मुंबई: सलग दुसऱ्यांदा पावसाने खोडा घातलेल्या टी-२० सामन्यात दक्षिण आफ्रिकाने भारताला ५ विकेटनी हरवले. या सामन्यात भारताने पहिल्यांदा खेळताना रिंकू सिंह आणि सूर्यकुमार यादव यांच्या तुफानी अर्धशतकी खेळीच्या जोरावर १९.३ षटकांत १८० धावा केल्या होत्या. मात्र अचानक पाऊस सुरू झाला आणि आफ्रिकेला १५ षटकांत १५२ धावांचे आव्हान मिळाले. हे आव्हान यजमान संघाने सात चेंडू राखत आणि ५ विकेट गमावत पूर्ण केले.
९० चेंडूत १५२ धावांचा पाठलाग करणाऱ्या आफ्रिकेने जबरदस्त सुरूवात केली. सिराजच्या पहिल्या ओव्हरमध्ये १४ धावा आणि त्यानंतर अर्शदीपच्या ओव्हरमध्ये २४ धावा निघाल्या. दोन ओव्हरमध्येच आफ्रिकेची धावसंख्या ३८ इतकी झाली होती. त्यानंतर आफ्रिकेच्या फलंदाजांनी मागे वळून पाहिले नाही. या पद्धतीने आफ्रिकेने १३.५ षटकांतच ५ विकेट गमावत लक्ष्य पूर्ण केले.
आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या दक्षिण आफ्रिकेने सुरूवातीला हे अजिबात जाणवू दिले नाही की सामना त्यांच्या हातात नाही. मात्र १०व्या षटकांत दुसऱ्या बॉलवर हेनरिक क्लासेन बाद झाला आणि आफ्रिका बॅकफूटवर गेली. सामना भारताच्या बाजूने येऊ लागला. मात्र आफ्रिकेने एकदा पुन्हा जोर लावला आणि सामना आपल्या बाजूने वळवला.
आफ्रिकेची चांगली सुरूवात
आफ्रिकेने या सामन्यात चांगली सुरूवात केली. संघाने २.५ षटकांत पहिला विकेट मॅथ्यू ब्रीट्जकेच्या रूपात गमावला. तेव्हा आफ्रिकेच्या ४१ धावा झाल्या होत्या. त्याने १६ धावांची खेळी केली होती. त्यानंतर दुसऱ्या विकेटसाठी रीजा हेंड्रिक्स आणि कर्णधार एडन मार्करम यांनी ३० बॉलमध्ये ५४ धावांची भागीदारी केली. आफ्रिकेला दुसरा झटका ८व्या ओव्हरमध्ये कर्णधार मार्करमच्या रूपात बसला. मार्करमने ३० धावा केल्या. त्यानंतर ९व्या ओव्हरमध्ये कुलदीप यादवने रीजा हेंड्रिक्सला ४९ धावांवर बाद केले.