Monday, July 8, 2024
Homeसाप्ताहिकरिलॅक्सArtist : हरहुन्नरी कलाकार

Artist : हरहुन्नरी कलाकार

  • टर्निंग पॉइंट : युवराज अवसरमल

कलाकार हे स्वप्नांच्या दुनियेत रमलेले असतात, आज नाहीतर उद्या आपल्या कलेला नावलौकिक प्राप्त होईल, अशी आशा मनात बाळगून असतात. वास्तविक दुनियेत सरस्वती व लक्ष्मी सगळ्यांवर प्रसन्न होईल, याची काही खात्री देता येत नाही. तरीदेखील ते आपलं मोठं कलाकार होण्याचं स्वप्न पूर्ण करण्याच्या दृष्टीने पावलं टाकतच असतात. त्यांचा हा संघर्ष पाहून सामान्य नागरिक चकित होतात; परंतु तो कलाकार काही थकत नाही. त्याचा प्रयत्न सुरूच असतो. असाच एक कलाकार आहे जो लेखक, अभिनेता, दिग्दर्शक आहे, त्या कलाकाराचे नाव आहे राम माळी.

राम माळीचे शालेय शिक्षण सांगलीत झाले. महाविद्यालयीन शिक्षण पुण्यात झालं. नोकरी करत करत त्याने महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केलं. नोकरी करता करता त्याने अभिनयासाठी प्रयत्न केला. तो त्याच्या जीवनातला टर्निंग पॉइंट ठरला. अशोक झवेरी दिग्दर्शित एका एकांकिकेमध्ये त्याने पोस्ट मास्तराची संवाद नसलेली भूमिका साकारली होती. त्याच्या तालमीसाठी तो पिंपरी-चिंचवडहून पुण्याला नियमितपणे जात असे, ही बाब दिग्दर्शकाने लक्षात ठेवली होती. त्यानंतर जवळपास वीसेक एकांकिका त्याने केल्या. पुण्यातील भरत नाट्यमंदिर वासुमती विजापुरे एकपात्री स्पर्धा दरवर्षी आयोजित करीत असत. त्यामध्ये तो दरवर्षी भाग घ्यायचा.

‘तीन चोक तेरा’ हे पहिले व्यावसायिक नाटक त्याला मिळाले. त्याचे दिगंबर गुंजाळ हे दिग्दर्शक होते. त्यामध्ये सुनील गोडबोले हे विनोदवीर होते. त्या नाटकाच्या काही प्रयोगांमध्ये त्याने नायकाची भूमिका साकारली, तर काही प्रयोगामध्ये नायिकेच्या भावाची भूमिका साकारली होती. सुप्रसिद्ध अभिनेते सतीश तारे यांचं ‘टुरटुर’ हे नाटक तेव्हा सुरू होते. त्याच्या जवळजवळ प्रत्येक प्रयोगाला त्याने हजेरी लावली होती. त्या नाटकातील इतर भूमिकेचे देखील त्याने निरीक्षण केले होते, कदाचित एखादी भूमिका मिळावी, असा आशावाद त्याला होता; परंतु त्या नाटकात काही त्याला भूमिका मिळाली नाही. ‘शू कुठे काही बोलायचं नाही’ या नाटकात त्याला अभिनेता सतीश तारे सोबत काम करण्याची संधी मिळाली. त्यानंतर मालकीण मालकीण दार उघडं, प्रेम रंग, पेइंग गेस्ट अशा जवळपास अठरा ते एकोणीस व्यावसायिक नाटके त्याने केली. १९९६ला अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पिंपरी-चिंचवड शाखेतर्फे त्याला सर्वोत्कृष्ट कलाकाराचे पारितोषिक मा. ज्येष्ठ नेते शरदचंद्रजी पवार यांच्या हस्ते प्राप्त झाले. तिथून त्याने पूर्ण वेळ अभिनयाच्या क्षेत्रात पदार्पण केले. ‘आता तरी खरं सांग’ हे नाटक केलं. काही व्हीडिओ नाटकं त्याने केली. त्यामध्ये नवरा म्हणू नये आपला, वेलकम माय डियर या नाटकाचा समावेश होता. अभिनेता गिरीश परदेशी चेतन दळवी, पुष्कर श्रोत्री, विजू खोटे, सुरेखा कुडची यांच्यासोबत त्याला काम करण्याची संधी मिळाली. ‘अहो रावसाहेब गेले’ या नारायण जाधव दिग्दर्शित नाटकात त्याने काम केले.

मुंबईत आल्यावर ज्यू. मेहमूदकडून त्याला ट्रॉफी मिळाली. कांचन अधिकारी निर्मित ‘दामिनी’ मालिका त्याने केली. नंतर अल्फा मराठी चॅनेलवर ‘सांज भूल’ ही मालिका त्याने केली. ‘युनिट नाइन’ ही मालिका केली. चार दिवस सासूचे, वादळवाट, आपली माणसं, बंध रेशमाचे, कानामागून आली, एक वाडा झपाटलेला या मालिकेत त्याने काम केले. ‘माहेरची वाट’ या चित्रपटासाठी त्याला निर्माता व दिग्दर्शक बाळासाहेब गोरे यांच्याकडे मुख्य सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करण्याची संधी मिळाली. त्यानंतर मुलगी लग्नाची आहे, श्रीनाथ म्हस्कोबाचं चांगभलं, माता एकवीरा नवसाला पावली, अशा जवळपास २२ चित्रपटांसाठी त्याने मुख्य सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम पाहिले. ‘सिनेरामा फूड अँड प्रॉडक्ट’ या नावाचे त्याचे यूट्यूब चॅनेल आहे. सिनेरामा प्रोडक्शनची निर्मिती त्याने केली. त्या मार्फत चांगल्या कलाकृती निर्माण करण्याचे त्याने ठरविले आहे. काही चित्रपटांची कथा, पटकथा त्याने लिहिली आहे. गायक सुदेश भोसले, उत्तरा केळकर, साधना सरगम, अनुराधा पौडवाल यांच्या आवाजात गाणी रेकॉर्डिंग करून ठेवलेली आहेत. जवळपास दोनशे ते अडीचशे निर्मात्यांना भेटून देखील एका देखील निर्मात्याने होकार दिला नाही. त्यासाठी त्याचे प्रयत्न सुरू आहे.

स्वामिनी मी तुझ्या मंदिरी या नाटकाचे, साई की याददाश्त हा हिंदी गाण्यांच्या अल्बमचे, कोळीवाड्यात शिरलाय यूपीचा भैया या गाण्याच्या अल्बमचे, त्याने दिग्दर्शन केले. अखंड सौभाग्यवती या मालिकेचा तो एपिसोड दिग्दर्शक होता. ‘नवरा माझा भवरा’ या चित्रपटाच्या तो एक्झिक्युटिव्ह प्रोड्यूसर होता. त्याने काही जाहिराती देखील केल्या. त्यामध्ये वामन अमृततुल्य चहा, जय कानिफनाथ गुळाचा चहा, संजीवनी गोल्ड अल्कालाइन वॉटर, आदर्श क्लासेस, नक्षत्र क्लासेस, सुटोन ऑइल, जनप्रेम दिवाळी मासिक या जाहिरातींचा समावेश आहे. ‘अष्टपैलू दादा गोवर्धन चांगो भगत’ या आत्मचरित्र पुस्तकाचे संपादन व शब्दांकन त्याने केले आहे. ठाण्याचे महानगर पालिकेचे ते पाहिले सभापती होते. दिवाचे पाहिले नगरसेवक, निर्माते अशी त्यांची ख्याती आहे.

‘जिंदगी हर कदम एक नई जंग है’ अस म्हणत प्रत्येक पावलावर संघर्ष करणाऱ्या राम माळीच्या भविष्यकालीन योजना यशस्वीरीत्या पूर्ण होवोत, हीच अपेक्षा व त्याबद्दल त्याला हार्दिक शुभेच्छा!

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -