विशेष: रोहिणी काणे-वावीकर
आवडता साहित्य प्रकार कोणता? हा प्रश्न आला आणि उत्तर देण्याआधी हा काय प्रश्न झाला, असा विचार येऊन कपाळावर एक सूक्ष्म आठी आली. पण सांगताना मात्र जरासे हसू आले व म्हणावेसे वाटले, एखादी चित्तवेधक कादंबरी हातात आली की, ती वाचून पूर्ण केल्याशिवाय जीवाला चैन पडत नाही. एका बैठकीत पूर्ण करणे शक्यही नसते. पण विषय, पात्र, त्यांची पकड, कथानक, पार्श्वभूमी या गोष्टींनी मनाचा ताबा घेतलेला असतो. त्यामुळे पूर्ण केल्याशिवाय आपल्याला स्वस्थता लाभत नाही. मनावरही बरेच दिवस गारुड राहते. अर्थात हे कोणत्याही साहित्य प्रकाराबद्दल होतंच असते. पण इतर साहित्य प्रकार पटकन वाचून होतात. एखादा कथा, कविता, ललितलेख संग्रह यापैकी काहीही हातात आल्यावर एका बैठकीत संपूर्ण संग्रह वाचून पूर्ण करणे अशक्य असले तरी एका वेळेला एक संपूर्ण कथा, कविता, लेख नक्कीच वाचून पूर्ण करू शकतो. पुढे वाचण्याची उत्सुकता असली तरी पुस्तक बाजूला सारताना अपूर्णतेची पोकळी मनात निर्माण होत नाही.
सर्व साहित्य प्रकारांचा विचार करता आवडते साहित्य म्हणून कोणा एका साहित्य प्रकाराकडे बोट दाखवणे मला तरी शक्य नाही. कारण प्रत्येक साहित्य प्रकाराचे आपापले असे वैशिष्ट्य नक्कीच आहे. जे त्याच्या सौंदर्यात खात्रीने भर घालते. कादंबरी वाचायलाच काय तर लिहायलाही वेळ लागतोच. कारण त्यातील विषयाची व्याप्ती, पात्र संख्या, त्यांची गुण वैशिष्ट्ये, या साऱ्याचे यथार्थ वर्णन प्रत्येक व्यक्तिरेखेला पुरेसा न्याय देऊन करायचे असून सुयोग्य सांगताही लेखकाला करायची असते. पर्यायाने व्याप्ती वाढून कथानक कादंबरी बनण्याइतके मोठे होते. याउलट कथेत विषय आटोपशीरपणे आलेला असतो. यामुळे कथा पटकन निष्कर्षाप्रत येते. त्यातही लघुकथा, दीर्घकथा असे प्रकार आहेतच. अलक हा साहित्य प्रकार तर अवघ्या ५० शब्दांत मर्म सांगणारा आहे. असे प्रकार वैविध्य नुसत्या कथेत देखील आहेच.
ललित वाङ्मय प्रकारात ललित लेख, निबंध यांचा समावेश होतो. हे मुख्यत्वे अनुभवावर आधारित आहे. त्यातील अनुभवाच्या बोलांनी या साहित्य प्रकाराला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलेले आहे. कथा, कादंबरी वा कवितेप्रमाणे यात कल्पनाशक्तीच्या भराऱ्या नसतात, तर ते वास्तव दर्शनाने आणि लेखकाच्या अनुभव घेण्याच्या, ते व्यक्त करण्याच्या, वैचारिक सखोलतेच्या अलंकारांनी सिद्ध झालेले असतात.
लघुनिबंध हा साहित्य प्रकार मुख्यत्वे स्वातंत्र्यपूर्व काळात लोकमान्य टिळक, विष्णुशास्त्री चिपळूणकर यासारख्या तत्त्ववेत्त्यांनी अधिक समृद्ध केला. त्यातून तत्कालीन सामाजिक, राजकीय परिस्थितीचे दर्शन घडवले. पण त्याबरोबरच त्यांच्या निस्पृहतेचे दर्शन आपल्याला ओघाने घडत गेले. खरे तर लघुनिबंध कशावरही लिहिता येतो. ‘रुमाल’, ‘पहिला पांढरा केस’ हे सुद्धा अगदी सामान्य वाटणारे विषय लघुनिबंधाचे विषय झालेले मी पाहिले आहेत. त्यात लेखकांनी कधी विनोदी, तर कधी वैचारिक पातळीवर भावनिकतेने विषय हाताळलेले असतात. त्यामुळे लघुनिबंध हा वरकरणी सोपा वाटणारा साहित्य प्रकार लिहायला मात्र तितकासा सोपा नाही.
कविता या साहित्य प्रकाराचा मागोवा घ्यायचा झाल्यास त्याबद्दल असे म्हणता येईल की, उत्कट भावनेचा सौंदर्यपूर्ण अविष्कार म्हणजे कविता. कारण अगदी मोजक्याच पण अर्थपूर्ण, मार्मिक शब्दांत कवीने उभ्या केलेल्या शब्दचित्रांत काळजाचा ठाव घेतलेला असतो. या कवितादेखील अनेक प्रकार वैविध्यांनी नटलेल्या आहेत. जसे की मुक्तछंद, वृत्तबद्ध रचना, षडाक्षरी, अष्टाक्षरी, द्रोण काव्य, गझल, चारोळी, हायकू इ. गझल वेदनेला अधिक जवळ करते आणि तेही वृत्ताचे नियम सांभाळून. चारोळी म्हणजे फक्त चार ओळी. हायकू तर पाच, सात, पाच अशा अक्षरक्रमाने नेमका क्षण टिपणाऱ्या अवघ्या तीन ओळी. पण चारोळी, हायकूसारख्या लहानात लहान रचनेतूनही कसबी कवी मनात घर करतात. असाच आणखी एक साहित्य प्रकार म्हणजे चरित्र आणि आत्मचरित्र.
चरित्र लेखनात एखाद्या व्यक्तीच्या जन्मापासून अंतापर्यंतच्या संपूर्ण जीवन प्रवासाचे, घडलेल्या घडामोडींचे, जीवन संघर्षाचे आणि त्या त्या प्रत्येक वेळेची त्या व्यक्तीने कशी हाताळणी केली, कशी वर्तणूक ठेवली, कशी विचार सरणी अंगीकारली याचे साद्यन्त वर्णन तपशिलासह आलेले असते. थोर व्यक्तींची चरित्रे म्हणूनच सदैव मार्गदर्शक ठरत आलेली आहेत. त्यांची जीवन कहाणी नकळत जीवनविषयक तत्त्वज्ञान सांगून कितीतरी मौलिक संदेश सहजगत्या देऊन जात असल्याने चरित्र हा साहित्य प्रकारसुद्धा एक आगळे महत्त्व नक्कीच अधोरेखित करतो.
आत्मचरित्र म्हणजे स्वतःच्या आयुष्याचे तटस्थपणे केलेले सिंहावलोकन. आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यात स्वतःच्याच आयुष्याकडे स्वच्छ व शुद्ध दृष्टिकोन ठेऊन वळून पाहणे व कोणताही पूर्वग्रह न बाळगता घडलेल्या घटना, आलेले अनुभव यांचे प्रामाणिक वर्णन करणारे लेखन आत्मचरित्रात अभिप्रेत आहे. यात स्वतःच्या चुकांचीसुद्धा प्रांजळ कबुली दिली जाते किंवा तशी ती देणे, उदार दृष्टिकोन ठेवणे आत्मचरित्रात अपेक्षित आहे. सुरवातीच्या काळात लिहिली गेलेली आत्मचरित्रे तशी आढळतात देखील. तडखळकर यांचे आत्मचरित्र याचे उत्तम उदाहरण म्हणता येईल. नंतरच्या काळात अनेक आत्मचरित्रे आली. पण आपले वागणे कसे बरोबर होते व इतरांनी आपल्यावर वेळोवेळी केलेली टीका कशी चुकीची होती, याचेच वर्णन अधिक आढळत गेल्याने या व अशा आत्मचरित्रांबद्दल काहीशी नाराजी निर्माण झाली हे खरे. पण चरित्र व आत्मचरित्रातून तत्कालीन सामाजिक, राजकीय परिस्थितीचे, घडामोडींचे, जीवन व्यवहाराचे, चाली-रितींचे दर्शन घडते. मौलिक माहिती हाती येते. यात शंका नाही.
जसे जेवणाच्या ताटात प्रत्येक पदार्थाचे स्वतःचे असे एक स्थान व महत्त्व आहे. त्यात कोणालाच दुय्यमता नाही किंवा आपण आपल्याला कुठे जायचे आहे, जाण्याचे कारण काय आहे? ते विचारात घेऊन पेहरावाची निवड करतो. म्हणजेच त्या त्या वेळेला त्या त्या गोष्टींचे महत्त्व नक्कीच असते. त्यामुळे आपण सर्व प्रकारचे पेहराव जवळ बाळगतो व आवश्यकतेप्रमाणे परिधान करतो. तसेच आपल्याला काय सांगायचे आहे, ते विचारात घेऊन त्याच्या अभिव्यक्तीसाठी सुयोग्य अशा साहित्य प्रकाराची निवड लेखकांकडून केली जाते.
साहित्य प्रकार कोणताही असो पण व्यक्त होताना लेखकाने त्यात नक्कीच जीव ओतलेला असतो. म्हणूनच प्रत्येक लिखाण हे त्या लेखक, कवीचे एकेक अपत्य असते व लेखकाला ते सारखेच प्रियही असते. त्यामुळे आवडता साहित्य प्रकार कोणता हा प्रश्नच अप्रस्तुत वाटतो. दर्दी, अभिरुचीसंपन्न आणि व्यासंगी व्यक्ती साऱ्याच साहित्य प्रकारांचा आस्वाद घेतात व त्या त्या वेळेला त्यात रमतातसुद्धा. सारेच साहित्य प्रकार मिळून सुजाण, रसिक वाचकाला परिपूर्ण मेजवानी देणारे ठरतात, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.