Thursday, October 23, 2025
Happy Diwali

पेण खारेपाट ग्रामस्थांचे उपोषण मागे, कार्यकारी अभियंता यांचे लेखी आश्वासन

पेण खारेपाट ग्रामस्थांचे उपोषण मागे, कार्यकारी अभियंता यांचे लेखी आश्वासन
पेण( देवा पेरवी ) - पेण तालुक्यातील वाशी खारेपाट विभागातील गावांना पिण्याचे पाणी मिळावे या मागणी करिता मागील ८ दिवस सुरु असलेले आमरण उपोषण अखेर जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांच्या लेखी पत्राच्या आश्वासनानंतर मागे घेण्यात आले. भाजप आमदार रविशेठ पाटील, शिवसेनेचे आमदार सुनील शिंदे, काँग्रेसचे आमदार बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादीचे आमदार अनिकेत तटकरे आणि शेकापचे आमदार जयंत पाटील यांनी हिवाळी अधिवेशनात हा प्रश्न पटलावर मांडून शासनाचे लक्ष वेधले. अखेर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी या विभागात पाणीपुरवठा करीता 766 कोटींच्या प्रकल्पाला महिन्याभरात शासकीय मान्यता देण्याचे मान्य केले. पेण तालुक्यातील हेटवणे धरण मध्यम प्रकल्पाच्या कालव्याचे काम मागील 16 वर्षांपासून प्रलंबित आहे. याच पाण्यावर येथील 52 गावांमधील 4268 हेक्टर सिंचन क्षेत्र आणि हजारो ग्रामस्थांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अवलंबून आहे. पिण्याच्या व सिंचनाच्या पाण्याकरिता पेण खारेपाट विकास संकल्प संघटनेच्या माध्यमातून वाशी गावातील जगदंब माता मंदिराच्या प्रांगणात या विभागातील वेगवेगळ्या गावातील नऊ ग्रामस्थांनी आमरण उपोषण पुकारले होते. अखेर आठव्या दिवशी जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता दिनेश्री राजभोज यांनी लेखी पत्र देऊन काम लवकरात लवकर सुरू करण्याचे मान्य केल्याने उपोषण स्थगित करण्यात आले. एका महिन्यात जर याची पूर्तता झाली नाही तर सर्व उपोषणकर्त्ये पुन्हा मोठ्या स्वरूपात हे आमरण उपोषण सुरू करतील असा इशारा नंदा म्हात्रे - कणे, हेमंत पाटील - वाशी, जितेंद्र ठाकूर - ठाकूरबेडी, अभि म्हात्रे - भाल विठ्ठलवाडी, दिलीप म्हात्रे - भाल विठ्ठलवाडी, स्वप्निल म्हात्रे - सरेभाग, चंद्रहास म्हात्रे - वढाव, अश्विनी ठाकूर - दादर, अजित पाटील - वाशी, प्रकाश माळी व परिसरातील उपोषणकर्त्यांनी दिला.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >