Tuesday, May 13, 2025

देशमहत्वाची बातमी

Parliament Security Breachमध्ये मोठा खुलासा, दीड वर्षांपूर्वी मैसूरमध्ये भेटले होते सर्व आरोपी

Parliament Security Breachमध्ये मोठा खुलासा, दीड वर्षांपूर्वी मैसूरमध्ये भेटले होते सर्व आरोपी

नवी दिल्ली: संसद घुसखोरी प्रकरणात दिल्ली पोलिसांनी सागर शर्मा, मनोरंजन डी, अमोल शिंदे आणि नीलम आझाद यांना अटक केली होती. चारही आरोपींकडून दिल्ली पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. दिल्ली पोलिसांची चौकशी जसजशी पुढे जात आहे तसतसे नवनवे खुलासे समोर येत आहे. आतापर्यंतच्या चौकशीदरम्यान अशी माहिती समोर आली आहे की संसदेत घुसखोरी करण्याचा कट तब्बल दीड वर्षांपूर्वी रचण्यात आला होता.


सूत्रांच्या माहितीनुसार, हे सर्व आरोपी सोशल मीडिया पेज भगत सिंह फॅन क्लबच्या माध्यमातून जोडले गेले होते. हे सर्वजण दीड वर्षांपूर्वी मैसूर येथे भेटले होते. तेव्हाच याचा कट रचण्यास सुरूवात झाली होती. चौकशीदरम्यान असेही समोर आले की १० डिसेंबरला सर्वजण एकएक करून दिल्लीला पोहोचतील आणि १० डिसेंबरच्या रात्रीच सर्व आरोपी गुरूग्राममध्ये विक्कीच्या घरी पोहोचले होते. रात्री उशिरा ललित झाही विक्कीच्या घरी पोहोचले होते.



जुलैमध्ये केली होती संसदेची रेकी


सूत्रांच्या माहितीनुसार, हा कट सत्यात उतरवण्याआधी आरोपींनी संसदेची रेकीही केली होती. जुलैमध्ये सागरला संसद भवनाची रेकी करण्यासाठी लखनऊवरून दिल्लीला पाठवण्यात आले होते. जुलैमध्ये सागर संसद भवनाच्या आत जाण्यास यशस्वी ठरला नव्हता. यानंतर तो संसद भवनाच्या बाहेरून गेट आणि सुरक्षा विभागाची रेकी करून निघून गेला होता.



अमोल घेऊन आला होता स्मोक कँडल्स


चौकशीदरम्यान असेही समोर आले आहे आरोपी अमोल महाराष्ट्रातून स्मोक क्रॅकर घेऊन आला होता. हे सर्व घडण्याआधी हे आरोपी इंडिया गेटवर भेटले होते. येथे सर्वांना स्मोक क्रॅकर वाटण्यात आले. दुपारी १ वाजण्याच्या सुमारास सागर शर्मा आणि मनोरंजन डी संसदेत दाखल झाले होते. तर अमोल शिंदे आणि नीलम आझाद हे संसदेच्या बाहेर होते. ललित या सर्वांचे व्हिडिओ बनवत होता. गदारोळानंतर जसे पोलिसांनी अमोल आणि नीलमला ताब्यात घेतले ललित सर्वांचे फोन घेऊन त्या ठिकाणाहून फरार झाला.

Comments
Add Comment