गुलदस्ता: मृणालिनी कुलकर्णी
प्रत्येक देशाची, शहराची, महिन्याची ओळख स्वतंत्र असते. डिसेंबर महिन्याचे वैशिष्ट्य वेगळे!
१२ महिन्यांतील डिसेंबर हा सर्वात शेवटचा महिना! डिसेंबरमध्ये नव्या वर्षाच्या चाहूलमुळे जगभर जल्लोषाचे वातावरण तयार होत असते. डिसेंबर महिन्यातील सुखद गारव्यामुळे लाभलेले शांत, थंड असे आल्हाददायक वातावरण सर्वांना मोहविते. सुट्ट्यांमुळे डिसेंबर हा प्रवासाचा महिना, अनेक राज्यांतील हिवाळी उत्सवामुळे डिसेंबर हा कलाविष्काराचा महिना, शाळा-कॉलेजमध्ये वार्षिक स्नेहसंमेलनाचा महिना! अंधार लवकर पडत असल्याने आणि येणाऱ्या ख्रिसमसमुळे सर्वत्र दिव्यांची रोषणाई मनातला तणाव दूर करीत फिरायला मन उल्हासित करते. म्हणून डिसेंबर महिन्याला ‘तणावमुक्त सुट्टीचा आनंदी महिना’ असे म्हणतात. डिसेंबर हे नाव ‘डेसम’ या लॅटिन शब्दावरून पडले.
प्रत्येक महिन्यातील प्रत्येक दिवसाचीही ओळख जगात जागरूकता पसरविण्यासाठी केली जाते. डिसेंबर महिन्यांत लक्षात ठेवण्यासारखे बरेच दिवस आहेत. त्यातील काही दिवसांची प्रासंगिकता समजून घ्या.
१. भारतीय नौदलांची कामगिरी आणि शहिदांचे स्मरण ४ डिसेंबर या नौदल
दिनी करतात.
२. वर्षातील सर्वात लहान दिवस २१ डिसेंबर. या दिवसापासून थंडी वाढू लागते.
३. जागतिक गणिती दिन : भारतीय गणिततज्ञ श्रीनिवास रामानुज
यांची जयंती.
४. ख्रिस्त बांधवांचा सर्वात मोठा सण
ख्रिसमस! भगवान येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस.
५. जुन्या वर्षाला निरोप देताना (३१ डिसेंबर) काय कमावले, काय गमावले याचे सिंहावलोकन करत, परमेश्वराचे आभार मानत, नव्या वर्षाची पूर्व संध्याकाळ कुटुंबीय किंवा मित्रांसोबत बाहेर जाऊन नव्या वर्षाच्या स्वागताचा आनंदोत्सव साजरा केला जातो.
शाळेत डिसेंबर महिन्यात अभ्यास नसल्याने मुलेही खूश असतात. अभ्यासेतर उपक्रमांत, शालेय/आंतर शालेय क्रीडा महोत्सव, सहल, एनएसएस/कार्यानुभवचे कॅम्प, विज्ञान प्रदर्शन, स्नेहसंमेलन यांत मुलांना वाव मिळतो. विद्यार्थी समृद्ध होतात. डिसेंबर महिन्यांतील राज्यस्तरीय एकांकिका, वक्तृत्व स्पर्धेतून उद्याचे रंगकर्मी, वक्ते घडत असतात. कॉलेज कॅम्पसमध्ये डिसेंबरच्या थंड वाऱ्यासोबत कॉलेज फेस्टचे वारे वाहू लागतात. कॉलेज फेस्टिव्हल ही त्या कॉलेजची ओळख ठरते. कॉलेज फेस्टिव्हल म्हणजे नुसती धमाल-मस्ती नसून सामाजिक बांधिलकी जपत, जबाबदारीची जाणीव ठेवत, बदलत्या काळानुसार नवे प्रश्न कल्पकतेने, दिवस-रात्र मेहनत करून विद्यार्थी सादर करतात. यातून युवक टीमवर्क, व्यवस्थापन, तडजोड करणे, एकमेकांना सांभाळून घेणे हे शिकताना त्याच्यातील आत्मविश्वास वाढतो. नव्या टॅलेंटचा शोध लागतो. कॉलेज फेस्टिव्हल्समध्ये अनेकजण आपला ठसा उमटवितात. त्यातून त्याच्या पुढच्या आयुष्याला कलाटणी मिळते. त्याचबरोबर बारावी, स्पर्धा परीक्षेच्या मुलांना त्या त्या वर्षीचा डिसेंबर हा अभ्यासासाठी उपयोगी पडतो.
डिसेंबरमधील जगभरात साजरा होणाऱ्या ख्रिसमस उत्सवात, लहान मुलांमध्ये मंजुळ घंटानाद करीत येणारा (जिंगल बेल…) सांताक्लॅाज आणि ख्रिसमस ट्रीला खूप महत्त्व आहे. ख्रिसमस ट्री, भेटवस्तू, केक, कंदिलांनी बाजार झगमगत असतो. ख्रिसमस उत्सवाचे साक्षीदार व्हायचे असेल, तर काही गोव्याला जातात. डिसेंबरच्या सुट्टीत अनेकजण सहलीचे आधीच नियोजन करतात. नवीन ठिकाणी नवी ऊर्जा व अनुभव मिळतो; परंतु खास डिसेंबर महिन्यात भारतातील अनेक राज्ये आपल्या राज्याची संस्कृती, परंपरा जपण्यासाठी, संवर्धनासाठी हिवाळी महोत्सवांचे आयोजन करतात. हिवाळी शिबीर हा कलाविष्काराचा महिना! त्यांत तेथील लोकांचे पारंपरिक संगीत, नृत्य, खाद्य आणि विशेष इतर कला सादर केल्या जातात. तेथे भेट द्या.
