जयपूर: राजस्थान विधानसभा निवडणुकीत(rajasthan assembly election) दमदार विजय मिळवल्यानंतर आता तेथे नवे सरकार स्थापन होण्यासाठी सज्ज झाले आहे. या ठिकाणी भाजपने बंपर विजय मिळवला. भाजपने विजयानंतर भजनलाल शर्मा यांना मुख्यमंत्री बनवण्याचा निर्णय घेतला. भजनलाल यांच्याशिवया भाजपने राजस्थानात दोन उपमुख्यमंत्रीपदाचा फॉर्म्युलाही लावला. दिया कुमार आणि प्रेमचंद बैरवा यांना राज्याचे उपमुख्यमंत्री बनवण्यात आले आहे. हे तिघेही शुक्रवारी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील.
राजस्थानचे राज्यपाल कलराज मिश्र हे राज्याचे नवे मुख्यमंत्री यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देतील. राजस्थानातील मुख्यमंत्री शपथविधी सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा उपस्थित असतील. अल्बर्ट हॉलबाहेरील रामनिवास बाग येथे हा शपथविधी सोहळा रंगणार आहे.
भजनलाल शर्मा यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर दोन्ही उपमुख्यमंत्री दिया कुमारी आणि डॉ. प्रेमचंद बैरवा हे कॅबिनेट मंत्रीची शपथ घेतील. शपथविधी सोहळ्यात संपूर्ण राजस्थानातील कार्यकर्ते असणार आहेत. अशातच विविध कार्यक्रमांसाठी भाजपने प्रदेश अधिकाऱ्यांना विविध जबाबदाऱ्या दिल्या आहेत.
नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने काँग्रेसला हरवत १९९ विधानसभा जागांपैकी ११५ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला येथे केवळ ६९ जागा मिळाल्या. विजयानंतर राजस्थानातील मुख्यमंत्रीपदासाठी बराच काळ चर्चा सुरू होती. अखेर भजनलाल शर्मा यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.