रवींद्र तांबे
कोकणामध्ये शेती व्यवसायाप्रमाणे मासेमारी हा सुद्धा महत्त्वाचा व्यवसाय आहे. मासेमारी हा कोकणातील किनारपट्टीवरील लोकांचा प्रमुख व्यवसाय मानला जातो. कोकणपट्टीचा विचार करता ७२० किलोमीटर लांबीचा नैसर्गिक विनामूल्य समुद्रकिनारा कोकणाला लाभला आहे. अरबी समुद्रामुळे कोकणात मासेमारी व्यवसायाचा मोठ्या प्रमाणात विकास झाला आहे. त्यामुळे मत्स्य विद्यापीठ कोकणामध्ये स्थापन करायला हवे, याबाबतचा अहवाल महाराष्ट्र सरकारला सादर केल्यानंतर बारा वर्षांनी म्हणजे सोमवार दिनांक ११ डिसेंबर, २०२३ रोजी मुंबई पत्रकार संघामध्ये दुपारी ३ वाजता भारताच्या नियोजन आयोगाचे माजी सदस्य व ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी पत्रकार परिषद घेतली. मत्स्य विद्यापीठ कोकणात व्हावे, यासाठी त्यांची ही दुसरी पत्रकार परिषद होती. त्याआधी डॉ. मुणगेकर यांनी ९ मे, २०१९ रोजी मुंबई प्रेस क्लब येथे जाहीर पत्रकार परिषद घेऊन मत्स्य आणि सागरी विज्ञान विद्यापीठ हे रत्नागिरी येथे झाले पाहिजे, अशी मागणी केली होती. त्यासाठी कोकण विभागातील लोकप्रतिनिधींनी एकत्रितपणे आवाज उठविण्याचे त्यांनी आवाहन केले होते. तसेच, कोकणातील जनतेनेही जागृत रहावे, असा वडीलकीचा सल्लाही त्यांनी दिला होता.
आता तर १२ वर्षे होऊन सुद्धा डॉ. मुणगेकर समितीने मत्स्य विद्यापीठ कोकणात व्हावे, यासाठी सादर केलेल्या अहवालावर कोणत्याही प्रकारची कारवाई झालेली नाही. तेव्हा महाराष्ट्र सरकारला दिलेला अहवाल हिवाळी अधिवेशनात मंजूर करून त्याची त्वरित अंमलबजावणी करावी, अशी कोकणातील जनतेच्यावतीने पत्रकार परिषद घेऊन डॉ. मुणगेकर यांनी मागणी केली आहे.
कोकण विभागातील रत्नागिरी जिल्ह्यात मत्स्य विद्यापीठ व्हावे अशी गेली अनेक वर्षापासून कोकणच्या जनतेची मागणी होती. या मागणीच्या अानुषंगाने कोकणचे सुपुत्र व मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. भालचंद्र मुणगेकर भारताच्या नियोजन आयोगाचे सदस्य असताना २६ मे, २००८ रोजी महाराष्ट्र सरकारने डॉ. मुणगेकर यांच्या अध्यक्षतेखाली मत्स्य व समृद्धी संशोधन अभ्यास गटाची स्थापना केली. डॉ. मुणगेकर यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीने प्रत्यक्षात पाहणी व अभ्यास करून १ फेब्रुवारी, २०११ रोजी महाराष्ट्र सरकारकडे आपला अहवाल सुपूर्द केला. त्यामध्ये मत्स्य हे विद्यापीठ रत्नागिरी येथेच स्थापन करावे, महाराष्ट्र मत्स्य आणि सागरी विज्ञान विद्यापीठ असे त्याचे नामकरण करावे, अशा अनेक शिफारसी या समितीने केल्या होत्या.
मत्स्य विद्यापीठ स्थापन करायचे झाले तर मत्स्य व्यवसाय आलाच. मत्स्य व्यवसाय आला म्हणजे समुद्र आला, अशी ही साखळी असते. तेव्हा मासे कोकणात आणि मत्स्य विद्यापीठ नागपूरला असे बोलायला डॉ. मुणगेकर विसरत नाहीत. ते सुद्धा महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर. तेव्हा कोकणात जागतिक दर्जाचे मत्स्य विद्यापीठ स्थापन व्हायला हवे.
आता मत्स्य विद्यापीठ रत्नागिरीत का? यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील मासेमारी व्यवसायाची सरकारला जाणीव होण्यासाठी विविध अहवालांच्या सहाय्याने माहिती घेऊ. फिशरी इंडस्ट्रीज इन इंडिया, महाराष्ट्र राज्यातील व कोकण विभागातील सर्वात महत्त्वाचे समुद्री जिल्ह्यांपैकी एक रत्नागिरी जिल्हा आहे. रत्नागिरीचा मासेमारी उद्योग समुद्री उद्योगावर अवलंब आहे. त्यामुळे सामाजिक व आर्थिक दृष्टिकोनातून जिल्ह्याला मानले जाते. मत्स्य व्यवसायाचा विचार केला, तर आजही पारंपरिक पद्धतीने प्रकिया केली जाते. याचा अर्थ असा की, या क्षेत्रात पायाभूत सुविधांची कमतरता आहे. या व्यवसायाच्या मागासलेपणाचे कारण म्हणजे या क्षेत्रात मच्छीमारांना शिक्षणाचा अभाव दिसून येतो. जरी मच्छीमारांमध्ये मत्स्य व्यवसायाचा अभाव दिसून येत असला तरी या जिल्ह्याचे वार्षिक अंदाजानुसार माशांचे उत्पादन वीस हजार टन इतके आहे. रत्नागिरीमध्ये गिल नेट्स, लांब ओळी, सीन नेट्स, बॅग जाळे व कास्ट जाळे अशी किनारपट्टी पृष्ठभागावर वापरली जाणारी जाळी आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यात मच्छीमारांची लोकसंख्या सुमारे सत्तर हजारांपेक्षा जास्त आहे. हे जाळे पश्चिमेकडील किनारपट्टीवर ११८ खेड्यांमध्ये पसरले असून ४६ बंदरे आहेत. मासेमारांमध्ये कोळी, खरवी, भोई, गाबिट, मुस्लीम व ख्रिश्चन या समाजातील लोकांचा समावेश आहे. मासेमारी मुलांच्या शैक्षणिक सुविधा पुरविण्याच्या दृष्टीने मत्स्यव्यवसाय विभागाने रत्नागिरी सकिनाता येथे मत्स्यव्यवसाय शाळा स्थापन केली आहे. कॅश डिस्पोजल फिश शील संग्रहालयाच्या संरक्षणाच्या सोयी आहेत. मासे खारट मिठाचे टिकून राहतात. तेव्हा वेगवेगळ्या २१ प्रकारच्या माशांची सोय होईल, अशी व्यवस्था केली आहे. काही ठिकाणी खासगी शीतगृह आहेत. त्यामुळे वर्षभर मासे उपलब्ध होतात. यामुळे दरवर्षी पाच हजार टन मासे सुरक्षित राहतात.
लांजा, संगमेश्वर व चिपळूण येथे मासे बाजार विकसित झाले आहेत. मासे व्यापारीदेखील जिल्ह्याबाहेर वाहतूक करतात. सुमारे १७३१ टन माशांची वाहतूक केली जाते. काही मासे निर्यातदारांना रत्नागिरी येथे कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवून ते युरोपियन देशांना निर्यात करतात. ओले सॉल्डेड फिश कॅचचा भाग चेन्नईला घरगुतीसाठीदेखील पाठविला जातो. तसेच लंका व अन्य देशांमध्ये निर्यात केली जाते. दाभोळ, बाणकोट व विजयदुर्ग या ठिकाणी असलेल्या केंद्रात कोरडे मासे गोळा केले जातात. हे मासे कोल्हापूर, बेळगाव व कुलाबा आदी ठिकाणी पाठविण्यात येतात. तसेच मुंबई, ठाणे, पुणे या शहरात ‘मालवणी महोत्सव’ साजरे करतात. या उत्सवात विविध प्रकारचे सुके मासे विक्रीला ठेवले जातात. त्याला मागणीपण बऱ्यापैकी असते. रत्नागिरी जिल्ह्यात १२ मच्छीमार सहकारी संस्था आहेत.
आज देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये मत्स्यव्यवसाय क्षेत्र महत्त्वाची भूमिका बजावत आहे. सामाजिक, आर्थिक सुधारणांसाठी समर्थन मासेमारी समुदायांची परिस्थिती लकह्षात घेता मोठ्या संख्येने रोजगार पुरवला जातो. फिशर सेक्टरच्या अंदाजानुसार समुद्रकिनारा असणाऱ्या (तटीय) सुमारे ३६०० गावांमध्ये मच्छीमार राहतात. मागील पन्नास वर्षांत मासे उत्पादनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. १९५० मध्ये याचे प्रमाण ०१७५ दशलक्ष टन होते. २०१३ मध्ये ९१५८ दशलक्ष टन झाले, तर २०२१ मध्ये ६५३७४ दशलक्ष टन सागरी मत्स्योपादन झाले आहे. देशात तटीय क्षेत्र, हिल क्षेत्र व मध्य क्षेत्र अशा तीन विभागांत मासेमारी केली जाते. यात रत्नागिरी जिल्हा अग्रेसर आहे. त्यामुळे कोकणात रत्नागिरीतच मत्स्य विद्यापीठ व्हायला हवे, अशी माजी खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी केली केलेली मागणी केवळ कोकणच्या नव्हे, तर देशाच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाची आहे.