मुंबईतील २३९ हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सवर टाकले छापे, २२ आस्थापनांना ठोकले टाळे तर १७० रेस्टॉरंटना दिली सुधारणा नोटिस
शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थ वेगवेगळे बनवले जात नसल्याचेही आढळले
मुंबई : अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल अन्न आणि औषध प्रशासनाने (FDA) मुंबईतील २३९ हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सवर छापे टाकले. त्यापैकी गंभीर उल्लंघन असलेल्या २२ आस्थापनांना काम बंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तर १७० रेस्टॉरंटना सुधारणा नोटिसा देण्यात आल्या आहेत.
वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, या सर्वांनी अन्न सुरक्षा कायदा १९९० चे उल्लंघन केले होते आणि तपासणी दरम्यान गलिच्छ स्वयंपाकघर, शिळे अन्न, कालबाह्य गोष्टी, मुंग्या आणि झुरळे ही सामान्य समस्या असल्याचे दिसून आले.
एफडीएचे सह आयुक्त (अन्न) शैलेश आढाव म्हणाले की, या भोजनालयांची काटेकोरपणे तपासणी करण्याची गरज आहे, कारण त्यापैकी बहुतेक नियमांचे उल्लंघन करत आहेत आणि रहिवाशांना कुठे तक्रार करावी हे माहित नाही. वांद्रे येथील एका जेवणावळीबाबतच्या तक्रारीनंतर एफडीएने कारवाई केली, जिथे अन्नात उंदीर आढळला होता. ही आरोग्यासाठी उच्च धोका असलेली धक्कादायक घटना आहे.
आढाव म्हणाले, ‘दरवर्षी आम्ही भोजनालयांची तपासणी करतो परंतु यावेळी ऑगस्टपासून आम्ही तपासणी तीव्र केली आहे आणि त्यापैकी बहुतेक मूलभूत अन्न सुरक्षा नियमांचे पालन करत नसल्याचे आढळले आहे. भोजनालय परवान्याशिवाय चालत होते आणि कर्मचार्यांकडे आरोग्य प्रमाणपत्र नव्हते.’
ते पुढे म्हणाले, ‘एफडीएला कूलरमध्ये शिळे अन्न आढळले, स्वयंपाकघर अस्वच्छ होते, अनेक ठिकाणी मुंग्या आणि झुरळे होती. आमची स्क्रीनिंग प्रक्रिया भोजनालयांचे अंदाजे ८० ते ९० गंभीर पॅरामीटर्सवर मूल्यांकन करते.’
याआधी मुंबईमधील लोकप्रिय रेस्टॉरंट्स ‘बडेमिया’च्या तीन दुकानांची तपासणी केली असता तिथे झुरळे, उंदीर, अळ्या आणि शिळ्या भाज्या आढळल्या होत्या. वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) येथील बर्न-बार अँड किचनमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थ वेगवेगळे बनवले जात नसल्याचे आढळले.
दरम्यान, आरोग्य तज्ज्ञांनी सांगितले की, अस्वच्छ अन्न सेवन केल्याने मळमळ, उलट्या, अतिसार आणि पोटदुखी या लक्षणांसह अन्नजन्य आजार होऊ शकतात. गंभीर प्रकरणांमध्ये, दीर्घकालीन आरोग्य गुंतागुंत होऊ शकते.