१. नागालँडमधील हार्नबील फेस्टिव्हल – नागालँडच्या स्थापना दिनी १ ते १० डिसेंबरमधील प्रदर्शनांत नागा कलाकारांची चित्रे, लाकूड कोरीव काम, शिल्पासह पारंपरिक लोकनृत्ये, फॅशन शो, धनुर्विद्या, देशी खेळ, कुस्त्या, संगीत मैफलसोबत खाद्य मेळे असा हा रात्रभर उत्सव
चालू असतो.
२. राजस्थानचे हिल स्टेशन माऊंट अबू, निसर्गसौंदर्याने वेढलेले! येथील आदिवासी लोकांचा वार्षिक महोत्सवातील ‘दीपदान’ हा विशेष सोहळा. विविध नृत्यप्रकार सोबत रोमांचकारी खेळ नि राजस्थानी खाणे.
३. मध्य प्रदेश (ग्वाल्हेर) येथील तानसेन संगीत महोत्सव; पुणे येथील सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव; चेन्नई जागतिक संगीत महोत्सव या तिन्ही ठिकाणी होणाऱ्या शास्त्रीय संगीत महोत्सवात ख्यातनाम संगीतकार, वाद्यवादकही एकत्र येतात.
४. दादरा-नगर हवेली येथील तारपा महोत्सव २१ ते २३ डिसेंबर संपूर्ण राज्यात मोठ्या उत्साहात साजरा करतात. वारली, कोळी, कोकणी जमातीतील लोक चांदण्या रात्री तारपा नावाच्या वाऱ्याच्या वाद्याच्या साथीने नाचतात. हे लोकनृत्य करताना स्त्री आणि पुरुष दोघेही गोलाकार वर्तुळात फिरतात. नृत्यातून एकतेचा, समन्वयाचा संदेश
दिला जातो.
५. केरळ राज्यातील महादेवाच्या मंदिरात ५ डिसेंबरपासून १२ दिवसांच्या वार्षिक वैकथाष्टमी उत्सवात कथकली नृत्य, संगीत मैफली, तमाशा असा समृद्ध सांस्कृतिक कार्यक्रम होतो.
६. आंध्र प्रदेशातील लुम्बिनी महोत्सवात डिसेंबरच्या दुसऱ्या शुक्रवारी तीन दिवस बौद्ध भिक्खू यात्रेकरूंचा मेळावा भरतो. यांत बुद्धाची शिकवण आणि संस्कृती अधोरेखित केली जाते.
७. कच्छचा रण उत्सव – पौर्णिमेच्या दिवशी पांढऱ्या वाळवंटातील निसर्गाचा चमत्कार. अर्ध भटक्या जमातीची
संस्कृती समजते.
८. कर्नाटकातील एअरबलून फेस्टिव्हल्स – या हॉट एअरबलूनमधून कर्नाटकातील वारसा स्थळांचे दर्शन घडत जंगलातून प्रवास करतो.
९. पणजी, गोवा येथील सेरेंडिपिटी आर्ट्स फेस्टिव्हल्स – भारतातील सर्वात मोठा बहुविद्याशाखीय कला महोत्सव! यात बोलण्यापासून संस्मरणीय परफॉर्मन्सचा (१५ डिसेंबर) भरपूर अनुभव दिला जातो.
१०. शांतिनिकेतन पौष मेळा – बंगाल राज्यातील पौष महिन्यातील सातव्या दिवशी होणारा वार्षिक आनंदोत्सवातील जत्रेत, सुगीच्या हंगामाचा आनंद घेणे हा महत्त्वाचा हेतू असतो.
११. रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपूरमध्ये, खासदार सांस्कृतिक सोहळ्यात, राष्ट्रीय आंतराष्ट्रीय कलाकारांसोबत विशेषत्वाने शालेय विद्यार्थ्यांचाही समावेश असतो. मनोरंजनातून मूल्याधिष्ठित संस्कार व्हावेत हे त्या सोहळ्याचे उद्दिष्ट.
देशाचा इतिहास, भूगोल, चालत आलेल्या कला-परंपरा, उत्सवांतून त्या देशाचे सांस्कृतिक सौंदर्य प्रतिबिंबित करतात. सणांचा सामान अर्थी शब्द उत्सव. प्रत्येक राज्य आपल्या उत्सवातून आपली संस्कृती जागविते. विविध शहरांत, देशांत फिरून या सांस्कृतिक सौंदर्याचा आस्वाद घ्या. फक्त सण नव्हे जीवन साजरे करायला शिका. हीच शिकवण डिसेंबर महिना देतो.
[email protected]