Monday, July 15, 2024
Homeताज्या घडामोडीRavindra Berde passed away : पछाडलेला, झपाटलेला, धडाकेबाज असे सिनेमे गाजवलेले अभिनेते...

Ravindra Berde passed away : पछाडलेला, झपाटलेला, धडाकेबाज असे सिनेमे गाजवलेले अभिनेते रवींद्र बेर्डे यांचं निधन

लक्ष्मीकांत बेर्डे यांचे होते सख्खे बंधू; वयाच्या ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

मुंबई : मराठी मनोरंजन सृष्टीत (Marathi industry) आपल्या विनोदी भूमिकांनी स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण करणारे अभिनेते रवींद्र बेर्डे (Ravindra Berde) यांचं निधन झालं आहे. वयाच्या ७८ व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला आहे. मागील काही वर्षांपासून ते कर्करोगाशी झुंज देत होते. त्यांच्यावर टाटा रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र, अचानक हृदयविकाराचा झटका (Heart attack) आल्याने त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने संबंध मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

रवींद्र बेर्डे यांना यापूर्वी १९९५ मध्ये नाटकाच्या एका प्रयोगादरम्यान हृदयविकाराचा झटका आला होता. मात्र त्यावेळेस या धक्क्यातून ते सावरले होते. त्यानंतर २०११ मध्ये त्यांना घशाच्या कर्करोगाने ग्रासले. त्यांच्यावर टाटा रुग्णालयात उपचार सुरू होते. श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले होते. उपचारानंतर दोन दिवसांपूर्वीच त्यांना घरी देखील सोडले. सर्व काही सुरळीत चालू असताना अचानक त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांनी या जगाचा निरोप घेतला.

रवींद्र बेर्डे विनोदाचा बादशहा लक्ष्मीकांत बेर्डे (Laxmikant Berde) यांचे सख्खे बंधू आहेत. आजवर लक्ष्मीकांत बेर्डे, महेश कोठारे, भरत जाधव, अशोक सराफ, विजय चव्हाण, विजू खोटे यांच्या जोडीने त्यांनी केलेल्या विनोदी भूमिका प्रचंड गाजल्या. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलं, सुना, नातवंडं असा परिवार आहे.

रवींद्र बेर्डे यांनी आजवर अनेक मराठी चित्रपटांतून लक्षात राहण्यासारख्या भूमिका निभावल्या आहेत. कधी मुलीचा कडवट बाप तर कधी हवालदार अशा विनोदी भूमिका त्यांनी साकारल्या आहेत. पछाडलेला, झपाटलेला, धडाकेबाज, धुडगूस, गोंद्या मारतंय तंगडं, आयत्या घरात घरोबा, चंगू मंगू, माझा छकुला, कमाल माझ्या बायकोची, गंमत जंमत, एक गाडी बाकी अनाडी अशा अनेक मराठी सुपरहिट चित्रपटांतून त्यांनी काम केलं आहे. तर सिंघम या हिंदी चित्रपटातदेखील त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. त्यांचं अचानक जाणं मराठी मनोरंजन सृष्टीला चटका लावून जाणारं आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -