नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट संघ(indian cricket team) ३ सामन्यांच्या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा टी-२० सामना आज म्हणजेच गुरूवारी यजमान दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळत आहे. क्रिकेट चाहत्यांना उत्सुकता आहे की जोहान्सबर्गची पिच कोणाला साथ देणार फलंदाजांना की गोलंदाजांना. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात भारतीय क्रिकेट संघ या मालिकेत ०-१ अशा पिछाडीवर आहे. मालिकेत बरोबरी साधण्याचा प्रयत्न आज भारतीय संघ करेल.
जोहान्सबर्गमधील न्यू वांडरर्स स्टेडियमची विकेट फलंदाजांसाठी स्वर्ग आहे. येथे चौकार तसेच षटकारांचा पाऊस पाहायला मिळू शकतो. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात या पिचवर हायस्कोरिंग सामना पाहायला मिळू शकतो. दरम्यान, सुरूवातीला वेगवान गोलंदाजांना मदत मिळू शकते.
या विकेटवर पाठलाग करणारा संघ पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या संघापेक्षा फायद्यात राहू शकते. पहिल्यांदा बॅटिंग करणाऱ्या संघाला १५ सामन्यात विजय मिळाल आहे तर पाठलाग करणारा संघ १७ सामन्यात विजयी झाला आहे. या विकेटवर सगळ्यात सर्वोच्च धावसंख्या २६० इतकी आहे जी श्रीलंकेने केनियाविरुद्ध २००७मध्ये केली होती. तर सगळ्यात कमी धावसंख्या ८३ आहे.
भारताने जोहान्सबर्ग येथे ५ टी-२० सामने ेखेळले यातील ३मध्ये त्यांना विजय मिळवता आला तर २मध्ये पराभवास सामोरे जावे लागले.
कसे असेल हवामान
अॅक्युवेदरच्या माहितीनुसार जोहान्सबर्गमध्ये गुरूवारी पावसाची कोणतीही शक्यता नाही. याचा अर्थ संपूर्ण २० षटकांचा सामना पाहायला मिळू शकतो. तापमान २६ डिग्री ते २० डिग्री सेल्सियसमध्ये राहण्याची शक्यता आहे.
वांडरर्समध्ये ३२ टी-२० सामने
जोहान्सबर्गमध्ये दक्षिण आफ्रिकेने २४ टी-२० सामने खेळले आहेत यातील १४ सामन्यांत त्यांना विजय मिळाला तर १० सामन्यात त्यांना पराभवाचे तोंड पाहावे लागले. भारत आणि दक्षिण आफ्रिका संघ आतापर्यंत टी-२०मध्ये २५ वेळा आमनेसामने आलेत. येथे भारताला १३ तर दक्षिण आफ्रिकेला ११ सामन्यांत विजय मिळाला.