मुंबई : संसदेची सुरक्षा भेदून (Parliament Security Breach) दोन तरूणांनी प्रेक्षक गॅलरीतून थेट खासदार बसतात त्या बाकांवर उडी घेतली आणि स्मोक बॉम्ब फोडले. त्यानंतर लोकसभेत एकच गोंधळ उडाला. यामध्ये महाराष्ट्रातील अमोल धनराज शिंदे या तरूणाचा सहभाग असल्याचे समोर आले आहे. तो लातूरच्या चाकूर जिल्ह्यातील रहिवासी आहे.
तो घरी पोलीस भरतीसाठी जात असल्याचे सांगून निघाला होता. बेरोजगारीमुळे ६ तरूणांनी हा घुसखोरीचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर दिल्ली पोलिसांनी अमोल शिंदेला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू आहे. अशातच महाराष्ट्रातील वकील असीम सरोदे यांनी अमोल शिंदेला कायदेशीर मदत करणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यांनी यासंबंधीची पोस्ट आपल्या सोशल मिडीया अकाऊंटवरून शेअर केली आहे. तसेच त्यांनी संसदेत घुसखोरी करणाऱ्या अमोल शिंदेची कायदेशीर मदत का करत आहोत यामागची भूमिकाही स्पष्ट केली आहे.
अमोल शिंदेला कायदेशीर मदत करणार.https://t.co/6lAn6P9qpV
— Asim Sarode (@AsimSarode) December 14, 2023
‘अमोल शिंदे याने काल संसदेत घुसून बेरोजगारीचा प्रश्न धुराचे नळकांडे फोडून मांडला. त्याने वापरलेली भगतसिंग स्टाईल लोकशाहीला साजेशी नाही. पण मग संसदेतील लोकही असे कोणते काम करीत आहेत ज्यातून अनेक हातांना रोजगार मिळेल, महागाई कमी होईल. अमोलचा उद्देश जर कुणाला दुखावण्याचा व इजा करण्याचा नव्हता आणि त्याला केवळ बेरोजगारीचा मुद्दा मांडायचा होता तर त्याचे गुन्हेगारीकरण न करता बेरोजगारीचा प्रश्न समजून घेतला पाहिजे. त्याने वापरलेल्या चुकीच्या मार्गाबद्दल त्याला जाणीव देऊन त्याला सकारात्मक शिक्षा जरूर करावी असे मला वाटते’, असे असीम सरोदे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
पुढे ते म्हणतात की, ‘त्यामुळे मला धनंजय रामकृष्ण शिंदे यांनी लिहिलेले विचार पटले. लातूरच्या २५ वर्षीय अमोल शिंदे याने संसदेत प्रवेश केला कारण तो बेरोजगार आहे. त्याला रोजगार हवाय. तो दहशतवादी किंवा गुन्हेगार नसून राज्यातील तसेच केंद्रातील असंवेदनशील धोरण प्रक्रियेच्या तो विरोधात आहे. त्या असहाय्य, पीडित, बेरोजगार तरुणाला संसदेतील खासदारांनी मारणे मला योग्य वाटत नाही. बेरोजगारीचा प्रश्न सोडवण्यात मारहाण करणारे खासदार नापास झाले आहेत. कमजोर बेरोजगारास मारणाऱ्या या मारकुट्या खासदारांची इभ्रत काय राहिली?’, असे असीम सरोदे यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे.