Saturday, July 13, 2024
Homeसाप्ताहिककोलाजLove story : अनोखी प्रेमकहाणी ; तिची आणि त्याची...

Love story : अनोखी प्रेमकहाणी ; तिची आणि त्याची…

  • हलकं-फुलकं : राजश्री वटे

सरिता आणि सागर यांची प्रेमकहाणी… ‘ती’ नटखट, अवखळ, चंचल, नागमोडी अंगाची… तर तो खोल, धीरगंभीर… कधी शांत कधी रौद्र…

डोंगराच्या कुशीत जन्म घेऊन ‘ती’ नागमोडी वळणं घेत धावत येत असते सागराच्या मिठीत झोकून द्यायला…मिलन होते दोघांचे… पोर्णिमेच्या रात्री उधाण येतं त्याच्या प्रणयाला… चंद्रसुद्धा लाजतो, गहिवरतो, आनंदतो हा आगळावेगळा प्रणय सोहळा पाहून… ती… सरिता जीवन समर्पित करते सागराला… त्यातून लाट नावाचं कन्यारत्न जन्म घेतं… सागराच्या अंगाखांद्यावर खेळत ती मोठी होते, तारुण्यात येते…

आणि… तिची निराळी प्रेमकहाणी जन्म घेते! तिला ओढ लागते किनाऱ्याची… बापाच्या खांद्यावरून ती अवखळ, अल्लड नवतरुणी किनाऱ्याकडे झेपावते… त्याच्या प्रेमात पडते… पण हा धीरगंभीर बाप तिला आपल्या कह्यात ठेवू पाहातो! तरी कधी नजर चुकवून ती लाट भेटायचीच किनाऱ्याला… पुन्हा परतायची सागराच्या मजबूत खांद्यावर विसावायला!! किनाराही उतावीळ तिच्या स्पर्शासाठी!

कधी ती येते… नुसता स्पर्श करते, हळुवार मागे वळून पहात निघून जाते, तो थोडा भिजतो… ती पुन्हा येईल म्हणून वाट बघत राहातो! परतलेली ती पुन्हा अवखळ तरुणीसारखी झेपावते त्याच्या आगोशात… तो चिंब भिजतो आकंठ! ती मागे मागे सरत हसत हसत निघून जाते त्याच्याकडे मिश्कील कटाक्ष टाकत… कधी कधी तर अमावस्येला येतही नाही… तो आसुसून जातो… प्रणयाचा साक्षीदार चंद्रही कुठे लपतो कुणास ठाऊक त्या अमावस्येच्या रात्री! ती खूप दूर असते किनाऱ्यापासून… फक्त तिची गाज त्याच्या कानावर येत असते हळुवार! तो अनावर होत असतो तिला कवेत घ्यायला… पोर्णिमेला पूर्ण चंद्राच्या साक्षीने दोघांच्या प्रणयाला उधाण येतं…

असा हा दोघांच्या प्रणयाचा गोड किस्सा… अमावस्येला रुसतो… पोर्णिमेला बहरतो… प्रेमाचा लपंडाव खेळतो!!

सरिता सागराला समर्पित होते, पण ही लाट नावाची अवखळ प्रेमिका किनाऱ्याला झुलवत ठेवते…

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -