कोकणी बाणा: सतीश पाटणकर
नाधवडे या गावात गंगेचा शोध घेण्यासाठी जमीन खोदण्याची गरज नाही. कारण येथे गंगा स्वत:हून प्रकट झाली आहे. हजारो वर्षांपासून येथे स्थिरावलेल्या गंगेच्या सान्निध्यातून गोठण नदीचा उगम तर होतोच, पण सोबत नापणेच्या डोहात बारमाही धबधबा खळाळताना दिसतो. उमाळे जिथे प्रकटले आहेत, त्याच परिसरात महादेवाचे मंदिर आहे. महाशिवरात्रीला येथे मोठी यात्रा भरते. मंदिरात पोहोचायचं झाल्यास गोठण नदी पार करावी लागते.
भगीरथ राजाच्या घोर तपश्चर्येनंतर प्रसन्न झालेल्या शंभूमहादेवानं गंगेला पृथ्वीवर प्रकट होण्यास सांगितलं; परंतु अत्यंत तीव्र वेगानं स्वर्गातून निघालेली गंगा पृथ्वीवर रोखली न गेल्यास ती थेट पाताळात जाण्याची शक्यता होती. यामुळे शंकरानं विशाल दर्शन घडवत स्वर्गातून निघालेल्या गंगेला आपल्या मस्तकावर झेललं आणि तिला पृथ्वीवर स्थिर केलं, अशी पुराणात कथा आहे. नाधवडे गावातील महादेवाच्या मंदिराशेजारी असणाऱ्या उगम पावणारी गोठणनदी आणि या नदीची उडी ज्यात पडते, त्या सर्वत्र परिचित असणाऱ्या बारमाही वाहणाऱ्या नापणेच्या धबधब्याचं सौंदर्य पर्यटकांना भुरळ घालतं. तरळ्यावरून वैभववाडीकडे जाताना वाटेत नाधवडे लागते. या नाधवडेच्या विस्तीर्ण माळरानावरील झाडांच्या सान्निध्यात हजारो वर्षं गंगेचा प्रवाह वाहतो आहे.
नाधवडेच्या पवित्र भूमीत महादेव मंदिराच्या प्रांगणात किंवा येथून १ किमीवर असलेल्या विठ्ठलाच्या चरणस्पर्श स्थळी वाहणारा झरा येथे दृष्टीस पडतो. हे उमाळे येथे किती वर्षांपासून येताहेत कुणास ठाऊक? पाऊस असो वा कडक उन्हाळा, उमाळे आपली उंची काही सोडत नाहीत. सातत्यानं येणाऱ्या पाण्याचा वेगही तितकाच. महादेव मंदिराच्या प्रांगणात रांगत-रांगत पोहोचणारं पाणी, गोठणनदीवरून पुढे सुसाट वेगात सुटतं. या परिसरात असे ५० ते ६० उमाळे आहेत. प्रत्येक उमाळ्यातून तासागणिक हजारो लिटर पाणी येत असते. साऱ्यांना हा पाणवठा आपला वाटतो. पृथ्वीवर येणाऱ्या प्रत्येक जीवाची काळजी परमेश्वर घेतोच, याची प्रचिती येथे येते.
गावाच्या आग्नेय दिशेस उभा असलेला भव्य-दिव्य सालवा डोंगर हे नाधवड्याचे भूषण मानले जाते. कोकिसरे-नाधवडे, खांबाळे, अर्चिणे या गावांना सालव्याची सीमा आहे. तेथे पांडवांनी वस्ती केली होती अशी पुराणकथा आहे, तर त्या खिंडीतून शिवाजी महाराज, त्यांचे सरदार, सैनिक येत-जात असत असा इतिहास आहे. उजव्या-डाव्या बाजूला शिंगीचा डोंगर, पालखीचा डोंगर व पश्चिमेला देव डोंगर आहे. श्री महादेवाचे मंदिर साडेतीन शक्तिपीठांपैकी एक मानले जाते. ते पूर्वाभिमुख आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात स्वयंभू पिंड आहे. घुमटावर सुंदर असे नक्षिकाम आहे. मंदिरासमोरून गोठणा नदी वाहते. महाशिवरात्र हा उत्सव तेथे मोठ्या उत्साहाने ३ दिवस साजरा केला जातो. मंदिराच्या समोर काही फूट अंतरावर शंकराच्या जटेतून गंगा वाहावी असा पाण्याचा उगम म्हणजेच उमाळा. बारा वाड्या असलेल्या गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी देवाचे स्थान आहे.
यात्रेच्या पहिल्या दिवशी नवलादेवी मंदिरातून देवीची पालखी, खांबकाठी, निशाण, अब्दागिरसह ढोलताशांच्या गजरात गावातून वाजत-गाजत आणली जाते. यात्रेच्या दिवशी दिवसागणिक तीनदा आरती केली जाते. त्यावेळी प्रदक्षिणेवर गुलाल व चुरमुरे यांची उधळण करून लोक ‘शिव हर हर महादेव’चा जयघोष करतात. रात्री सांस्कृतिक कार्यक्रम, युवक मंडळाचे नाटक-एकांकिका व मुंबईकरांचे नाटक सादर केले जाते. पहाटेपर्यंत जागर करून अखंड ७२ तास यात्रा भरते. तिसऱ्या दिवशी स्त्री-पुरुष, आबालवृद्ध यांसह सर्वजण नदीपात्रात स्नान करतात. विशेषत: नवविवाहित जोडपी नदीला श्रीफळ अर्पण करून स्नान करतात. यात्राकाळात कोणाच्याही घरी गेले तरी पाहुणा समजून आदरातिथ्य केले जाते. मंदिराला कोल्हापूरच्या भाविकाने १८८६ मध्ये नवस पूर्ण झाल्याने दिलेली घंटा मंदिरात आहे.
नाधवडे गावची ग्रामदेवता म्हणून नवलादेवीची ख्याती आहे. लोकवस्तीपासून थोडे दूर हिरव्यागार वनराईत देवीचे पुरातन मंदिर आहे. मंदिराच्या मागे संथ वाहणाऱ्या नदीचे पात्र आहे. पूर्वसत्ता म्हणून समजल्या जाणाऱ्या श्री नवलादेवीच्या मंदिरामध्ये देवीची सुबक मूर्ती आणि बाजूला रवळनाथाची मूर्ती आहे. काळ्या पाषाणात कोरलेली देवीची मूर्ती प्रसन्न आहे. तिच्या एका हातात वीणा तर दुसऱ्या हातात शस्त्र आहे. मंदिराची रचना कोकणातील इतर देवळांसारखी आहे. आवारात कोरडी विहीर आहे. त्या विहिरीत एखादे डुक्कर पडले, तर त्याचे मांस संपूर्ण गावात देवीचा प्रसाद म्हणून वाटले जाते. देवीने नाधवडे गावच्या हद्दीपर्यंत डुक्कर किंवा इतर प्राण्यांची शिकार करण्यास मनाई केली आहे, असा रहिवाशांचा समज आहे. मंदिराचा परिसर शांत व निसर्गरम्य आहे. तेथे दर मंगळवारी राजदरबार भरतो. पंचक्रोशीतील भक्त गाऱ्हाणी घेऊन देवीच्या दर्शनाला जातात. होलिकोत्सवात देवीची पालखी वाजत-गाजत प्रत्येकाच्या घरी जाते.
नाधवडे गावात एकूण १२ मंदिरं आहेत. ब्राह्मणदेव, नागेश्वर, धावगीर, महादेव, विठ्ठल-रखुमाई, चव्हाटी, सिंहासन, गांगोदेव, स्थानेश्वर, आदिनाथ, हिरवाई या सर्वच देवतांकडे वर्षाचे बारा महिने काही ना काही उत्सव सुरू असतो. नाधवडे गावात असलेल्या विठ्ठल मंदिराच्या चरणावरच गंगा प्रकट झाली आहे. विठ्ठल-रखुमाईच्या पाषाणी मूर्तीदरम्यान अंतर आहे आणि या दोन्ही अंतरावरून दोन झरे वाहतात. जवळसपास ५०-६० वर्षांपूर्वी मंदिराच्या जीर्णोद्धारावेळी विठ्ठल-रखुमाईचे चरणस्पर्श करून येणाऱ्या गंगेच्या प्रवाहाला तळीत उतरविण्यासाठी गावच्या जहागीरदारांनी प्रयत्न केले. कोल्हापूर संस्थानचे बावडेकर येथील जहागीरदार.
नाधवडेतील हिरवाईमध्ये अनेक शतकापासून असलेली त्यांची बाग आजही पाहायला मिळते. महादेवाच्या माळावरून गोठणमधून बागडत जाणारा हा उमाळा पुढे नाधवडेच्या हद्दीपर्यंत सुसाट वेगानं धावत हद्दीवरून उडी मारतो. तो जेथे उडी मारतो, ते स्थळ नापणेचा धबधबा म्हणून सर्वांना परिचित आहे. या धबधब्याचा वरचा भाग म्हणजे नाधवडे आणि जिथे पाण्याचा झोत पोहोचतो, तेथून नापणेची हद्द सुरू होते. सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांत पावसाळ्यात हजारो धबधबे दिसतात. पावसाळा संपला की, धबधबेही निरोप घेतात. पण नापणेच्या धबधब्यावरचं पाणी मात्र बारमाही असतं. नापणेचा धबधब्याचा प्रवाह अंगावर झेलणं, हे सोपं नाही. मात्र त्याचं दर्शन घेता येतं. (लेखक मुख्यमंत्र्यांचे माजी माहिती अधिकारी आहेत)