Wednesday, March 26, 2025
Homeसाप्ताहिककोलाजBirds : जग पक्ष्यांचे...

Birds : जग पक्ष्यांचे…

  • विशेष : डॉ. श्वेता चिटणीस

सध्या भारतात विविध परदेशी पक्ष्यांचे आगमन झाले आहे. त्यांचे थवे मजेत गिरक्या घेत बागडताना, पाण्यात तरंगताना, जलक्रीडा करताना पाहणे म्हणजेच एक आनंददायी, डोळ्यांचे पारणे फेडणारा अनुभव आहे.

नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यात असंख्य पक्षी झाडांवर आणि तळे, जलाशय, खाड्या इत्यादी पाणथळ जागी दिसतात. हे पक्षी हजारो महिला अंतर पार करून आपल्याकडे येतात. पक्षी निरीक्षणासाठी गेले असताना सर्वात प्रथम नजरेस पडतात ते सीगल पक्षी. पांढरे आणि करड्या रंगाचे पंख असणारे हे पक्षी अगदी थोड्या वेळाने समुद्रकिनाऱ्यावर किंवा खाडीच्या किनाऱ्यावर उडताना दिसतात. सीगल पक्ष्यांमध्ये ब्राऊन हेडेड गल, ब्लॅक हेडेड गल, युग्लीन्स गल आणि इतर प्रजातींचे सीगल दिसतात. हे पक्षी पार अफगाणिस्तान, इराण इत्यादी देशांतून आलेले असतात.

‘एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ’ असे म्हणत हे पक्षी मायदेशात हिवाळा वाढू लागताच, उष्ण हवेच्या ठिकाणी पलायन करतात. भारतात असणारी उष्ण हवा त्यांना मानवते. त्यांना मुबलक खाद्य मिळतं. पक्षी निरक्षणास गेल्यावर गोल-गोल गिरक्या घेत उडणारे सीगल दिसतात. हे पक्षी स्वजातीच्या थव्यात राहतात. पाण्यातील बेडूक, इतर छोटे प्राणी, मासे इत्यादी अन्न फस्त करतात. तसेच लोक त्यांना पाहून लोक वेफर्स, गाठ्या, फरसाण इत्यादी खाद्य वस्तू टाकतात, त्यात ते उडता-उडता गट्टम करतात. तसेच कचऱ्याचे डोंगर व त्यावरील किडे, कचरा हे सुद्धा खातात. हे सर्व प्रकर्षाने टाळावे. कारण या खाण्याचे त्यांना शारीरिक त्रास होतात. त्यांची शरीरे कमकुवत होतात. ते जास्त किलोमीटर दूर उडू शकत नाहीत. कमकुवत पक्ष्यांची अंडी कमकुवत होतात, त्यांची पुढील पिढी रोगाचा प्रतिकार करू शकत नाही. अनेक वेळा त्यांना व्हायरल किंवा जंतुसंसर्ग होतो व त्यामुळे या पक्ष्यांची संख्या रोडावते. या पक्ष्यांची तुलना आपण एखाद्या मॅरेथॉनमध्ये धावणाऱ्या खेळाडूसोबत करू शकतो इतकं बळ या स्थलांतर करणाऱ्या पक्ष्यांच्या पंखात असते. धावपटूंनी कधी वेफर, फरसाण खाऊन धावण्याच्या शर्यतीत भाग घेतला, असे होत नाही. कारण ते नेहमी पौष्टिक अन्न, डॉक्टर व डाएटिशियनच्या सल्ल्याने घेत असतात. तसेच पाण्यातील मासे व इतर प्राण्यांच्या खाण्यातून या पक्ष्यांना भरपूर प्रथिने मिळतात, जेणेकरून ते पुन्हा आपल्या मायदेशी परततात. पक्ष्यांना अन्न भरण्याच्या मोहात न पडलेले बरे.

त्यानंतर दिसतात ते छोटे, चिमणीपेक्षा लहान पक्षी. या पक्ष्यांची मंजुळ किणकिण, झुप्पकन उडून लांब जाणारे थवे, पाहणे खूप छान वाटते. या पक्ष्यांमध्ये मोठे जलचर ज्यात प्रामुख्याने sandpiper, godwit, spoonbill, ibis, heron आणि इतर प्रजातींचे अनेक जलपक्षी दिसतात. पाणकावळे, पाणकोंबडी, टिटवी असे हे सारे रम्य पक्षीविश्व आपल्यासमोर नाट्यमय स्वरूप घेते. यात ससाणे, ब्राह्मणी घार व इतर घारी, osprey असे दुर्मीळ पक्षी आपले भक्ष्य शोधत येतात आणि आपल्या कॅमेऱ्यात अलगद बंदिस्त होतात. पाणकावळे आणि बगळे यांच्यामध्ये मासा पकडण्यासाठी लागणारी शर्यत पाणकावळ्यांची पाण्याखाली बुडी मारून माशावर ताव मारण्याची पद्धत, चला की नाही निर्जीव दगडासमान होऊन भक्ष्याजवळ येतात. त्याला पकडण्याची हेरॉन पक्ष्यांची पद्धत. पाण्याखालचा मासा अचूक हेरून पाण्यात बुडी मारून मासा पकडून झाडावर जाऊन खाणारा किंगफिशर.

सर्वात सुंदर म्हणजे flamingo अर्थात रोहित पक्षी! या पक्ष्यांचे हजारोंच्या संख्येने जलाशयावर येणे, उडताना त्यांचे लालभडक पंख ज्वाला असावी तसे फडकणे व हे सर्व त्यांच्या सान्निध्यात राहून पाहणे म्हणजेच एक निसर्गाचे वेगळेच रूप अनुभवणे आहे. खारट पाण्यात हे पक्षी आपले खाद्य शोधतात. या थव्यामध्ये छोटा रोहित आणि मोठा रोहित असे दोन प्रजातींचे पक्षी दिसतात. या पाणथळ जागा महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आहेत व तिथे हे पक्षी पाहायला मिळतात. उरण, नवी मुंबईत वाशी इथल्या सीवूड्स, मुंबईत शिवडी, महुल खाडी, भांडुप पम्पिंग स्टेशन, ऐरोली इत्यादी ठिकाणी हे परदेशी पाहुणे मुक्तविहार करताना दिसतात. भांडुप पम्पिंग स्टेशनचे वैशिष्ट्य असे आहे की, तिथे गेल्यावर, आपल्याला गाणारे पक्षी, झाडांवर राहणारे पक्षी, तिवरांवर दिसणारे पक्षी आणि जलपक्षी असे एकाच ठिकाणी पाहता येतात. इथले पाणथळ भाग म्हणजे ठाणे खाडीचे दुसरे टोक असल्यामुळे इथले पाण्याचे प्रवाह संथ आहेत. त्यामुळे इथे परदेश व स्थानिक बदकं पाहता येतात. त्यात लेसर whistling duck, हळदीकुंकू बदकं, अडई, अशी अनेक प्रजातींची बदकी उन्हाळी सुट्टी मजेत घालवताना दिसतात.

आजूबाजूच्या वृक्षांवर राहणारे पक्षी त्यांची किलबिल त्यांनी एकमेकांना हाकारणे आणि त्यांची बडबड गीत यांनी परिसर इतका दुमदुमून जातो की, आपण मुंबईत आहोत हे एक क्षणभर विसरायलाच होतं. असे जलपक्षी आपल्याला भर मुंबईत अंधेरी पश्चिम इथल्या लोखंडवाला तलावाच्या परिसरात सुद्धा दिसतात. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, महाराष्ट्र नेचर पार्क आणि इतर उद्यानात सुद्धा आपल्याला झाडांवरून वेगवेगळ्या पक्ष्यांचे आवाज ऐकू येतात आणि बऱ्याच वेळा छान पक्षी बघायलासुद्धा मिळतात.

सुंदर गाणी गाणारे फक्त कोकीळ असतात असे नव्हे. इतर अनेक स्थानिक आणि परदेशी पक्षी गोड गळ्याने ताना घेताना ऐकावं आणि दिवसभराचे ताणतणाव विसरावे, असं हे सुंदर पक्षीविश्व आहे. दिवसभराच्या ताणतणावाने आपण त्रासून जातो, ज्यामुळे चिडचिड, आजारपण असे अनेक प्रश्न मागे लावून घेतो; परंतु भर प्रदूषणात, विकास प्रकल्पांमुळे झालेल्या दूषित हवामानामध्ये सुद्धा निसर्ग आपल्याला भरभरून देतोच आहे. सद्यपरिस्थितीत नैसर्गिक जंगलावर काँक्रीटचे जंगल आक्रमण करत आहे. पक्ष्यांची घरटी उद्ध्वस्त होत आहेत. पक्षी निसर्गचक्राचा महत्त्वाचा भाग आहेत. अनेक प्रकारचे कीटक, गाळ, कचरा खाऊन ते परिसर स्वच्छ ठेवतात आणि झाड वाढवण्यासाठी परागीकरणात हातभार सुद्धा लावतात. फळ खाऊन त्यांच्या बिया विविध ठिकाणी विखुरतात. जेणेकरून त्यातून नवीन झाडं येतात. या पक्ष्यांवर इतर मोठे पक्षी व प्राणी यांचे जीवन अवलंबून असतं. अशा प्रकारे निसर्गाचा समतोल हे पक्षी सांभाळतात. त्यामुळे पक्ष्यांना आपली गरज नसून आपल्याला मात्र त्यांची नितांत गरज आहे. पृथ्वीतलावरून पक्षी जर नष्ट झाले, तर माणसाचे आयुष्य धोक्यात येईल. निदान त्यासाठी तरी तिवरांची जंगलं पक्ष्यांचे अधिवास आणि त्यातील जैवविविधता जपण्याची आवश्यकता आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -