. एकीकडे निराशा आहे, दुसरीकडे मोहनवर थोडा रोष आहे आणि तो परत यावा अशी इच्छाही आहे. तिच्या मनातले असे गुंतागुंतीचे भाव शकील बदायुनी यांनी फार सुंदरपणे एका गाण्यात मांडले होते.

खिडकीतून मंजू रस्त्याकडे पाहतीये. तिथे आलेल्या गायकांच्या ग्रुपकडे तिचे लक्ष जाते. गाण्यातला आशय आपल्या दुर्दैवी कथेला तंतोतंत लागू पडत आहे हे लक्षात येऊन तिच्या डोळ्यांत पाणी येते. जोहराबाईंच्या आवाजातले शकील बदायुनी यांचे ते शब्द होते –
“फिर आह दिलसे निकली,
टपका लहू जिगरसे,
शायद वो जा रहे,
छुपकर मेरी नजरसे!”

जुन्या चित्रपटगीतांची आताच्या गाण्यात न दिसणारी अनेक वैशिष्ट्ये होती. कथेतील पात्राच्या मनातील भावना, तिचे नाजूक पदर, परस्परविरोधी विचारांची गुंतागुंत सगळे अतिशय चपखल शब्दांत मांडलेले असे. त्यामुळे त्या त्या सिनेमाच्या कथेच्या बाहेर जाऊनही लोक गाण्यातील भावनेशी समरस होऊ शकत. अनेकदा तर अनेक सुमार दर्जाचे चित्रपटही लोकप्रिय होण्यामागे त्यातील मधुर गाणी आणि त्या गाण्यांचा गहिरा अर्थ हेच कारण असायचे!

संगीतकारही गाण्यातील भाव लक्षात घेऊन एखाद्या अनुरूप रागावर आधारित चाली देत असत. त्यामुळे कवितेचा भावार्थ श्रोत्यांच्या हृदयात लीलया पोहोचे. गाणे मनाला भिडल्यामुळे डोळ्यांत अश्रू येत. हे केवळ सिनेमागृहातच व्हायचे असे नाही. रेडिओवरही काही गाणी ऐकताना श्रोत्यांचे डोळे ओलावत.

भेटणे शक्य असून एकाने ते टाळणे हा असफल प्रेमाच्या कथेतील एक अटळ प्रसंग! ज्याने साथ सोडली आहे त्याच्या मनात दाटलेली अपराधीपणाची भावना अजून ताजी आहे. त्यामुळे ती व्यक्ती जीवलगाच्या नजरेला नजरही देऊ शकत नाही म्हणून दुरूनच निघून जाते, अशी कल्पना शकील बदायुनी यांनी केली होती. प्रेमिक म्हणतो, ‘तिचे असे जाणे पाहून हृदय रक्तबंबाळ होते. मनात आतल्या आत जणू रक्ताचे थेंब टपकत आहेत. कारण ती पाहा कशी सोडून जाते आहे. आम्ही प्रेमात होतो, तेव्हा एकमेकांना भेटण्यासाठी किती आतुर असायचो. असे कधीच वाटले नव्हते की ती दारापर्यंत येईल आणि न भेटताच निघून जाईल!’

अनेक प्रेमकथांत ही अवस्था येऊन जाते. दुरावा निर्माण झालेला असतो. प्रिय व्यक्तीचा राग येत असतो. पण प्रेमही तितकेच अनावर असते. पण ‘मी पुढाकार का घेऊ? त्याची चूक आहे तर त्यानेच पुढाकार घ्यावा’, माफी मागावी असे वाटत असते. तरीही राहवत नाही म्हणून दुखावलेली व्यक्ती नेहमीच्या ठिकाणी काहीतरी कारण काढून जातेच. पण अचानक पुन्हा सगळे आठवल्याने न भेटताच परत येते. तसा हा किती क्षुल्लक प्रसंग? पण शकील बदायुनी यांनी तो ही गाण्याचा विषय करून टाकला. ते म्हणतात, ‘हाय रे देवा! ती माझा असा छळ करेल असे कधीच वाटते नव्हते. अगदी दारापर्यंत येऊनही ती तशीच परत गेली!’ गाण्याचा हा आशय कव्वालीच्या पिंडाचा असल्याने नौशाद साहेबांनी गाण्याला तशीच ट्रीटमेंट दिली होती.

मालूम क्या था दिलपर,
इक ये सितम भी होगा…
आयेगे और आकर,
फिर जायेंगे वो दरसे…
या विरहाचा मला किती त्रास होत असेल हे काय तिला काय माहीत नसणार? माझी अगतिकता तिला ठाऊक असलेच. किती आशेने मी तिच्या वाटेकडे डोळे लावून बसलो/बसले आहे. पण तिला/त्याला तरीही भेटावेसे वाटू नये ना?

वो जानते तो होगे,
मजबूरियां हमारी…
हम जिनको देखते हैं,
हसरतभरी नज़रसे…
कथेत शेवटी मंजूचे लग्न दुसऱ्याच व्यक्तीशी होते. जुन्या काळी लग्न हे आयुष्यभराचे, ७ जन्मांचे, अतूट बंधन असायचे. सर्वांवर संस्कारच तसे होते. त्यामुळे लग्न झाले की आधीची सगळी नाती संपली. विवाहाचे पावित्र्य सांभाळायचे, तर ‘जुने भावबंध तोडनेच योग्य’ अशी सार्वत्रिक श्रद्धा होती. त्यामुळे गीताचे शेवटचे कडवे ही निर्वाणीची भाषा करते.

ती म्हणते आता त्याचा माझा संबंधच कुठे उरला? कुणीतरी त्याला सांगा, आता इकडच्या रस्त्याने जाऊसुद्धा नकोस. खरे तर यामागेही प्रेम हेच कारण आहे! हे समजायला हवी ती संवेदनशीलता जुन्या प्रेक्षकातही होती. इकडून जाऊ नका, पुन्हा दिसू नका कारण मी मनाचा तोल कसाबसा संभाळला आहे. तुला नुसते पाहिले तरी तो सुटेल आणि पुन्हा मला सावरता येणार नाही. जणू अशी याचनाच दुखावलेली प्रेमिका करते आहे.

हम हो गये पराये,
अब उनसे वास्ता क्या…
कह दे ये उनसे कोई,
गुज़रे ना वो इधरसे…
पूर्वी प्रेमातील किती वेगवेगळ्या छटा किती तबियतने व्यक्त केल्या जात! सध्यासरळ प्रेक्षकांना त्या समजतही असत. सहसा असफल होणाऱ्या प्रेमकथाही लोक तन्मयतेने पाहत. सिनेमा म्हणजे केवळ दोन घडींची करमणूक, असा चंगळवादी समज दृढ होण्याच्या आधीचे ते दिवस! त्यांच्या या आठवणी!

Recent Posts

Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, सोमवार, २१ एप्रिल २०२५

पंचांग आज मिती चैत्र कृष्ण अष्टमी, शके १९४७. चंद्र नक्षत्र उत्तराषाढा, योग साध्व. चंद्र राशी…

50 seconds ago

Summer Tips : उन्हाळ्यात कशी घ्यावी डोळ्यांची काळजी, जाणून घ्या ‘या’ गोष्टी!

मुंबई : उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागली आहे. कडक सूर्यप्रकाशात घराबाहेर पडणे त्रासदायक वाटू लागले आहे.…

21 minutes ago

क्रिकेटपटूंच्या कराराची BCCI ने केली घोषणा, ३४ खेळाडूंशी करार; फक्त चार खेळाडूंचा ए+ मध्ये समावेश

मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने ३४ क्रिकेटपटूंसोबतच्या कराराची घोषणा केली आहे. रोहित…

52 minutes ago

काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा २६/११ च्या हल्ल्यामागे अदृश्य हात, भाजपाच्या माधव भांडारींचा आरोप

मुंबई : मोहम्मद अजमल कसाबसह दहा पाकिस्तानी अतिरेक्यांनी मुंबईत २६ नोव्हेंबर २००८ रोजी हल्ला केला.…

1 hour ago

Benefits Of Watermelon : कलिंगड खा अन् हायड्रेट राहा!

ऊन्हाळ्याच्या दिवसांत शरीराला हायड्रेट ठेवणं खूप महत्वाचं असते. ऊन्हाळ्याच्या दिवसांत खाण्यापिण्याच्या गोष्टींची विशेष काळजी घ्यावी…

1 hour ago

Emraan Hashmi: इमरान हाश्मीच्या नव्या चित्रपटावर भाजपा आणि काँग्रेस खासदारांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया!

मुंबई: इमरान हाश्मीचा नवा चित्रपट 'ग्राउंड झिरो' सध्या चर्चेत आहे. नुकताच या चित्रपटाचा प्रीमियर झाला.…

2 hours ago