Monday, July 8, 2024
Homeसंपादकीयअग्रलेखसंसद घुसखोरीतून बोध काय घेणार?

संसद घुसखोरीतून बोध काय घेणार?

काही दिवस भारतासाठी अविस्मरणीय तसेच नकोसे असणारे दिवस आहेत. १३ डिसेंबर २००१ आणि १३ डिसेंबर २०२३ हे दोन दिवस भारतासाठी अप्रिय राहणार असून भारताच्या सार्वभौम असलेल्या संसदेच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे दिवस आहेत. २००१ साली १३ डिसेंबरला लष्कर-एक-तोयबा आणि जैश-ए-मोहम्मदच्या पाच दहशतवाद्यांनी संसदेवर हल्ला केला होता. संसदेच्या आवाराबाहेर लष्कर-एक-तोयबा आणि जैश-ए-मोहम्मदचे दहशवादी येऊन हल्ला करेपर्यंत भारताची सुरक्षा व्यवस्था काय करत होती? हाही प्रश्न यानिमित्ताने निर्माण झाला होता. बरोबर २२ वर्षांनंतरही अशीच घटना घडल्याने त्या घटनेला उजाळा मिळणे स्वाभाविकच आहे. १३ डिसेंबर २०२३ रोजी बुधवारी लोकसभेत घुसून काही तरुणांनी धुराचे लोट पसरवले.

लोकसभेचे कामकाज सुरू होते. शून्य प्रहर संपण्यासाठी काही मिनिटं उरली होती. त्यावेळी लोकसभेच्या गॅलरीमध्ये बसलेल्या युवकांनी मुख्य भागात उडी मारली. जिथे खासदार बसतात, त्या ठिकाणी त्यांनी उड्या मारून आपल्या बुटातून स्प्रे काढला आणि धूर पसरवण्यास सुरुवात केली तसंच नारेबाजीही केली. या युवकांना खासदारांनी पकडले आणि सुरक्षा रक्षकांच्या ताब्यात दिले. आतमध्ये ही घटना घडत असतानाच लोकसभेच्या बाहेर एक महिला आणि एक तरुण या दोघांनीही धूर पसरवत नारेबाजी केली. २००१ची घटना, तर संसदेच्या बाहेर दहशतवादी हल्ला झाला होता, पण कालच्या घटनेने संसदेच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले नाही, तर अक्षरश: सुरक्षा व्यवस्थेचे धिंडवडे निघाले आहेत.

संसदेबाहेर हल्ला होणे आणि संसदेच्या आवारात येऊन सभागृह सुरू असताना लोकसभेच्या कामकाजादरम्यान गॅलरीतून उडी मारून धुडगूस घालणे ही खरोखरीच संसदेच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून चिंताजनक बाब आहे. ही घटना देशाच्या सुरक्षेसोबत प्रतिष्ठेलाही बाधा आणणारी आहे. विरोधकांनीदेखील या घटनेचे राजकारण न करता अशा घटना घडू नयेत यासाठी सत्ताधाऱ्यांसोबत बसून सुरक्षा अधिकाधिक भक्कम करण्यासाठी सामूहिक प्रयत्न करायला हवेत. कारण आरोप-प्रत्यारोप करून घडलेली घटना टाळता येणार नाही; परंतु अशा घटना घडणार नाहीत यासाठी काळजी घेणे आवश्यक आहे. मुळातच कालची घटना पाहिली आणि सागरी मार्गाने २६/११चा भारतावर पाकपुरस्कृत दहशतवाद्यांनी केलेला हल्लादेखील चिंतेचा विषय आहे. त्यामुळे यावर अधिक चर्चा न होता या घटना पुन्हा घडणारच नाहीत यासाठी कडेकोट सुरक्षाव्यवस्था उपलब्ध होणे आवश्यक आहे. राजकीय चिखलफेक करून त्यातून काहीच साध्य होणार नाही.

