नाशिक(प्रतिनिधी) – अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पवन नगर सिडको या ठिकाणी दि. बुधवारच्या मध्यरात्री पार्टी करून झाल्यानंतर अज्ञात कारणावरून भांडण होत दोघांमध्ये बाचाबाची झाली व यातून एकाने दुसऱ्यावर गोळीबार केल्याचा गवगवा शहरभर सुरू होता, ज्या व्यक्तीच्या दिशेने गोळीबार करण्यात आला तो माजी नगरसेवक असल्याची चर्चा देखील जोरदार सुरू होती.
यात माजी नगरसेवकाला गोळी लागली नसली तरी देखील जीव घेण्याच्या उद्देशानेच गोळी झाडण्यात आल्याने हा माजी नगरसेवक हा अंबड पोलीस ठाण्यात देखील गेला,असल्याबाबतच्या चर्चांना उधाण आले होते. मात्र अंबड पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना याबाबत माध्यमांनी चौकशी केली असता सुरुवातीला तर यात कुठलेही तथ्य नाही असे उत्तर मिळत होते. नंतर मात्र या विषयाचं गांभीर्य ओळखत पोलिसांनी परिसरात याबाबत चौकशी केली असता गोळीबार झालेल्या ठिकाणी असलेले पानवाला या दुकानाच्या सीसीटीव्ही फुटेज मध्ये गोळी झाडणारा संशयित हा नाशिकरोड व उपनगर पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील असल्याचे निष्पन्न झाले.
या फुटेजमध्ये संशयित पाच ते सहा इसमांच्या दिशेने गोळी झाडताना दिसत आहे या संशयताचे नाव रोहित गोविंद दिंगम उर्फ माले असल्याची माहिती पोलिसांकडून समजली असून या संशयिता विरोधात उपनगर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता तसेच त्याच्या विरोधात जीवे ठार मारण्याचा प्रयत्न बेकायदेशीर हत्यार तसेच अग्नि शस्त्र बाळगल्या प्रकरणी गुन्हे दाखल असून हा रेकॉर्ड वरील असल्याची माहिती पोलिसांनी दिली असून रात्री उशिरा अंबड पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक किरण कौतिकराव गायकवाड यांच्या फिर्यादीनुसार संशयिता विरोधात खुनाचा प्रयत्न करणे तसेच बेकायदेशीर बंदूक बाळगल्या प्रकरणी आर्म ॲक्टचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीचा शोध सुरू आहे.