Wednesday, July 2, 2025

Maratha Reservation : उद्धव ठाकरेंची बैठक मराठा कार्यकर्त्यांनी उधळून लावली

Maratha Reservation : उद्धव ठाकरेंची बैठक मराठा कार्यकर्त्यांनी उधळून लावली

दौर्‍याच्या अनुषंगाने नांदेड येथे आयोजित केली होती बैठक


नांदेड : उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आज नांदेड (Nanded) दौर्‍यावर आहेत. त्यानिमित्ताने उबाठा गटाची नांदेड येथील शासकीय विश्रामगृहात बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र, राज्यभरात मराठा आंदोलकांनी (Maratha activists) आक्रमक भूमिका घेतली आहे. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत कोणतीही बैठक किंवा कार्यक्रम होऊ देणार नाही, अशी भूमिका मराठा आंदोलकांनी घेतली आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांबाबत मराठा आंदोलकांकडून रोष व्यक्त केला जात आहे. त्यातूनच आज उबाठाची बैठकही उधळून लावण्यात आली.


मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात सुरू असलेल्या आंदोलनाला राज्यभरात पाठिंबा मिळत आहे. दरम्यान, अनेक ठिकाणी गावबंदीचा निर्णय काही दिवसांसाठी शिथिल केला आहे. तरीही राजकीय कार्यक्रमांवरचा बहिष्कार कायम आहे. उद्धव ठाकरेंच्या नांदेड दौऱ्यासाठी आज शासकीय विश्रामगृह येथे दुपारी उबाठा गटाकडून बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठक सुरू असताना मराठा आंदोलन कार्यकर्त्यांनी मराठा आरक्षणाच्या घोषणा देत ही बैठक उधळून लावली. मराठ्यांचा रोष पाहून उबाठाच्या कार्यकर्त्यांनाही ताबडतोब कक्ष खाली करावा लागला.


मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभरात अजूनही ठिकठिकाणी आंदोलन सुरूच आहेत. नांदेड जिल्ह्यात देखील काही ठिकाणी साखळी उपोषण सुरु आहे. सोबतच, आज जालना येथील आंतरवाली सराटी येथे आयोजित करण्यात आलेल्या बैठकीला जिल्ह्यातील काही मराठा आंदोलक हजर राहणार आहेत. त्यामुळे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलक आक्रमक असल्याचे दिसत आहे. तर, आंतरवाली सराटी येथील आजच्या बैठकीनंतर जिल्ह्यातील पुढील आंदोलनाची दिशा ठरवली जाणार आहे.

Comments
Add Comment