मायभाषा: डॉ. वीणा सानेकर
स्वातंत्र्यवीर सावरकरांचे ऋण मराठी भाषकांनी सदैव स्मरणात ठेवले पाहिजेत. भाषाशुद्धीची सावरकरांनी सुरू केलेली चळवळ मराठीला संजीवनी देणारी ठरली. संस्कृत, तमिळ, तेलुगू, आसामी, काश्मिरी, गौड, भिल्ल अशा सर्व भाषा व बोलीभगिनींचा तसेच स्वकीय शब्दांच्या भांडवलाचा सावरकरांना आदर होता. आपण भाषेबाबत ढिलाई केली म्हणून परकीय शब्द आपल्या भाषेत घुसू शकले, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
सावरकरांनी एकदा कोल्हापुरातील हंस पिक्चर्स या प्रसिद्ध संस्थेला भेट दिली होती, तेव्हा जिकडे-तिकडे इंग्रजी पाट्या दिसल्या. त्यातल्या बहुतेक पाट्या इंग्रजी शब्द वापरण्यात मोठेपणा व तसेच वापरण्याचा प्रघात आहे, यातून आलेल्या होत्या. चित्रपट संस्थांमध्ये प्रचलित अनेक शब्दांना सावरकरांनी स्वकीय भाषेतले शब्द सुचवले. न्यूजरील म्हणजे वृत्तपट, ट्रेलर म्हणजे परिचयपट, इन्टरव्हल म्हणजे मध्यंतर, थ्री डायमेन्शन म्हणजे त्रिमितीपट, आऊटडोअर शूटिंग म्हणजे बाह्यचित्रण इत्यादी.
ज्या नव्या वस्तूंना, पदांना शब्द नव्हते, त्यांच्याकरिता सावरकरांनी शब्द सुचवले. हळूहळू ते रुजले. या शब्दांकरिता त्यांनी संस्कृतचा आधार घेतला. उदा. टेलिफोन (दूरध्वनी), लाऊडस्पीकर (ध्वनिक्षेपक), मेयर (महापौर). आपल्या सत्तेमुळे जेव्हा एखादा जेता देश आपली संस्कृती लादू पाहतो, तेव्हा सत्तेच्या आधारावर जिंकलेल्या देशावर केलेले ते आक्रमण असते. त्यामुळेच आपली भाषा जपावी लागते. आपल्या भाषेचे वळण ठेवून नवे शब्द घडवणे हे मोठे आव्हान आहे. सावरकरांच्या मते, “रुढ विदेशी शब्द काढणे वा नवीन स्वकीय शब्द रुढ करणे कठीण आहे अशी आधीच समजूत करून घेऊन स्वस्थ बसू नका. प्रयोग करत गेले म्हणजे आपोआप शिक्षितांमधून अशिक्षितांपर्यंत शब्द पाझरत जातील.” याबाबत लेखक व शिक्षकांची भूमिका मोठी असणार आहे व ते नेटाने ही जबाबदारी पाडतील, असा विश्वास सावरकरांनी व्यक्त केला आहे.
सुंदर, स्वकीय शब्दांनी आपली भाषा समृद्ध होताना पाहताना प्रत्येक भाषाभिमानी माणसाला आनंदच होईल. म्हणून परक्या भाषेतील शब्द आपल्या भाषेत वापरत राहणे निंद्य व उपहासास्पद आहे, ही सामाजिक भावना निर्माण व्हायला हवी, असे त्यांनी सुचवले आहे. भाषाशुद्धीची गाभा उलगडणारा सावरकरांचा विचार असा होता की, आपल्या भाषेतील शब्दांना मारून शिरजोर होऊ पाहणाऱ्या विदेशी शब्दांना भाषेतून बहिष्कृत करावे कारण, ते भाषेतून गेले तरी आपली काही हानी होणार नाही. जुने स्वकीय शब्द मारून विदेशी शब्द निष्कारण वापरणे मूर्खपणाचे आहे. जगातील आघाडीचे देश आपापल्या भाषा जपत – वाढवत असताना आपण मात्र आपल्या भाषांबाबत उदासीन राहिलो.
विविध विद्याशाखांमधील अद्ययावत ज्ञान या देशांनी स्वत:च्या भाषांमध्ये आणले. आपण मात्र आपल्या भाषा दुबळ्या असल्याचे गंड निर्माण केले. जगातील अद्ययावत ज्ञान-विज्ञान आपल्या भाषांमध्ये आणण्याकरिता प्रयत्न व धडपड करणे गरजेचे आहे. आपल्या भाषेचे बाळकडू पिऊन आपण धष्टपुष्ट झालो. आता तिला आपण जीवनसत्त्व देऊन बलवान करण्याची गरज आहे.