सत्ताधाऱ्यांना टीका करताना आपण आपल्याच देशाच्या सुरक्षाव्यवस्थेचे धिंडवडे, गलथानपणा जागतिक पातळीवर उघडकीस आणत आहोत याचे भान ठेवत विरोधकांनी देशहितासाठी राजकीय प्रगल्भता दाखविणे आवश्यक आहे. या घटनेचे समर्थन कोणीही करणे शक्यच नाही. अशा घटना नाक्यावर अथवा कुठे सार्वजनिक ठिकाणी घडल्या असत्या, तर समजण्यासारखे होते. पण देशाचा कारभार ज्या ठिकाणी चालविला जातो, त्या संसदेत अधिवेशनादरम्यान देशाच्या कानाकोपऱ्यांतील खासदार उपस्थित होते, देशाचा कारभार चालविण्याचे निर्णय जिथे घेतले जातात. घटना घडतात, चर्चा होते, राजकीय आरोप-प्रत्यारोप होतात आणि घटना विस्मृतीत जातात, असा प्रकार या घटनेबाबत घडता कामा नये. साध्या खासगी रुग्णालयात अथवा खासगी कंपन्या-कारखान्यातील सुरक्षा व्यवस्था कडेकोट असते. कोणालाही त्या ठिकाणी सहजासहजी प्रवेश मिळत नाही. त्या ठिकाणी ये-जा करण्यासाठी विविध तपासण्यांना सामोरे जावे लागते. मग देशाचे सर्वोच्च सार्वभौम केंद्र असणाऱ्या संसदेत अशी घटना घडणे चिंतेचा विषय आहे. संसदेत धुडगूस घालणाऱ्या युवकांना प्रवेश मिळणे स्वाभाविक आहे.

कोणी कार्यकर्ता अथवा पक्षीय पदाधिकाऱ्याच्या ओळखीने आपल्या निकटवर्तीयांना, परिचितांना संसद प्रवेशासाठी ओळखपत्र मिळविण्यासाठी खासदारांना साकडे घातले जाते. लोकप्रतिनिधी असल्याकारणाने कोणाचेही काम अडू नये यासाठी तेही प्रवेशासाठी शिफारस करतात; परंतु ते युवक संसदेत प्रवेश करतात. लोकसभा कामकाज पाहण्यासाठी गॅलरीत प्रवेश करतात, तेथून थेट लोकसभा कामकाज सुरू असणाऱ्या ठिकाणी धुराचे लोट पसरवतात. ही घटना अचानक घडलेली नाही. काही महिन्यापासून त्यावर कटकारस्थानाचे नियोजन सुरू असल्याचे उघड झाले आहे. संबंधितांना पाच महिन्यांपूर्वी संसदेत जाणे शक्य झाले नसले तरी संसदेच्या बाहेरून त्यांनी सर्व रेकी केली होती. संसदेत प्रवेश करताना बूट तपासले जात नाहीत, ही बाब संबंधित युवकांच्या निदर्शनास आली होती. त्यामुळेच बुटाच्या आतील भागातून धूर निर्माण करण्यासाठी साहित्य घेऊन जाणे त्यांना सहज शक्य झाले. पण या घटनेचे राजकारण न करण्याइतपत प्रगल्भता, परिपक्वपणा, सुजाणपणा विरोधकांनी दाखविणे आवश्यक आहे. या घटना थांबल्या पाहिजेत, याकडे कानाडोळा केल्यास समाजविघातक शक्तींचे धाडस वाढीस लागणार.

आज केवळ धूर पसरवण्याइतपतच प्रकार सीमित राहिला असला तरी येथे खासदार, मंत्रिमंडळ, देशाचे पंतप्रधान, गृहमंत्री व अन्य महत्त्वपूर्ण घटकांचा वावर असतो. सर्वांच्या जीविताला धोका निर्माण होऊ शकतो. विरोधकांनी या घटनेचे राजकारण करताना भाजपाला कोंडीत पकडण्याची खेळी करताना हा विषय संसद सुरक्षेचा व देशाच्या प्रतिष्ठेचा असल्याने गांभीर्य बाळगावे. खासदारांनीही संसदेत प्रवेशपत्र देण्यासाठी आपण कोणाला शिफारसपत्र देत आहोत, याचे भान बाळगणे आवश्यक आहे. केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी खासदारांनी संसदेत प्रवेशपत्राविषयी पासेस देताना काळजी घेण्याचे आवाहनही केले आहे. संसदेत घडल्या प्रकारावर विरोधी पक्षाच्या खासदारांनी घटनेचे गांभीर्य पाहता गंभीरपणे चर्चा करणे आवश्यक आहे. केवळ विरोधासाठी विरोध करून प्रसिद्धीमाध्यमांमध्ये प्रसिद्धी मिळविण्याचा उथळपणा त्यांनी दाखवू नये, ही भारतीयांचीही त्यांच्याकडून अपेक्षा असणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -