Monday, July 22, 2024
Homeसाप्ताहिकरिलॅक्सGold Smuggling : कुंपणच शेत खातं...

Gold Smuggling : कुंपणच शेत खातं…

  • गोलमाल : महेश पांचाळ

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमाशुल्क विभागाने एक मोठी कारवाई केली. पण यावेळी सोने तस्करांवर पाळत ठेवताना त्यांना मदत करणाऱ्यांत विमानतळ कर्मचारी यात गुंतल्याचे त्यांच्या लक्षात आले आणि त्याला ताब्यात घेतले. आरोपी अक्षय कुळे असे त्याचे नाव आहे. तो विरारमधील मनवेलपाडा येथील रहिवासी आहे. दोन दिवसांपूर्वी त्याच्याकडून सोन्याच्या ३३ लगड जप्त करण्यात आल्या आहेत. त्याचे वजन सुमारे पावणेचार किलो असून या सोन्याची किंमत तब्बल सव्वादोन कोटी रुपये इतकी असल्याची माहिती पुढे आली आहे. त्याने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्याला अटक झाली. त्यानंतर त्याची कसून चौकशी करण्यात आली असता, अक्षय कुळे याने गेल्या १५ दिवसांमध्ये किमान १० वेळा अशा पद्धतीने सोन्याच्या तस्करीप्रकरणात संशयित आरोपींना मदत केल्याची कबुली दिली. कुंपणच कसे शेत खातं, याचे उदाहरण यानिमित्ताने समोर आले.

मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोन्याच्या तस्करीचे अनेक प्रकार नवीन नाहीत; परंतु यातील आरोपींवर कारवाई करण्याचे काम गेल्या अनेक काही महिन्यांत सीमाशुल्क विभागाकडून होताना मोठ्या प्रमाणावर दिसत आहे. त्या तस्करांना मदत करणाऱ्या अक्षयला पकडल्यानंतर घरचे भेदी आणखी कितीजण आहेत, याचाही शोध घेतला जात आहे. विमानतळ परिसरात त्याची ड्युटी सोडून अक्षय हा वारंवार ये-जा करत असायचा. त्यामुळे त्याच्यावर असलेल्या संशयाच्या आधारे सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली. त्याला ताब्यात घेतले, त्यावेळी त्याच्याकडे काळ्या रंगाच्या पाकिटामध्ये काही वस्तू सापडल्या. ती पाकिटे उघडून सखोल तपासणी केली असता त्यात दोन मोबाइल कव्हर्स होती आणि त्या दोन्ही कव्हर्समध्ये अनुक्रमे १७ आणि १६ असे पिवळ्या रंगाचे धातू सापडले. त्यांची तपासणी करण्यात आली असता, ते सोने असल्याचे निष्पन्न झाले. आरोपी कुळे याच्याकडे सोन्याच्या एकूण ३३ लगड सापडल्या असून त्याचे वजन ३ हजार ८४५ ग्रॅम आहे. जप्त केलेल्या सोन्याची किंमत सुमारे २ कोटी १४ लाख रुपये इतकी आहे.

याप्रकरणी सीमाशुल्क कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून अक्षयला अटक करण्यात आली. या प्रकरणामध्ये अन्य कर्मचाऱ्यांचाही सहभाग आहे का? याबाबत सीमाशुल्क विभाग तपास करीत आहे. तसेच आरोपी विमानतळावर कोणकोणत्या विभागात कार्यरत होता, याबाबतची माहिती घेण्यात येत असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर गेल्या वर्षभरात महिन्यांत ८० कोटी रुपयांची जप्ती करण्यात आली आहे. त्यामध्ये सोने, परकीय चलन व अमली पदार्थांचा समावेश आहे. विमानतळावरील सीमाशुल्क विभागाच्या विशेष युनिटने ही कारवाई केली. याअंतर्गत सर्वात अलीकडील कारवाईत बेकायदा बाळगलेले परकीय चलन अमेरिकन अनिवासी भारतीयाकडून जप्त करण्यात आले. गुप्त माहितीच्या आधारे विमानतळावरच तपासणी केली असता, या नागरिकाच्या बॅगेत १० लाखांचे परकीय चलन आढळले. भारतीय रुपयांत त्याची किंमत ८.३६ कोटी रुपये इतकी होते. आता अक्षयच्या तपासात त्याने आतापर्यंत कोणत्या सोने तस्करांना मदत केली? याची नावे पुढे येतील. या तस्करीच्या आडून अक्षयने किती माया गोळी केली, याची माहितीही लवकरच समोर येईल.

maheshom108@ gmail.com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -