Monday, July 22, 2024
Homeसाप्ताहिकरिलॅक्सGoa Trip : चला गोव्याच्या भूमीत...

Goa Trip : चला गोव्याच्या भूमीत…

  • मनातले कवडसे : रूपाली हिर्लेकर

थंडीची चाहूल लागताच सर्वत्र वेध लागतात ते बाहेर फिरायला जाण्याचे. आजकाल तर थंडी सुरू होण्याअगोदरच सुट्टीची चाहूल लागून पिकनिकचे प्लॅन केले जातात. आम्हीही ‘मुसाफिर हूं यारो’ म्हणत दिवाळीत गोव्याला जाण्याचा बेत आखला. खरं तर आखला वगैरे असं म्हणता येणार नाही, कारण अगदी ऐन वेळी आमचं गोव्याला जाण्याचं ठरलं होतं. त्यामुळे ट्रेनची बुकिंग शिल्लक नव्हती. मग नाईलाजाने विमानाची तिकिटं बुक केली आणि अक्षरशः हवेत तरंगत तरंगतच आम्ही गोव्याला पोहोचलो. पूर्वी एकदा गोवा ट्रिप केलेली होती. पण ती उत्तर गोव्यापुरती असल्याने या खेपेला दक्षिण गोवा हे आमचं लक्ष्य आणि आकर्षण होतं. विमानाचा प्रवास असल्याने प्रवासाचा तसा थकवा जाणवला नाही. पण रात्र असल्यामुळे लवकरात लवकर हॉटेल गाठणं गरजेचं होतं.

दुसऱ्या दिवशीचा कार्यक्रम मॅनेजरला सांगून आम्ही बेडवर ताणून दिली ते थेट सकाळी पॉम पॉम या आवाजाने एकदम जाग आली. अरेच्चा, आपल्याकडचा इडलीवाला इकडे कसा काय आला? असा मला प्रश्न पडला. पण हा ‘पोय’ म्हणजे पाव विकणारा माणूस असल्याचं कळलं. आपल्याकडच्या इडलीवाल्याप्रमाणेच तो सायकलचा हाॅर्न वाजवून लक्ष वेधून घेत होता. गोव्याच्या चिकन ग्रेव्हीसोबत आणि सकाळच्या चहासोबत खाल्ला जाणारा हा पाव म्हणजेच पोय ही सकाळी सकाळी आमच्या ज्ञानात भर पडली. थोड्याच वेळात आम्ही पटापट तयार होऊन बाहेर पडलो.

आमच्या हॉटेलच्या जवळच एक छोटेखानी रेस्टाॅरन्ट दिसलं. गोव्याचा निसर्गच जणू त्या हॉटेलच्या प्रवेशद्वारावर विसावला होता. हिरवी झाडं, रंगीबेरंगी फुलं यांनी आमचं स्वागत केलं. पारंपरिक पद्धतीने, कलात्मकरीत्या प्रत्येक वस्तूची सजावट केलेली दिसत होती. प्रवेशद्वार शंखशिंपल्यांनी सजवलेलं होतं. आतल्या अनेक जुन्या-पुरान्या वस्तूंवरून आमची नजर हटतच नव्हती. डायलवाला जुना फोन, फुलदाणी, जुन्या तसबिरी, ट्रांजिस्टर, ग्रामोफोन, टोपली, सूप अशा अनेक वस्तू सुंदर रित्या मांडून ठेवल्या होत्या. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तिथला ॲन्ड्रे अदबीने सर्वांशी बोलत होता, प्रत्येकाची दखल घेत होता. आम्ही तिथलं प्रसिद्ध व्हेज सँडविच व टोस्ट ऑम्लेट ऑर्डर केलं. गोवन संगीत ऐकत आम्ही ब्रेकफास्ट उरकला आणि गोवा सफरीला सज्ज झालो.

गोव्यात बाईक व स्कूटीज भाड्याने सहज मिळतात. आम्ही स्कूटी भाड्याने घेऊन गोव्यातल्या पोर्तुगीज आळी इथे रवाना झालो. तेथील निळ्या, पिवळ्या, लाल, गुलाबी अशा गडद रंगांच्या इमारती पाहताना मन हरखून जातं. त्यानंतर आम्ही गोव्याचं पारंपरिक म्युझियम बघितलं. थोडंफार शॉपिंग करून पुन्हा हाॅटेलला परतलो.

दुसऱ्या दिवशी अगोडा फोर्ट व माझोर्डा बीचला भेट दिली. इतका सुंदर सागरकिनारा असू शकतो, याची आपण कल्पनाही करू शकत नाही. दक्षिण गोव्यातील सर्वच बीचेस सुंदर आहेत. काही वेळ समुद्रात डुंबण्याचा आनंद लुटून आम्ही पुढे निघालो. शांतादुर्गा देवी व हनुमानाचं मंदिर पाहिलं. दोन्ही मंदिरातील शांतता, भव्यता आणि पावित्र्य आपल्याला प्रसन्न करून टाकतं. कोकणातील आमची ग्रामदेवता भगवती मातेचे एक मंदिर गोव्यातही दिसलं याचा मला मनोमन आनंद झाला. देव दर्शनानंतर आम्ही लाइट हाऊसला गेलो.

दुसऱ्या दिवशीचं आमचं शेवटचं प्रेक्षणीय स्थळ होतं लोटिलोम गावातील बिग फूट म्युझियम. तेथील प्रत्येक दालन, प्रत्येक गोष्ट ही पारंपरिक कलेची व गोव्यातल्या संस्कृतीचं दर्शन घडवत होती. पारंपरिक स्थानिक व्यवसाय, पारंपरिक चालिरीती यांच्या प्रतिकृती तिथे पाहायला मिळाल्या. एकाच दगडात कोरलेलं संत मीराबाई यांचं शिल्प तसंच बिग फुट ही या म्युझियमची खास वैशिष्ट्ये म्हणता येतील.

बघता-बघता आमचा गोव्यातला मुक्काम अंतिम टप्प्यावर येऊन ठेपला. शेवटच्या दिवशी Palolem बीच ते बटरफ्लाय बीचपर्यंतचा प्रवास कायमचा लक्षात राहण्यासारखा ठरला. बोटीतून प्रवास करत वेगवेगळे बीचेस आणि भला मोठा रॉक टॉरटॉइस पाहाणं, बटरफ्लाय बीचवरील मनसोक्त भटकंती आणि गोव्यातील स्वर्ग मानल्या गेलेल्या कबदे राम या सुंदर बीचवर घालवलेला वेळ हे सारं आठवणींच्या कुपीत कायमचं साठवून ठेवण्यासारखं वाटलं.

परतीच्या प्रवासात विमानातून खाली पाहताना गोव्याचा अथांग समुद्र जणू आपल्या असंख्य लाटांचे हात हलवत ‘पुन्हा या’ असं सांगत आम्हाला निरोप देतोय असं वाटत होतं. एकूणच गोवा म्हणजे निसर्ग सौंदर्याचं भरभरून वरदान लाभलेला प्रदेश. इथलं पोर्तुगीज आणि गोवन संस्कृतीचं मिश्रण, एकीकडे मौजमजेसाठी येणारे बिनधास्त रंगील्या पर्यटकांचे तांडे, तर दुसरीकडे चर्चेस व मंदिरातील धीरगंभीर नीरव शांतता अनुभवण्यासाठी येणारे लोक, इथली हाॅटेल्स आणि रेस्टाॅरंट्स, गोवन फिश करी, गोव्यातील नाईट लाइफ, इथले उत्सव, परंपरा, टुमदार घरं, गुळगुळीत रस्ते, बाईक राईड… हे सारं म्हणजे गोवा की या पलीकडेही आपल्याला भेटीसाठी कायम खुणावणारा असा काही गोवा आहे? या प्रश्नाचा स्वतःच्या मनाशी विचार करत असताना मला कविवर्य बा. भ. बोरकरांच्या कवितेतल्या ओळी आठवत होत्या :
माझ्या गोव्याच्या भूमीत
येते चांदणे माहेरा
ओलावल्या लोचनांनी भेटे आभाळ सागरा!

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. खूप छान , मी पण अगदी ह्या आठवड्या च्या शेवटला प्लॅन करत आहे , वाचून खूप छान वाटलं ! अगदी आताच जाऊन आल्यागत झालं .

Comments are closed.

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -